मुंबई-पंजाबसमोर पुन्हा लय मिळविण्याचे आव्हान

0
139

मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात आज गुरुवारी यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या पर्वातील तेराव्या लढतीत आमनेसामने येणार आहे. अबुधाबीतील शेख जायद स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ संतुलित असून गेल्या सामन्यांतील पराभव विसरून पुन्हा विजयी लय प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतील.

मुंबई इंडियन्स संघाने आपला सलामीचा सामना गमावला होता. त्यानंतर दमदार पुनरागमन करताना कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले होते. परंतु तिसर्‍या लढतीत त्यांना आरसीबीकडून पराभूत व्हावे लागले होते. कीरॉन पोलार्ड आणि ईशान किशन यांच्या शानदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून मिळालेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सामना ‘टाय’ झाल्यानंतर ‘सुपर ओव्हर’ पराभव स्वीकारावा लागला होता. किंग्स इलेव्हन पंजाबने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध २२४ धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु त्याचा बचाव त्यांना करता आला नव्हता. पंजाबनेही आपला पहिला सामना गमावलेला आहे. तर दुसर्‍या सामन्यात विजय मिळविलेला आहे. दोन्ही संघांचे वैशिष्ट्‌य म्हणजे दोघांनीही प्रत्येकी एक लढत ‘सुपर ओव्हर’मध्ये गमावलेली आहे. त्यामुळे दोघांनाही त्यांनी गेल्या लढतींत केलेल्या चुका सुधारण्याची आवश्यकता आहे. दोन्ही संघांत मोठे बदल होण्याचीही शक्यता कमीच आहे.

दोन्ही संघांकडे चांगली फलंदाजी व गोलंदाजीची फळी आहे.
मुंबईसाठी विराट कोहली पुन्हा लय मिळविणे अत्यावश्यक आहे. क्वींटन डी कॉक अजूनही मोठी खेळी करू शकलेला नाही आहे. गेल्या सामन्यात ईशान किशन आणि कीरॉन पोलार्डने विस्फोटक खेळी केली होती. त्यांच्याकडून याही सामन्यात तशाच खेळीची अपेक्षा कर्णधाराला असेल. दुसर्‍या लढतीत अर्धशतकी कामगिरी केलेला सूर्यकुमार यादवही गेल्या सामन्यात अपयशी ठरला होता. त्याला खातेही खोलता आले नव्हते. परंतु आज तो पुन्हा लयीत येण्याचा प्रयत्न करेल. हार्दिक पंड्या अजून अष्टपैलू कामगिरी करण्यात कमी पडत आहे. गोलंदाजीत मुंबई इंडियन्स संघ अजून प्रभावी मारा करू शकलेली नाही आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह बराच महागडा ठरत आहे. जेम्स पॅटिंसनने चार षटकांसाठी ५१ धावा मोजल्या होत्या व त्याला एकही बळी मिळविता आला नव्हता. त्यामुळे तेज गोलंदाजीची धूरा ट्रेंट बोल्टवर असेल. राहुल चहर काहीसा प्रभावी ठरत आहे.

दुसर्‍या बाजूने किंग्स इलेव्हनचा कर्णधार लोकेश राहुल पूर्ण बहरात आहे. मयंक अग्रवालही चांगल्या धावा जमवित आहे. परंतु दोन महत्त्वाचे विदेश खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन अजून संघासाठी जास्त धावा जमवू शकलेले नाही आहेत. मुंबईला पराभूत करायचे असेल तर त्यांना आज धडाकेबाज खेळी कराव्या लागतील. गोलंदाजीत मोहम्मद शमी बरीच प्रभावी कामगिरी करीत आहे. रवी बिश्नोई व ग्लेन मॅक्सवेल उपयुक्त मारा करीत आहे. परंतु विंडीजचा डावखुरा गोलंदाज शेल्डन कॉटरेल गेल्या सामन्याचा व्हिलन ठरला होता. त्याला राहुल तेवातियाने एकाच षटकात तब्बल पाच षटकार खेचल्याने विजयाकडे वाटचाल करणार्‍या पंजाबच्या हातून सामना निसटला होता. आता आजच्या सामन्यात कर्णधार त्याच्यावर विश्‍वास दाखवतोय की अन्य एखाद्या गोलंदाजांला स्थान देतोय ते पहावे लागेल. पंजाबचा विस्फोटक सलामीवीर ख्रिस गेलला अजूनही अंतिम अकरात स्थान मिळालेले नाही आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत झळकावलेली शतके ही पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर आहेत. त्यामुळे पंजाबशी दोन हात करताना या दोन फलंदाजांना लवकर बाद करण्यासाठीचा ‘प्लॅन’ मुंबईकडे तयार असल्याची माहिती गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने दिली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब (संभाव्य) : मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, सरफराज खान, जेम्स नीशम, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान.
मुंबई इंडियन्स (संभाव्य) ः क्वींटन डी कॉक (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चहर, जेम्स पॅटिंसन, ट्रेंट बौल्ट, जसप्रीत बुमराह.