मुंबईत चार्टर्ड विमान कोसळून ५ जण ठार

0
143

येथील घाटकोपर भागातील सर्वोदय रुग्णालयाजवळ काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. वैमानिक मारिया झुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे या चार जणांचा मृत्यू झाला तर पादचारी गोविंद पंडित यांचाही दुर्दैवी अंत झाला. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनाग्रस्त विमान यू वाय ऍव्हिएशन या कंपनीचे होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घाटकोपर पश्चिमेकडच्या एलबीएस मार्गावरील जीवदया लेन येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असून सदर परिसर चारी बाजूंनी पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. तिथे हे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे आसपासच्या परिसरात घबराट उडाली. सुरुवातीला काय झाले हे कळलेच नाही. अपघातस्थळी धुराचे लोट दिसल्याने आग लागल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, नंतर महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाने विमानाचा अपघात झाल्याचे स्पष्ट केले. यात विमानाच्या पायलटसह तीन तंत्रज्ञ व एका पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन दल व एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले.

संबंधित विमान हे उत्तर प्रदेश सरकारने २०१४ मध्ये यू वाय ऍव्हिएशन या कंपनीला विकले होते, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी अलाहाबाद येथे या विमानाला अपघात झाला होता. त्यानंतर हे विमान विकण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विमानाची आसनक्षमता १२ प्रवाशांची होती.

अनर्थ टळला!
घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी चार्टर्ड विमान कोसळले, तेथून काही अंतरावरच वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्ग आहे. तसेच, आजूबाजूस मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती आहे. पायलटने प्रसंगावधान राखून हे विमान त्या निर्जन कुंपणामध्ये उतरवले असावे, असा अंदाज आहे. त्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा होती.