– परेश वासुदेव प्रभू
मुक्तिपूर्व गोव्यामध्ये अनेक प्रतिभावंत लेखक, कवी येथे होऊन गेले. आज काळाच्या ओघात त्यांची नावेही विस्मरणाच्या धुक्यात हरवत चालली आहेत. असेच एक कवी म्हणजे मूळचे शिवोलीचे वै. सगुण आत्माराम प्रभू मोये. प्रासादिक शब्दकळा, उत्तुंग कल्पनाशक्ती आणि सुधारणावादी पुरोगामी दृष्टिकोन यामुळे वेगळ्या ठरणार्या काव्यरचना करणार्या या एका जुन्या कवीची ही नव्याने करून दिलेली ओळख –
देव कुठे आहे?
दया हाच एक धर्म असे ठावा |
त्या जागी केशवा तिष्टशी तू ॥
क्षमा, शांती, प्रेम यांचा जो संगम |
तेथ तुझे धाम नारायणा ॥
दीन अनाथांसी आपुले म्हणती |
त्या जागी वसती नित्य तुझी ॥
ज्ञान-दीप जेथे जळे अविरत |
तेथे मूर्तिमंत वास तुझा ॥
कष्टाची भाकर खाती आनंदाने |
तेथ तुझे ठाणे देवराया ॥
हास्यमुखे बाळा पाजी माय पान्हा |
तेथ जनार्दना अससी तू ॥
स्पृश्यास्पृश्यतेचा असेना विटाळ |
आसन अढळ तेथ तुझे ॥
नसे द्वेष, हेवा, नसे दावा, निंदा |
ते स्थळ गोविंदा प्रिय तुजं ॥
अंतः कलहाचा जेथ होय अंत |
तेथ तू अनन्त राहतोसी ॥
नीच उच्च भाव जेथ हरपती |
ते स्थळ श्रीपती रूचे तुजं ॥
तुजं शोधायाला नको यातायात |
सत्याच्या मार्गात सापडसी ॥
सुरम्य उद्यानी हसतात फुले |
त्यात तुझे खुले रूप देवा ॥
निर्झर एकांती गाती मंजुगान |
ते आशीर्वचन होय तुझे ॥
रात्री चंद्रकला होय प्रकाशित |
त्यात तुझे स्मित दिसतसे ॥
वारा वाहुनिया निववी विश्वास |
तोच तुझा श्वास भगवंता ॥
सगुण निर्गुण वाद हा कशाला |
मज दुर्बलाला हवा देवा! ॥
मनोहर तुझे रूप चक्रपाणी |
निसर्ग-दर्पणी दिसतसे ॥
– वै. सगुण आत्माराम प्रभू मोये
गोवा मुक्तिपूर्व काळात डोकावताना एक गोष्ट आपल्याला विस्मयचकित करते, ती म्हणजे तेव्हाच्या शिक्षित पिढीची वैचारिक उंची, माध्यमे आणि साधने हाताशी नसतानाही जोपासलेला चौफेर व्यासंग, राष्ट्रीय प्रवाहाशी राखलेली बांधिलकी आणि उत्कट स्वातंत्र्याकांक्षा. तत्कालीन साहित्यामध्ये या गुणांचे लख्ख प्रतिबिंब पडलेले दिसते. ‘सत्संग’ पासून ‘प्रभात’, ‘भारत’, ‘भारतमित्र’ पर्यंत तत्कालीन नियतकालिकांमधून या वैचारिक परिपक्वतेचे दर्शन घडवणारे लेखन सतत घडते. याच साहित्यिकांच्या मांदियाळीतील एक रत्न आहे वै. सगुण आत्माराम प्रभू मोये. काळाच्या ओघात जे अनेक प्रतिभावंत गोमंतकीय साहित्यिक विस्मरणात गेले आहेत, त्यातील हे एक नाव. सुदैवाने त्यांच्या कुटुंबाने आपल्या आजोबांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित रचना ममत्वाने सांभाळून ठेवल्या, त्यामुळे गोमंतशारदेच्या गतवैभवाची साक्ष देणार्या या रचना आज हाताळता आल्या.
सगुण आत्माराम प्रभू मोये हे मूळचे शिवोलीचे. पोर्तुगीज सरकारच्या लँड सर्व्हे ऑफिसमध्ये अधिकारी असूनही त्यांनी विपुल काव्यलेखन केले. जन्म १० मार्च १८८३ रोजी साखळी येथे झाला आणि मृत्यू १६ जुलै १९५८ रोजी कालापूर येथे. म्हणजे ७५ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. जन्म साखळीचा असला आणि शिवोली हे मूळ गाव असले तरी नोकरीनिमित्ताने त्यांचा बहुतेक काळ कालापूर येथे गेला. ‘भारत’, ‘प्रभात’, ‘भारतमित्र’ सारख्या तत्कालीन नियतकालिकांमध्ये त्यांनी विपुल काव्यलेखन केले. त्यांची शेवटची कविता मृत्यूच्या केवळ तीन दिवस आधी त्यांनी लिहिली. ‘शेवटचे मागणे’ असे तिचे ह्रद्य शिर्षक आहे. ही त्यांची शेवटची रचनाही तितकीच ह्रद्य आहे. आपल्या संपूर्ण जीवनप्रवासाकडे त्यात त्यांनी वळून पाहिले आहे. ते म्हणतात –
‘‘एकामागुनि एकही गलितशी झाली अहा इंद्रिये |
साधे कामहि तें करू न शकती पूर्वीप्रमाणे स्वये |
आता देईल मृत्यु भेट अपुली येऊनियां सत्वरी |
तो येणार कधीतरी मज असे जाणीव याची पुरी’’
परंतु मृत्यूची चाहुल लागलेला हा कवी पुढे काय म्हणतो पाहा –
‘‘त्याची खंत नसे मला मरण हे कोणासही ना चुके |
प्राणी शक्त असो कितीही तरि ते केव्हां न टाळू शके |’’
‘‘येवो मृत्यु परी तदा मज दिसो तन्मूर्ती ती गोजिरी
गोपाळांसह धेनु चारित करीं घेऊनिया बांसरी’’
आणि मृत्युसमयी शेवटी आपल्या मुखात केवळ गोविंदाचे नाव असावे एवढीच अंतिम इच्छा हा मृत्युशय्येवरील कवी व्यक्त करतो.
तो म्हणतो, ‘‘येवो त्याच परी मुखीं घडिघडी त्वन्नाम ‘गोविंद’ रे |
जें गाता लव ताप दैन्य न उरे पापीही तो उद्धरे ॥
देवा आजवरी दिलेस बहु तू काही न केले उणे |
आता शेवटचे असे तव पदीं हे एवढे मागणे ॥
मृत्यूला सामोरा जाता जाताही केवळ गोविंदाचे नाव मुखी असावे एवढेच विनम्र मागणे मागणार्या या कवीच्या निःस्पृह संतवृत्तीचे प्रतिबिंब त्याच्या काव्यरचनांत उमटले आहे.
शब्दकळा, भाषासौष्ठव, कल्पनाशक्ती, गणमात्रांची शुद्धता या सगळ्या गुणांनी मंडित अशी त्यांची कविता आहे. त्या काळानुरूप भावभक्तीपर तर ती आहेच, परंतु समाजप्रबोधनपर आणि पुरोगामी विचार मांडणारी, दीनदुर्बलांप्रती सच्ची कणव व्यक्त करणारी ही कविता आहे आणि म्हणूनच काळाच्या पुढे जाणारी आहे. तत्कालीन गोमंतकीय शिक्षित समाजमानसाच्या सुधारणावादी मनोवृत्तीचे दर्शन या काव्यरचनांतून घडते. त्यामध्ये ईश्वरस्तुतीपर रचना आहेत, समाजप्रबोधनपर रचना आहेत, सामाजिक दंभावर विनोदी शैलीत प्रहार करणार्या रचना आहेत, शेतकर्यांचे, दीनदुर्बलांचे दुःख व्यक्त करणार्या रचना आहेत. असे वैविध्यपूर्ण काव्यलेखन करून आता विस्मरणात गेेलेल्या या गोमंतकीय कवीचा आणि त्याच्या कवितेचा परिचय येथे अभ्यासकांना करून द्यायचा आहे.
माशेलचा श्री देवकीकृष्ण हेे वै. सगुण आत्माराम प्रभू मोये यांचे कुलदैवत. त्यामुळे आपल्या या कुलदैवताची महती गायिणारे एक सुंदर अष्टक त्यांनी शार्दुलविक्रिडित वृत्तामध्ये रचले आहे.
‘‘भूमीभार हरावया भुजबळें दंडुनिया दुर्जना |
न्याय तापद पापराशि विलया रक्षावया सज्जनां ॥
झाला जो अवतार पूर्णविभवे श्री विष्णुचा आठवा |
तो हा देवकीकृष्ण ईश ह्रदयीं भावे सदा आठवा ॥ अशी त्याची सुंदर सुरूवात आहे. यातील ‘दंडुनिया दुर्जना’ सारखा साधलेला अनुप्रास किंवा ‘आठवा’ या शब्दावरचा श्लेष मोये यांच्या काव्यप्रतिभेची साक्ष देण्यास पुरेसा आहे. या रचनेत श्रीकृष्णाचे त्यांनी केलेले ‘‘नेसोनी कनकांबरा शिरिं धरी जो मोर पिच्छें बरी | माळा कंधारि वत्सलांछन उरीं घेई करी बांसरी |’’ हे वर्णनही सुंदर आहे.
श्री लक्ष्मीनारायण हे शिवोलीचे ग्रामदैवत. त्याचेही असेच श्री लक्ष्मीनारायणाष्टक श्री. मोये यांनी रचले आहे.
‘‘ज्याचे मंगल नाम नित्य जपतां जातात पापें लया ॥
आधि व्याधि समग्र जाति विलया थारा मिळेना भया ॥
रंकाते करि राव भाव धरितां देऊनियां आसरा ॥
दीनोद्धारक त्या सदैव लक्ष्मीनारायणातें स्मरा ॥
गाती नारद तुंबरादि अवघे कीर्ती जयाची भली ॥
ब्रह्मा, शंकर, इंद्र, चंद्र जपती त्याचीच नामावली ॥
दोन्हीं पार्श्वीं उभे गरूड हनुमान् जोडून भावें करा ॥
दीनोद्धारक त्या सदैव लक्ष्मीनारायणातें स्मरा ॥
‘‘साजे दिव्य गळ्यात कौस्तुभ मणी कर्णद्वयी कुंडले ॥
माथां शोभतसे किरीट भवती तत्तेज विस्तारले ॥
हस्तीं अंबुज, शंख, चक्रहि गदा नेसे सुपीतांबरा ॥
दीनोद्धारक त्या सदैव लक्ष्मीनारायणातें स्मरा ॥
असे हे सारे गुणवर्णन करताना मोये यांच्या शब्दकळेचा विलास मन मोहून टाकतो. ह्या रचनेवर आश्विन शुद्ध दशमी शके १८७४ ही तारीख आहे. म्हणजे ही रचना २ ऑक्टोबर १९५२ ची आहे.
त्या काळाशी सुसंगत भक्तीभावपूर्ण रचना मोये यांनी विपुल केल्या. श्रीविष्णूच्या चोवीस नावांवरील त्यांचे एक काव्य ‘भारतमित्र’ मधून प्रकाशित झाले होते. केशी नावाच्या दानवाचा वध केला म्हणून भगवान विष्णूला ‘केशव’ नाव पडले किंवा जगाच्या प्रारंभीच जल निर्मून तिथे वास केला म्हणून ‘नारायण’ हे नाव आले, लक्ष्मीचा पती म्हणून तो ‘माधव’ बनला, पृथ्वीचा उद्धारक म्हणून ‘गोविंद’ झाला अशी विविध नावांची कथा काव्यरूपामध्ये त्यांनी त्यात वर्णिली आहे.
सारस्वत समाजाचे स्वामी श्री गोकर्ण पर्तगाळी मठाधीश श्रीइंदिराकांततीर्थ यांची प्रशंसा वै. सगुण मोये यांनी संस्कृतमधून केली होती. जे सकळ सद्गुणांनी युक्त आहेत, वैराग्यच ज्यांचा महत्त्वाचा अलंकार आहे, जे नाना शास्त्रांत पारंगत आहेत, ज्यांनी भारतवर्षात चारही दिशांतील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले आहे, ज्यांचे प्रवचन सर्वत्र प्रसिद्ध असून मंगलकारक असते असे हे स्वामी सदैव आमच्या कल्याणासाठी असोत असा पूज्यभाव त्यातून व्यक्त झाला आहे.
विशेष म्हणजे याच संस्कृत प्रशंसेचा पंचवीस आर्यांमधून केलेला मराठी काव्यानुवादही तितकाच भावभक्तीपूर्ण आहे. ही रचना १९२४ सालची आहे. म्हणजे वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी ती केली होती.
कालापूर येथे आपल्या राहत्या घराशेजारील भाग त्यांनी शांतादुर्गा विद्यालय नामक शाळेला मोफत दिला होता. स्वतःही ते तेथे अध्यापन करीत असत. या शाळेच्या मुलांसाठी त्यांनी एक सुंदर शारदा स्तवन रचिले होते.
‘‘चला गडे पुुजुं शारदा माय | विद्या, बुद्धि, ज्ञान दायिनी धरुया प्रेमे पाय ॥ धवल वसन नेसुनी विराजे | करीं विणा मयुरावरि साजे ॥ विमल जिचें यश त्रिभुवनि गाजे | ध्यातां कलिमल जाय ॥ चला गडे पुजुं शारदा माय ॥
भाळी कुंकुम टिळक मनोहर | हास्यवदन किति रदनहि सुंदर | चमके मणिमय मुकुट शिरावर | शशिसम सुरुचिर काय ॥ चला गडे पुजुं शारदा माय ॥ असे हे शारदास्तवन ‘कसा तरि तारील पंढरिराय’ या पदाच्या चालीवर शाळेत म्हटले जात असावे.
साहित्य सेवक मंडळ ही गोव्यातील एक जुनी साहित्यसंस्था. गतकाळातील प्रतिभावान साहित्यिकांच्या प्रतिभेचे नवोन्मेष प्रकटविण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ असा त्या काळी तिचा लौकीक होता. वेळोवेळी समकालीन साहित्यिकांच्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन घडवणारे संग्रह या संस्थेने प्रकाशित केले. १९३० साली असाच एक ‘काव्यकुंज’ संस्थेने प्रकाशित केला होता, त्यात सगुण मोये यांच्या तीन कविता समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
या ‘काव्यकुंज’मध्ये समाविष्ट झालेल्या ‘देव कुठे आहे?’ या अभंग रचनेमध्ये ‘‘क्षमा, शांती, प्रेम यांचा जो संगम | तेथ तुझे धाम नारायणा ॥ दीन अनाथांसी आपुले म्हणती | त्या जागी वसती नित्य तुझी ॥ ‘‘ज्ञान दीप जेथे जळे अविरत | तेथे मूर्तिमंत वास तुझा ॥ कष्टांची भाकर खाती आनंदाने | तेथ तुझे ठाणें देवराया ॥ सांगूनच ते थांबत नाहीत. ‘स्पृश्यास्पृश्यतेचा असेना विटाळ | आसन अढळ तेथ तुझे ॥ असेही सांगण्याचे धैर्य त्या काळी कवीने दाखविले आहे. ‘‘नसे द्वेष हेवा, नसे हाव निंदा | ते स्थळ गोविंदा प्रिय तुज’’ किंवा ‘‘अंतःकलहाचा जेथ होय अंत | तेथ तू अनन्त राहतोसी ॥ नीच उच्च भाव जेथ हरपती | ते स्थळ श्रीपती रुचे तुज ॥ असे अत्यंत सहजसुंदर प्रासादिक शब्दांमध्ये कवी सांगून गेला आहे. ‘‘तुज शोधायाला नको यातायात | सत्याच्या मार्गात सापडसी ॥ असे कवी नमूद करतो.
ही विस्तृत रचना शब्दलालित्य, भावगर्भता आणि विचार या सर्व अंगांनी एवढी परिपूर्ण आहे की खरे तर गोव्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश व्हायला हवा. सुरम्य उद्यानामध्ये जिथे फुले हासतात, त्यात परमेश्वराचेच रूप खुलत असते, निर्झराचे मंजुळगान हे त्याचेच आशीर्वचन असते, रात्री चंद्रकळा जेव्हा प्रकाशित होते तेव्हा ती जणू परमेश्वराचे स्मित असते, वाहणारा वारा हा त्याचा श्वास आहे, मनोहर असे त्याचे रूप निसर्गदर्पणी दिसत असते अशा अतिशय सुंदर कल्पना कवीने या रचनेमध्ये कल्पिल्या आहेत. अग्रणी कवींच्या काव्यरचनांच्या मालिकेमध्ये निःसंशय शोभावी अशी ही रचना आहे.
ज्या भावपूर्णतेने सगुण मोयेंनी भक्तिभावपूर्ण रचना केल्या, तेवढ्याच वात्सल्यभावाने अंगाईगीत देखील लिहिले आहे. ‘निजसि न कां अजुनी, बाळा, निजसि न का अजुनी’ ही अंगाई आणि ‘‘टकमक बघसी उघडुनी डोळे | हळुच वाजविसी घुंगुरवाळे | हात फिरवुनी करिसी चाळे | हससी खुदखुदुनी’’ असे त्यातील शब्दांचे नादमाधुर्य काही खासच आहे.
‘मुलगा आणि पाखरू’ या कवितेमध्ये कवीने पाखराला पकडून पिंजर्यात बंदिस्त करू पाहणार्या मुलाशी त्या पाखराने केलेला संवाद आणि त्यातून त्या मुलाचे झालेले ह्रदयपरिवर्तन फार सुंदररीत्या रेखाटले आहे. परंतु ही कविता केवळ त्या पाखराच्या पारतंत्र्याची खचितच नाही. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या गोव्याची आसच जणू कवीने त्या रूपकातून व्यक्त केलेली आहे.
‘‘म्हणसी मजला सुरम्य पंजरि ठेविन बहु आदरे | परी ते सौख्य नव्हे ना खरें ॥ उत्तम चारा – दाणा देशिल नित्य मला खावया | मधुरसे पाणीही प्यावया ॥ देशील बोरें, पेरु, अंजिरे, गोड फळे बहु बरीं | वाटतिल विषवत् मज ती परी ॥ हे पाखरू सुनावते आहे. ‘‘कैदेमाजी कंठुनि जीवित सौख्य कुणाला भले | सांग मज आजवरी लाभले?’’ हा त्या पाखराचा सवाल जणू पारतंत्र्यात खितपत पडलेल्या गोमंतमातेचाच आपल्या सुपुत्रांना केलेला सवाल नव्हता काय?
परवशतेपेक्षा मृत्यू हा शतगुणे बरा असतो. ‘‘म्हणुनिच चालति पहा जगीं ही स्वातंत्र्याकारणे | कितितरी थोर भयंकर रणे ॥ याचीही आठवण कवीने करून दिलेली आहे.
स्वातंत्र्याची अशी महती निर्भीडपणे गाणारा हा कवी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे अग्रणी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा गुणगौरव केल्याविना कसा बरे राहील? ‘महात्म्याचा गुणगौरव’ ही त्याची कविता कै. गोविंद पुं. हेगडे देसायांच्या ‘भारत’ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘‘सूर्याच्या दीप्तिहुनी दिव्य शतगुणें प्रकाश सत्याचा ॥ हा सिद्धांत कृतीने दावी जगता करूनिया साचा ॥ ’’ अशा या महात्म्याच्या दीनोद्धाराच्या कार्याचे, निःस्पृह वृत्तीचे कवीने भरभरून कौतुक केले आहे. ‘‘दीनातें रक्षाया बलवानासी सुखें करी समर ॥ झुंजार वीर खंदा, नच चमके जरि करांत समशेर!’’
‘‘बाहेरून जसा सदा शुचि दिसे तैसाच तो अंतरी’’असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अभीष्टचिंतनपर त्यांची कविताही ‘भारत’ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘‘धीरोदात्त, उदार त्या नरवरा रक्षो सदा श्रीहरी’’ हे त्या काव्याचे ध्रुवपद आहे.
‘‘स्वातंत्र्यास्तव जो बलाढ्य रिपुशी भांडे, लढे सर्वदा | विश्रांती नच घे, तरी लवभरी भागे थकेना कदा ॥ प्रासादांतील सौख्य तुच्छ गणुनी जो बंदिवासा वरी | धीरोदात्त, उदार त्या नरवरा रक्षो सदा श्रीहरी’’ अशी प्रार्थना कवीने केली आहे.
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. त्यानंतर ‘भारत’च्या ४ मार्च १९४८ च्या अंकात सगुण मोये यांची ‘यापुढे?’ ही कविता प्रसिद्ध झाली. आता यापुढे गांधींसारखा कोण बरे होईल असा आर्त सवाल त्यात कवीने केला आहे.
केवळ गांधी आणि नेहरूच नव्हेत, सरदार पटेलांचे वडील बंधू आणि स्वराज्य पक्षाचे सहसंस्थापक विठ्ठलभाई पटेल, ‘हिंदु धर्म भास्कर’ पं. मदनमोहन मालवीय, लालबहादूर शास्त्री यासारख्या राष्ट्रनेत्यांच्या निधनानंतर सगुण मोये यांनी त्यांना काव्यांजली वाहिली.
परक्याला संतुष्ट करण्यासाठी तहान भूक विसरून जे आयुष्य वेचतात, त्यांना सगळे देवासारखे मानतात. जगात अशा आत्मयज्ञावाचून दुसरा श्रेष्ठ यज्ञ नाही असे प्रतिपादन एका रचनेत कवीने केले आहे.
सगुण प्रभू मोये यांनी एक वैभवशाली असे ‘हिंदगीत’ही लिहिले आहे.
‘‘प्रभातकाळी हिंद जननितें प्रेमभरे गाऊ | आनंदाचे धाम सुमंगल नाम मुखे गाऊ |’’ ४४ कडव्यांच्या या प्रदीर्घ रचनेमध्ये भारतभूच्या निसर्गसौंदर्याचे आणि उत्तुंग परंपरेचे दर्शन त्यांनी सुंदर शब्दांमध्ये घडविले आहे.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्याचे दुःखही त्यांच्या कवितांत प्रकटले आहे. शिखरिणी वृत्तातील ‘शेतकरी’ या कवितेत ‘‘खरा तू पोशिंदा अससि अमुचा खास जगती | शकेना वर्णाया लवहि तव थोरी मम मती’ असे कवी म्हणतो.
‘‘राबे शेतकरी अहर्निश जरी शेतामध्ये सर्वदा | साहोनी जलवृष्टि अन हिमही वातादि त्या आपदा | यत्नाने पिकवीत धान्य, परि तो दाणा मिळेना घरी, पोरे ओरडती क्षुधार्त, उलटी ही खूण आहे खरी’’ ही शेतकर्याची व्यथा व्यक्त करणारी त्यांची ‘उलटी खूण’ ही शार्दुलविक्रिडितातील रचना ४ नोव्हेंबर १९४८ च्या ‘भारत’ मध्ये प्रकाशित झाली. या कवितेत केवळ शेतकर्याचीच व्यथा नाही. सूत कातून वस्त्रे विणणार्या विणकराला अंग झाकायलाही वस्त्र मिळत नाही, गुळाच्या गोण्या घेऊन जाणार्या हमालाच्या मुखात त्याचा अंशही जात नाही, चिर्याच्या खाणीत राबणारे कामगार वाडे बांधतात, पण साध्या ओसरीवर त्यांना जन्म काढावा लागतो, अशा विविध दीनदलितांच्या व्यथा या प्रदीर्घ रचनेत त्यांनी शब्दबद्ध केल्या आहेत.
दीनदुर्बलांचे दुःख दूर सारल्यानंतर त्यांच्या मुखी विलसणारे हास्य हीच खरी दिवाळी अशी भावना सगुण मोये यांनी आपल्या ‘दिपवाळी’ या कवितेत व्यक्त केली आहे. ‘‘आनंदाचे हास्य हाच खरा दीप | फिके त्यासमिप दीप सारे | कशास ते झेंडे कागद, वस्त्रांचे? ध्वज सुकीर्तीचे फडकावा’’ असा संदेश कवीने त्यात दिला आहे.
‘‘खाऊन पक्वान्ने नाना काय सुख? शमेना जो भूक क्षुधितांची | खपून सतत करा शेतीभाती | देशाची दुःस्थिती दूर करा ॥ मग लावा सुखे नळे, चंद्रज्योती | फुलबाज्या वाती हव्या तशा ॥ असे कवीने सुनावले आहे.
१० मार्च १९४९ च्या ‘भारत’ मध्ये कवीची ‘हरिजनांची कैफियत’ ही कविता प्रसिद्ध झाली आहे. अस्पृश्यांची कैफियत त्यात कवीने रोखठोक शब्दांत मांडली आहे.
‘भले कोण?’ या १९४९ साली ‘भारत’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितेत नर्म विनोदाची डूब देत काळा बाजार आणि फसवणुकीचा व्यवहार करणार्यांवर कवीने मनसोक्त ताशेरे ओढले आहेत. नारळ विकत घ्यायला भाटकाराकडे जावे तर तो शंभर नारळांना वीस रुपये भाव सांगतो, पण लहान मोठ्या नारळांना मात्र एकच दर लावतो. वर ‘‘हाताची बघ ताडुनि बोटें एकसारखी नसती खास’’ असे त्याचे समर्थनही करतो. किंवा खंडीभर भात घ्यायला शेतकर्याकडे जावे तर त्यात अर्धी फोलपटे आढळतात. त्यावर जाब विचारला तर ‘हवे तर ने नाही तर ठेव’ असे तो सुनावतो. आपली कैफियत सांगायला वकिलापाशी जावे तर ‘‘कोंसुल्ताची फी दिल्यावीण | काम सर्वथा हातिं न घेत’’ आणि संकटकाळी डॉक्टरकडे जावे तर तो रोग्याला बघायला जायला मोटार मागतो अशी एकेकाची बुरखेफाड कवीने झकास केली आहे. ड्रायव्हर मोटारीत पाच सीट असताना आठ उतारू घेतो. विचारायला जावे तर ‘‘जा पायांनी चालुन वाट’’ असे सुनावतो. खाणावळीत जेवायला जाल तर शिळे पाके वाढले जाते. ‘‘जेव न पेक्षा रहा उपाशी’ असे वर सुनावतो, चहा प्यायला हॉटेलात जावे तर दोन आण्यांचा चहा प्यायल्यावर घसाही ओला होत नाही एवढा तो कमी असतो. मिठाईवाला तुपाऐवजी भुईमुगाच्या तेलात मिठाई बनवतो आणि ‘सांगे परि बापाचे मोल’ असे कवी म्हणतो. शुद्ध दूध मागायला जावे तर बारा आणे दर लावला जातो, पण ‘खास परी ते पातळ पाणी, आंत दुधाच्या चारच धारा’ असा अनुभव येतो अशी एकेकाची उडवलेली खिल्ली खास आहे.
मराठी साहित्यविश्वातील अग्रणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, तात्यासाहेब केळकर यांच्यावरही त्यांच्या कविता तत्कालीन नियतकालिकांतून प्रकाशित झाल्या. त्यातही त्यांच्या बहुतेक कविता ‘भारतमित्र’ मधून सातत्याने प्रकाशित झाल्या.
सगुण प्रभू मोये यांच्या मृत्यूसमयीची एक ह्रद्य घटना त्यांचे नातू अशोक कृष्ण प्रभू मोये यांनी एका लेखात नमूद केली आहे. सगुण मोये हे ‘भारतमित्र’चे केवळ लेखकच नव्हेत, तर आजीवन वर्गणीदारही होते. परंतु ना. भा. नायक यांचा ‘भारतमित्र’ प्रसिद्ध होई रिवणहून आणि सगुण मोयेंचे वास्तव्य होते कालापूरला. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे रिवणला जाऊन ‘भारतमित्र’कारांची भेट घेणे त्यांना शक्य नव्हते. शेवटी ना. भा. नायकच आपल्या या ज्येष्ठ कविमित्राला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कालापूरला आले. दोघांची भेट झाली, पण तेव्हा मोये यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांना नायकांशी खूप बोलायचे होते, परंतु तेवढे त्राण शरीरात नव्हते. त्यांनी ही भावना नायकांपाशी व्यक्त केली. ‘‘फार फार बोलायचे होते, पण तुम्ही अखेरीस आलात. आता बोलण्याची ताकद नाही’’ ह्या त्यांच्या उद्गारांनी ‘भारतमित्र’कारही हेलावून गेले. आणि दैवदुर्विलास म्हणजे या भेटीनंतर तीनच दिवसांनी सगुण मोये यांची प्राणज्योत मालवली.
गोमंतभूमीचा एक प्रतिभावान कवी अनंताच्या यात्रेला निघून गेला. मागे उरल्या आहेत त्या अभिजात मराठी साहित्याच्या दुधावर पोसलेल्या गोव्याच्या मागील पिढीची वैचारिक उंची, तिचा व्यासंग आणि भाषेवरील प्रभुत्व याच्या आठवणी ताज्या करणार्या ओजस्वी काव्यरचना. ‘भारतमित्र’ कार ना. भा. नायकांनी या कवीची तुलना पोर्तुगीज कवी ‘कामोईश’ शी केली होती. त्यांच्या काव्याचा परिचय करून देताना त्यांनी लिहिले होते, ‘‘यांचा एखादा काव्यसंग्रह किंवा काव्यपुस्तक प्रकाशनांत आलेले नाही. तथापि जुन्या कवींची काव्यसंपदा डोळ्यांपुढे येताच कविवर्य मोये यांचीही आठवण झाल्यावाचून राहात नाही.’’
आता मुक्त गोव्यात तरी साहित्य संस्कृतीसाठी काम करणार्या संस्थांनी या प्रतिभावंत कवीच्या काव्यरचना संग्रहरूपाने आणण्यासाठी पुढाकार घ्यायला हरकत नसावी.