आमदार मायकल लोबो यांचे मत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेला 2023-24 चा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. या अर्थसंकल्पातून सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्यात आले आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरूवात करताना काल सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटन, शेती, खाण, स्वयंपूर्ण गोवा यांना प्राधान्य दिले आहे. पर्यटन क्षेत्रातून रोजगाराच्या नव नवीन संधी निर्माण होऊ शकतात. राज्यातील बोंडला या प्रमुख प्राणी संग्रहालयाच्या विस्ताराकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार लोबो यांनी सांगितले. राज्यातील एलईडी पद्धतीच्या मच्छीमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक युवक मच्छीमारीकडे वळत नाहीत. एलईडी पद्धतीच्या मच्छीमारीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. परराज्यातील मच्छीमारी बोटी गोव्याच्या हद्दीत एलईडी पद्धतीने मच्छीमारी करीत आहेत. त्याचा फटका स्थानिक पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे, असेही आमदार लोबो यांनी सांगितले.
पर्यटकांकडून दंड
वसुलीमुळे चुकीचा संदेश
राज्यात वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात असल्याने चुकीचा संदेश जात आहे. यावर फेरविचार करण्याची गरज आहे. गोव्यातील फेणी ही हॅरिटेज ड्रिंक आहे. या फेणीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील पाण्याच्या वितरणामध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे, असेही आमदार लोबो यांनी सांगितले.
करविरहित अर्थसंकल्प : साळकर
राज्याचा वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प करविरहित आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी यांना प्राधान्यक्रम देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवदर्शन योजना लाभदायक आहे, असे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.
पर्यटनाला नवी दिशा
देण्याची गरज : डॉ. शेट्ये
राज्यातील पर्यटनाला नवीन दिशा देण्याची गरज आहे. पर्यटकांशी कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक होता कामा नये, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले. राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनामुळे युवा खेळाडूंना स्फूर्ती मिळणार आहे. तसेच, राज्याच्या क्रीडा विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभदायक असून पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी आमदार डॉ. शेट्ये यांनी केली.