रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने थरारक लढतीत मुंबई इंडियन्सचा ‘सुपर ओव्हर’मध्ये पराभव केला. सैनीने टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या व पोलार्ड या मुंबईच्या खेळाडूंना केवळ सात धावा करता आल्या. या षटकात कायरन पोलार्ड बाद देखील झाला. विजयासाठी केवळ ८ धावा आवश्यक असताना विराट व एबी यांना या धावा करण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पहावी लागली.
तत्पूर्वी निर्धारित षटकांत सामना बरोबरीत राहिल्याने निकाल देण्यासाठी ‘सुपर ओव्हर’चा वापर करावा लागला होता. बंगलोरच्या ३ बाद २०१ धावांना उत्तर देताना मुंबईने ५ बाद २०१ धावा केल्या होत्या. बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना द्विशतकी वेस ओलांडली.
कर्णधार विराट कोहली याच्या अपयशाची मालिका या सुरूच राहिली. देवदत्त पडिकल व ऍरोन फिंच यांनी बंगलोरला दमदार सलामी देताना पहिल्या गड्यासाठी ८१ धावा जोडल्या. पडिकलने मोसमातील आपले दुसरे अर्धशतक लगावताना ५४ धावांची खेळी साकारली. ऍरोन फिंच याने ५२ धावांचे योगदान दिले. एबी डीव्हिलियर्सने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळ करत केवळ २४ चेंडूंत ५५ धावा चोपल्या. दुबेने १० चेंडूंत नाबाद २७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. पंधराव्या षटकाअखेर आरसीबीच्या केवळ २ बाद १२३ धावा झाल्या होत्या. यानंतर उर्वरित पाच षटकांत त्यांनी ७३ धावा चोपल्या. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव हे भरवशाचे फलंदाज तंबूत परतले त्यावेळी फलकावर केवळ १६ धावा लागल्या होत्या. डी कॉक व हार्दिक पंड्या बाद झाल्याने त्यांचा संघ ४ बाद ७८ अशा अडचणीत सापडला होता. ईशान किशन व कायरन पोलार्ड यांनी संघाचा डाव सावरतानाच विजयाच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी केली. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात १९ धावांची आवश्यकता असताना मुंबईला केवळ १८ धावा करता आल्या. ईशान किशन अंतिमपूर्व चेंडूवर वैयक्तिक ९९ धावांवर बाद झाल्यानंतर पोलार्डने शेवटच्या चेंडूवर चौकार सोडवून सामना बरोबरीत आणला.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल केले. उमेश यादव, जोश फिलिपे व डेल स्टेन यांना बाहेर बसवून त्यांनी गुरकिरत सिंग, इसुरु उदाना व ऍडम झॅम्पा यांचा अंतिम ११मध्ये समावेश केला. सौरभ तिवारी पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे मुंबई इंडियन्सने डावखुर्या ईशान किशनला संधी दिली.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः देवदत्त पडिकल झे. पोलार्ड गो. बोल्ट ५४ (४० चेंडू, ५ चौकार, २ षटकार), ऍरोन फिंच झे. पोलार्ड गो. बोल्ट ५२ (३५ चेंडू, ७ चौकार, १ षटकार), विराट कोहली झे. शर्मा गो. चहर ३, एबी डीव्हिलियर्स नाबाद ५५ (२४ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), शिवम दुबे नाबाद २७ (१० चेंडू, १ चौकार, ३ षटकार), अवांतर १०, एकूण २० षटकांत ३ बाद २०१
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-३४-२, जेम्स पॅटिन्सन ४-०-५१-०, राहुल चहर ४-०-३१-१, जसप्रीत बुमराह ४-०-४२-०, कृणाल पंड्या ३-०-२३-०, कायरन पोलार्ड १-०-१३-०
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. नेगी गो. सुंदर ८, क्विंटन डी कॉक झे. नेगी गो. चहल १४, सूर्यकुमार यादव झे. डीव्हिलियर्स गो. उदाना ०, ईशान किशन झे. पडिकल गो. उदाना ९९ (५८ चेंडू, २ चौकार, ९ षटकार), हार्दिक पंड्या झे. नेगी गो. झॅम्पा १५, कायरन पोलार्ड नाबाद ६० (२४ चेंडू, ३ चौकार, ५ षटकार), कृणाल पंड्या नाबाद ०, अवांतर ०, एकूण २० षटकांत ५ बाद २०१
गोलंदाजी ः इसुरु उदाना ४-०-४५-२, वॉशिंग्टन सुंदर ४-०-१२-१, नवदीप सैनी ४-०-४३-०, युजवेंद्र चहल ४-०-४८-१, ऍडम झॅम्पा ४-०-५३-१.