>> रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा
मुंबई ते गोवा मार्गावर लवकरच मध्यम गतीची रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणा काल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. यामुळे वेळेची बचत तसेच गोव्यातील पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
कडवई आणि इन्नंजे या नव्या रेल्वे स्थानकांच्या शिलान्यास समारंभावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये रीमोट कंट्रोलद्वारे हा समारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर कोकण रेल्वे सिएमडी संजय गुप्ता, बिट्स पिलांनीचे संचालक शशिकांत पुनिकेत व वेनुगली राव उपस्थित होते.
श्री. प्रभू म्हणाले की, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ या राज्यांना जोडणार्या कोकण रेल्वेमुळे संपूर्ण देशातील लोकांना फायदा होतो आहे. २५ वषार्र्ंपूर्वी एकेरी मार्गावरून चालत असलेली ही कोकण रेल्वे मार्गाचे आता लवकरच दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मोठ्या प्रमाणात लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यास तत्पर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संगमेश्वर आणि अरवली रोड स्टेशनपासून १६३ कि. मी. अंतरावर कडवई रेल्वेस्थान ९.७५ कोटी खर्चून बांधण्यात येणार आहे. त्यामुळे २५ शहरांना त्याचा फायदा होणार आहे. २४ महिन्यांच्या कार्यकाळात हे रेल्वे स्थानक पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. तसेच इन्नंजे हे रेल्वे स्थानक पंडूबीद्री आणि उडपी या शहरांना जोडणारे असून हे स्थानक ११.३४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. त्यामुळे शंकरपुरा, सुभाषनगर, कटपडी, मनचकल, शिखा, पडूवर या शहरातील लोकांना फायदा होणार
आहे.