मुंबईतील वृद्ध दाम्पत्याचा कांदोळीतील समुद्रात बुडून मृत्यू

0
20

माटुंगा-मुंबई येथील वृद्ध दाम्पत्याचा काल सिकेरी-कांदोळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. प्रकाश दोशी (73) आणि हर्षिता प्रकाश दोशी (69) असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे. अन्य एका बुडालेल्या महिलेला वाचवण्यात यश आले. काल मॉर्निंग वॉकसाठी समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना लाटांच्या तडाख्यात ते सापडले आणि समुद्रात बुडाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील 14 जणांचा एक गट मित्रपरिवारासह गोव्यात पर्यटनासाठी आला होता. त्या गटातील दोन जोडपी काल सकाळी समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंगवॉकसाठी गेली होती, त्यातील दोशी दाम्पत्य आणि कल्पना सतीश पारेख (68) ही महिला सकाळी 11 च्या दरम्यान पाण्यात बुडाले. मॉर्निंग वॉकवेळी समुद्रकिनारी फिरत असताना लाटांच्या तडाख्यात तिघेजण वाहून गेले आणि त्यातील प्रकाश दोशी व हर्षिता दोशी यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेऊन कल्पना पारेख या महिलेला पाण्यातून वाचवले. यानंतर टुरिस्ट पोलीस युनिट आणि जीवरक्षक दलाने दोशी दाम्पत्याला पाण्यातून बाहेर काढले आणि नंतर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यापैकी दोघांना मृत घोषित केले. कल्पना पारेख हिच्यावर सध्या बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.