मुख्यमंत्रीपदासाठी ३ नावे: पर्रीकर

0
164

मात्र मुख्यमंत्री कोण ते सांगण्यास नकार
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी तीन नावे चर्चेत आहेत असे मावळते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, त्याचबरोबर त्या नावाचा उल्लेख करणे त्यांनी टाळले. तसेच भावी मुख्यमंत्री कोण असेल ते सांगण्यास नकार देताना भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक आज शनिवारी १२.३० वा. होणार असून त्यावेळी मुख्यमंत्र्याचे नावे निश्‍चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज रात्रीच (शुक्रवारी) आपण पक्षातल्या ४-५ ज्येष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेणार असून त्यांच्याशीही महत्त्वाची चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, शुक्रवारी आपण पक्षाचे सर्व आमदार व आघाडीच्या पक्षातील नेत्यांशी राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली, असे ते म्हणाले. तद्नंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपणावर केंद्रीय मंत्री म्हणून जी नवी जबाबदारी सोपवू पाहत आहेत, त्याविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना कल्पना दिल्याचे ते म्हणाले.
शुक्रवारी मुख्यमंत्री या नात्याने आपली शेवटची मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीत खनिजावरील स्टॅम्प ड्युटी २०० रु. प्रती टन वरून ३०० रु. प्रती टन अशी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्याला सुमारे ४०० कोटी रु. एवढा अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे, असे ते म्हणाले. राज्यातील वीज खात्याची समस्या गंभीर असून या पार्श्‍वभूमीवर कौशल किशोर अगरवाल यांची वीज खात्यावर सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय अडून पडलेले अन्य छोटे छोटे प्रस्तावही हातावेगळे करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
अन् पर्रीकरांचे डोळे डबडबले
आजची पत्रकार परिषद ही मुख्यमंत्री या नात्याने आपली शेवटची परिषद आहे हे सांगताना पर्रीकर यांचे डोळे डबडबले. कंठ दाटून आला. कठीण परिस्थितीत आपण गोव्याच्या प्रशासनाचा गाडा कसा हाकला. गोव्याच्या हिताचे निर्णय घेत असतानाही आपणाला टीकेला कसे सामोरे जावे लागले हे सांगताना मोप विमानतळावरून तसेच प्रादेशिक आराखडा अशा काही प्रश्‍नावरून आपणावर तोंडसुख घेण्यात आले असे ते म्हणाले. मोपची नितांत गरज असून सध्या दाबोळी विमानतळावर विमानांची गोची होत असल्याचे ते म्हणाले. दुपारी २ ते ५ पर्यंत येणार्‍या विमानांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, असे सांगून मोप झाल्यावरही दाबोळी राहील, असे ते म्हणाले.
खाणी बंद पडलेल्या असतानाही लोकांवर आपण मोठे आर्थिक संकट येऊ दिले नाही. त्यामुळेच खाणपट्‌ट्यात आत्महत्येसारखे प्रकार घडले नसल्याचे ते म्हणाले. भावी संरक्षणमंत्री या नात्याने पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, देशासाठी लढणार्‍या प्रत्येक जवानाचे प्राण हे अनमोल आहेत. मानवी चुकांमुळे या जवानांचे प्राण जाता कामा नयेत. हवाई दलातील आमची विमाने ही उडत्या शवपेट्या असता कामा नयेत असे आपले मत असल्याचे ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल आपणाला अधिकृतरित्या केंद्रीय मंत्रीपदासाठीचे निमंत्रण दिल्याचे पर्रीकर म्हणाले. आपण त्यांच्याकडे २-३ महिन्यांचा अवधी मागितला होता. आपल्या कुटुंबाचेही काही प्रश्‍न होते. पण आपण तात्काळ यावे अशी सूचना मोदी यांनी केल्याचे ते म्हणाले. ९ रोजीच आपणाला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुळ कायदा हा कुळाच्या फायद्यासाठीच केलेला असून त्यामुले कुळांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. निधीची चणचण असतानाही आपण गेले ३० महिने गृह आधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा सारख्या योजना चालू ठेवल्या. पेट्रोल लोकांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिले. केंद्राच्या जनधन योजनेचा राज्यातील १०० टक्के जनतेला लाभ मिळवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
छायाचित्रांची इच्छा पूर्ण केली
पत्रकारांबरोबर छायाचित्रे टिपण्याचे आश्‍वासन गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांना दिले होते. त्यानुसार काल त्यांनी मंत्रालयात पत्रकारांबरोबर छायाचित्रे टिपून घेतली. आपण बर्‍याचदा पत्रकारांवर तोंडसुख घेतले. पण तुम्हाला दुखावणे हा त्यामागील हेतू नव्हता असे ते म्हणाले. तुमच्या डोळ्यात अश्रु येतात. तुम्ही भावूक होतात तेव्हा आम्हीही भावूक होत असतात असे पत्रकारांनी त्यांनी सांगितले तेव्हा त्यांना गहिवरून आले.
गोव्याचे मासे ‘मिस्’ करीन! : पर्रीकर
गोव्याच्या सुखद हवामानातून दिल्लीच्या उष्ण आणि निबर वातावरणात चाललो आहे. त्याच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.
गोव्याशी आजवर एकरूप झालेलो असल्याने आता गोव्याला आणि विशेषतः गोव्याच्या माशांना ‘मिस्’ करीन अशा शब्दांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या हळव्या भावनांना काल वाट करून दिली. आपल्याला दिल्लीचे बोलावणे आल्यावर जे असंख्य संदेश आले त्यापैकी बहुसंख्य हे अभिनंदनाचेच होते. फक्त २० टक्के लोकांनी ते आपल्याला मिस् करतील असे नमूद केले, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. मात्र, आपण जड अंतःकरणाने गोवा सोडत आहोत असे पर्रीकर यांनी नमूद केेले. गोव्याची सुशेगाद अशी प्रतिमा असली तरी आपण सुशेगाद कधीच नव्हतो. दिवसाला सोळा ते अठरा तास काम करायचो असे ते बरखा दत्त यांच्या एका प्रश्नावर उत्तरले.