मुंबई इंडियन्स आयपीएलच्या अंतिम फेरीत

0
231

>> स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची सहावी वेळ

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ‘क्वॉलिफायर १’मध्ये ५७ धावांनी पराभव करत इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमाची अंतिम फेरी गाठली. स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करण्याची मुंबईची ही सहावी वेळ आहे. मुंबईने विजयासाठी ठेवलेले २०१ धावांचे विशाल लक्ष्य दिल्लीला पेलवले नाही. दिल्लीला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली. पराभवानंतरही दिल्लीचे आव्हान आटोपलेले नाही. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार्‍या ‘एलिमिनेटर’ सामन्यातील विजेत्याशी त्यांचा ‘क्वॉलिफायर २’ मध्ये सामना होणार आहे.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अश्‍विनने मुंबईचा कर्णधार रोहितला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. डी कॉक व सूर्यकुमार यांनी दुसर्‍या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी फुलत असताना अश्‍विन पुन्हा एकदा दिल्लीच्या मदतीला धावला. त्याने डी कॉकला तंबूत पाठवले. १२व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावून दिल्यानंतर सूर्यकुमार बाद झाला. नॉर्केच्या गोलंदाजीवर लॉंग लेगवर सॅम्सने त्याचा झेल घेतला. कायरन पोलार्डकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, अश्‍विनने त्याला भोपळाही फोडू दिला नाही. दुसर्‍या टोकाने ईशान किशनने फटकेबाजी सुरूच ठेवली. कृणालही (१३) अपयशी ठरला. हार्दिकने ५ षटकारांसह केवळ १४ चेंडूंत नाबाद ३७ धावा चोपत मुंबईला द्विशतकी धावसंख्या उभारून दिली.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बुमराह व बोल्ट यांनी दिल्लीची ३ बाद ० अशी स्थिती केली. शॉ, धवन व रहाणे यांना भोपळाही फोडता आला नाही. मार्कुस स्टोईनिस याने ४६ चेंडूंत ६५ धावा करताना अक्षर पटेलला सोबत घेऊन सहाव्या गड्यासाठी ७२ धावा जोडल्या. परंतु, आवश्यक धावगती अवाक्याबाहेर गेल्याने त्याची खेळी संघाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने टी-ट्वेंटीमधील आपली सर्वोत्तम कामगिरी करत ४ षटकात एक निर्धाव षटकासह १४ धावांत ४ गडी बाद करत दिल्लीचे कंबरडे मोडले. जायबंदी झाल्यामुळे बोल्ट केवळ २ षटके गोलंदाजी करू शकला. अश्‍विनदेखील दुखापतीमुळे आपल्या नेहमीच्या नवव्या स्थानी फलंदाजीस उतरला नाही.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः क्विंटन डी कॉक झे. धवन गो. अश्‍विन ४०, रोहित शर्मा पायचीत गो. अश्‍विन ०, सूर्यकुमार यादव झे. सॅम्स गो. नॉर्के ५१ (३८ चेंडू, ६ चौकार, २ षटकार), ईशान किशन नाबाद ५५ (३० चेंडू, ४ चौकार, ३ षटकार), कायरन पोलार्ड झे. रबाडा गो. अश्‍विन ०, कृणाल पंड्या झे. सॅम्स गो. स्टोईनिस १३, हार्दिक पंड्या नाबाद ३७ (१४ चेंडू, ५ षटकार), अवांतर ४, एकूण २० षटकांत ५ बाद २००
गोलंदाजी ः डॅनियल सॅम्स ४-०-४४-०, रविचंद्रन अश्‍विन ४-०-२९-३, कगिसो रबाडा ४-०-४२-०, अक्षर पटेल ३-०-२७-०, ऍन्रिक नॉर्के ४-०-५०-१, मार्कुस स्टोईनिस १-०-५-१
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. डी कॉक गो. बोल्ट ०, शिखर धवन त्रि. गो. बुमराह ०, अजिंक्य रहाणे पायचीत गो. बोल्ट ०, श्रेयस अय्यर झे. शर्मा गो. बुमराह १२, मार्कुस स्टोईनिस त्रि. गो. बुमराह ६५, ऋषभ पंत झे. यादव गो. कृणाल ३, अक्षर पटेल झे. चहर गो. पोलार्ड ४२, डॅनियल सॅम्स झे. डी कॉक गो. बुमराह ०, कगिसो रबाडा नाबाद १५, ऍन्रिक नॉर्के नाबाद ०, अवांतर ६, एकूण २० षटकांत ८ बाद १४३
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट २-१-९-२, जसप्रीत बुमराह ४-१-१४-४, कृणाल पंड्या ४-०-२२-१, नॅथन कुल्टर नाईल ४-०-२७-०, कायरन पोलार्ड ४-०-३६-१, राहुल चहर २-०-३५-०