मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोठेही नाही : गडकरी

0
104

फडणवीस गडकरींना दोनदा भेटले
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपण कोठेही नाही असा खुलासा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना केली. विशेष म्हणजे काल चार तासांच्या आत मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र त्यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. फडणवीस यांनी ही चर्चा राजकीय स्वरूपाची नव्हती असा खुलासा केला.फडणवीस यांनी गडकरी यांची पहिल्यांदा भेट घेतली ती त्यांच्या निवासस्थानी सुमारे ३० मिनिटे ते गडकरींसमवेत होते. आपण गडकरींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो असे बाहेर आल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. गडकरी यांना पत्रकारांनी या विषयी छेडले असता त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात यायची आपली इच्छा नाही हे आपण दहा वेळा तरी सांगितले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की फडणवीस व आपण सहकारी असून दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. फडणवीस याना आपण राजकारणात आणले व आपल्याला त्यांच्या वडिलांनी राजकारणात आणले होते. त्यामुळे आमचे कौटुंबिक नाते आहे असेही त्यांनी सांगितले.
हे सर्व सांगत असतानाच विदर्भातील आमदारांना आपल्या मनातील ईच्छा व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे असेही गडकरी म्हणाले. मात्र या सर्व प्रकरणात भाजप संसदीप मंडळ व पंतप्रधान योग्य तो निर्णय घेतील अशी टिप्पणीही त्यांनी केली. या सर्व प्रकरणाचा नाहक वाद निर्माण केला जात असल्याबद्दल आपण व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.