मुंबईला गवसला पहिला विजय

0
114

>> रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या ९२ धावा व्यर्थ

इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील काल मंगळवारी झालेल्या १४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ४६ धावांनी पराभव करत यंदाच्या पर्वातील आपला पहिला विजय नोंदविला.

विजयासाठी २१४ धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव ८ बाद १६७ धावांत रोखण्यात मुंबईला यश आले. आरसीबीचा कर्णधार कोहलीने नाबाद ९२ धावा करत एकहाती किल्ला लढविला. त्याने आपल्या या खेळीदरम्यान सुरेश रैनाला (४५५८) मागे टाकत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळविला. विराटच्या नावावर आता ४६१९ धावांची नोंद झाली आहे.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळी करत केलेली ९४ धावांची खेळी आणि त्याला इविन लुईसने दिलेली साथ, या जोरावर मुंबईने बंगलोरसमोर २१४ धावांचे आव्हान ठेवले. उमेश यादवने पहिल्याच षटकात सुर्यकुमार यादव आणि इशान किशनला त्रिफळाचीत करत मुंबईची दोन बाद शून्य अशी केविलवाणी स्थिती केली. विंडीजचा डावखुरा स्फोटक सलामीवीर इविन लुईस (६५ धावा, ४२ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार) याने रोहित शर्मा (९४ धावा,५२ चेंडू, १० चौकार, ५ षटकार) याच्यासह १०८ धावांची भागीदारी करत संघाला शतकी उंबरठा ओलांडून दिला.
लुईस मैदानावर असेपर्यंत रोहितने अधिक धोका पत्करला नाही. परंतु, तिसर्‍या गड्याच्या रुपात लुईस बाद झाल्यानंतर रोहितने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. आरसीबीच्या नवख्या व अननुभवी गोलंदाजांवर तुटून पडताना त्याने आपल्या आक्रमकतेचे दर्शन घडवले. षटकार मारून शतक साजरे करण्याच्या प्रयत्नात असताना तो शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाला. रोहितचे वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. याच जोरावर मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या रचण्यात यश मिळविले.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः सूर्यकुमार यादव त्रि. गो. उमेश ०, इविन लुईस झे. डीकॉक गो. अँडरसन ६५, ईशान किशन त्रि. गो. उमेश ०, रोहित शर्मा झे. वोक्स गो. अँडरसन ९४, कृणाल पंड्या धावबाद १५, कायरन पोलार्ड झे. डीव्हिलियर्स गो. वोक्स ५, हार्दिक पंड्या नाबाद १७, मिचेल मॅकलेनाघन नाबाद ०, अवांतर १७, एकूण २० षटकांत ६ बाद २१३
गोलंदाजी ः उमेश यादव ४-०-३६-२, ख्रिस वोक्स ३-०-३१-१, वॉशिंग्टन सुंदर २-०-३२-०, मोहम्मद सिराज ४-०-३४-०, युजवेंद्र चहल ३-०-३२-०, कोरी अँडरसन ४-०-४७-२
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः विराट कोहली नाबाद ९२, क्विंटन डी कॉक त्रि. गो. मॅकलेनाघन १९, एबी डीव्हिलियर्स झे. हार्दिक गो. मॅकलेनाघन १, मनदीप सिंग यष्टिचीत किशन गो. कृणाल १६, कोरी अँडरसन झे. ड्युमिनी गो. कृणाल ०, वॉशिंग्टन सुंदर झे. यादव गो. कृणाल ७, सर्फराज खान यष्टिचीत तरे गो. मार्कंडे ५, ख्रिस वोक्स झे. कृणाल गो. बुमराह ११, उमेश यादव झे. शर्मा गो. बुमराह १, मोहम्मद सिराज नाबाद ८, अवांतर ७, एकूण २० षटकांत ८ बाद १६७
गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह ४-०-२८-२, कृणाल पंड्या ४-०-२८-३, मिचेल मॅकलेनाघन ३-०-२४-२, मुस्तफिझुर रहमान ४-०-५५-०, मयंक मार्कंडे ४-०-२५-१, हार्दिक पंड्या १-०-४-०.

किशनच्या डोळ्याला गंभीर दुखापत
आरसीबीच्या डावातील तेराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दुर्देवी घटना घडली. हार्दिक पंड्याने फेकलेला चेंडू ईशान किशनच्या उजव्या डोळ्याला लागला. चेंडूच्या टप्प्याचा योग्य अंदाज न आल्याचे चेंडूने त्याच्या डोळ्याचा वेध घेतला. यानंतर बदली यष्टिरक्षक आदित्य तरेने यष्टिमागे जबाबदारी सांभाळली.