मुक्तीलढ्यातील 15 शहिदांचा मरणोत्तर सन्मान करणार

0
2

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

>> 18 डिसेंबर रोजी पर्वरीत शहिदांच्या मुलांचा सन्मान करणार

पोर्तुगिजांविरुद्ध लढताना धारातीर्थी पडलेल्या 15 शहिदांचा मरणोत्तर सन्मान करण्यात येणार असून या शहिदांच्या मुलांचा प्रत्येकी 10 लाख रु. व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

19 डिसेंबर रोजी गोवा आपल्या मुक्तीचा 63वा दिवस साजरा करणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित करण्यात येणार असलेल्या एका विशेष सोहळ्यात हा सन्मान होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. 15 शहिदांपैकी 14 शहिदांच्या हयात असलेल्या पहिल्या पिढीतील व्यक्तींचा शोध घेणे शक्य झालेले आहे तर एका शहिदाच्या पहिल्या पिढीतील व्यक्तीचा शोध घेणे शक्य झालेले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोमंतकीय असलेले बाळा राया मापारी हे गोवा स्वातंत्र्यलढ्यातील धारातीर्थी पडलेले पहिले शहीद असून त्यांच्यासह कर्नल बेनिपाल सिंग, बसवराज हुडगी (कर्नाटक), शेषनाग वाडेकर (नाशिक), तुळशीराम हिरवे (महाराष्ट्र), सखाराम शिरोडकर, रोहिदास मापारी, यशवंत आगरवाडेकर, रामचंद्र नेवगी, बापू विष्णू गांवस, बाळा धोंडो परब, लक्ष्मण वेलिंगकर, केशवभाई सदाशिव टेंगसे, परशुमार आचार्य व बाबूराव केशव थोरात या शहिदांचा 18 डिसेंबर रोजी मरणोत्तर सन्मान होणार आहे. त्यांच्या पहिल्या पिढीतील वारसाला 10 लाख रु. व सन्मानचिन्ह देऊन हा सत्कार होणार आहे.

कर्नल बेनिपाल यांचा सन्मान
गोवा स्वातंत्र्यलढ्यातील आणखी एक शहीद कर्नल सिंह बेनिपाल यांच्या गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षी त्यांच्या विधवा पत्नी चरणजित कौर यांना 10 लाख रु. ची मदत देऊन आपण सन्मान केला होता. त्यासाठी आपण 27 सप्टेंबर 2022 या दिवशी लुधियाना पंजाब येथे जाऊन त्यांच्या वीरपत्नीचा सन्मान केला होता याची आठवण सावंत यांनी करून दिली. वरील शूरवीर शहिदांनी अन्य लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांसह गोवा मुक्तीसाठी मोठे योगदान दिलेले आहे मात्र, त्यांच्या या बलिदानाची गोवा सरकारने अद्याप दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्या पहिल्या पिढीतील व्यक्तीचा 10 लाख रु. व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्याचा आपल्या सरकारने निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पत्रादेवी येथे 30 शहीद
15 ऑगस्ट 1955 रोजी पुणेस्थित गोवा विमोचन साहाय्यक समिती या सत्याग्रहींच्या संघटनेने भारतभरातील युवकांना गोवा मुक्ती संग्रामात उडी घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी भारतभरातील 10 हजार नि:शस्त्र सत्याग्रहींनी गोव्याच्या वेगवेगळ्या सीमांवरून गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पत्रादेवी येथून 2500 सत्याग्रहींनी मध्यप्रदेश येथील सहोदरोवी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात घुसण्याचा प्रयत्नात केला होता. त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात सहोदरादेवी या जखमी झाल्या असता कर्नल सिंह बेनिपाल यांनी पोर्तुगीज सैनिकांना आपणावर गोळ्या झाडण्यासाठी ललकारले होते आणि त्यावेळी केलेल्या गोळीबारात ते धारातीर्थी पडले होते. या क्रांतीलढ्यात एकूण 70 जण शहीद झाले होते व त्यापैकी 30 जण हे पत्रादेवी येथे धारातीर्थी पडले होते, असे सावंत म्हणाले. कालांतराने सगळ्यांनाच या शहिदांचा विसर तर पडलाच शिवाय या शहिदांच्या कुटुंबीयांनाही गोवा मुक्तीनंतर न्याय मिळू शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर आपल्या सरकारच्यावतीने त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. या शहिदांच्या कुटुंबीयांसाठी आपण काही तर केले पाहिजे याची जाणीव आपणाला गोवा मुक्तीलढ्याच्या 60व्या वर्षी झाल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या
गोवा मुक्तीलढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आपण मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर मोठ्या संख्येने सरकारी नोकऱ्या दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. आता स्वातंत्र्यसैनिकांची फक्त 40 मुले सरकारी नोकऱ्यांसाठीच्या यादीत शिल्लक राहिली असल्याचे ते म्हणाले. त्यांनाही लवकरच सरकारी नोकरी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी जरी वयाची 50 वर्षे पूर्ण केलेली असली तरीही त्यांना सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जे स्वातंत्र्यसेनानी पोर्तुगीज सैनिकांच्या गोळीबारात शहीद झाले होते. त्यांचे मृतदेहसुद्धा पोर्तुगिजांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करू दिले नव्हते. त्यामुळे शहीद झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या पार्थिवांवर गोव्यातच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.