येथील एकाच कुटुंबातील व्यक्तींच्य २ लाख कोटी रुपयांचा व अहमदाबादमधील महेश शहा या बिल्डरचा १३ हजार कोटी रुपयांचा असे दोन मालमत्ता घोषणा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाने फेटाळले असून या दोन्ही प्रकरणांची कसून चौकशी सुरु झाली आहे.
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या योजनेखाली वरील व्यक्तींनी वरीलप्रमाणे घोषणा वित्त मंत्रालयाला सादर केली होती. यापैकी मुंबईतील सदर कुटुंबाचे प्रकरण संशयास्पद आढळल्याचे वित्त मंत्रालयाचे म्हणणे आहे.
बांद्रा-मुंबईतील चौघा जणांच्या कुटुंबाचे हे प्रकरण आहे. त्यात अब्दुल रझाक महम्मद सईद, त्यांचा मुलगा महम्मद आरिफ अब्दुल रझाक सयर, पत्नी रूखसाना अब्दुल रझाक सय्यदव बहीण नूरजहॉं महमद सय्यद अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या वरील योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपली होती. त्या मुदतीच्या आत दडवलेली रक्कम घोषित केल्यास कर व दंड मिळून ४५ टक्के रक्कम भरण्याची तरतूद होती.
अहमदाबादमधील ६७ वर्षीय महेश शहा या बिल्डराचे प्रकरण हे १३ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे आहे. शहा यांनी कर अधिकार्यांना हा सर्व पैसा अनेकांचा असून त्यात राजकारणी, नोकरशहा तसेच बिल्डरांचाही समावेश असल्याची माहिती दिली आहे. त्यांची सुमारे सात तास चौकशी केल्यानंतर आरोग्याच्या कारणावरून त्यांना सोडण्यात
आले.