मी तुझी मावशी तुला न्यावया आलें!

0
1352
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

‘महाराष्ट्र-रसवंती’मधील लक्ष्मीबाई टिळकांची ही कविता भावनाप्रधान तर आहेच; पण ती त्या काळाच्या संदर्भात अधिक काहीतरी सुचवू पाहते. बालविवाहाच्या रूढीपायी बालपणीचा आनंद गमावून बसलेल्या सासुरवाशिणीसाठी दिवाळसण ही त्यावेळी मोठी पर्वणी असायची.

मी तुझी मावशी तुला न्यावया आलें!
ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे!
तूं उभी; लागले कुठें कुठें तव डोळे?
ही गाडी वाजे खडखड खडखड दूर,
हें इकडे उडतें धडधड तवही ऊर!
तूं प्रसन्न आतां, क्षणें खिन्न तूं होशी
मेघांत गवसला चंद्रच दुसरा दिसशी!
तूं अल्लड, साधी पोर! लाडके,
गुरुजनें कल्पिली थोर लाडके,
तुज कशास हा संसार! लाडके,
हा दोन दिवस तरि टळो, म्हणोनी झालें
मन अधीर, गेलें माहेरा तव गेलें!
माहेरीं आपण भाउबिजेला जाऊं,
येतील न्यावया बाबा अथवा भाऊ,
हें प्रौढपणाचें ओझें फेंकुनि देऊं!
सुचतील तेवढे खेळ खेळुनी घेऊं!
ही मनांत तुझिया बाई वासना,
मीं ओळखिलें का नाहीं? सांग ना!
भर बघुं पुन्हां अश्रूंहीं! लोचनां
ये हांसत आतां आलिंगीं मज बाळे!
मी तुझी मावशी तुला न्यावया आलें!
– लक्ष्मीबाई टिळक

लक्ष्मीबाई टिळकांनी आपल्या लेखनामुळे आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची ओळख मराठी साहित्यविश्‍वाला करून दिली. माहेरी शिक्षणाचे कोणत्याही प्रकारचे वातावरण नसताना मोठ्या कष्टाने त्यांनी अक्षरओळख करून घेतली. ना. वा. टिळकांनी जेव्हा धर्मांतर केले तेव्हा व्यथित झालेल्या अंतःकरणाने त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. त्यांना कामधाम झाल्यानंतर रात्रीच्या समयी कविता सुचत. जमिनीवर आगपेटीच्या जळक्या काडीने किंवा खडूने किंवा कोळशाने त्या लिहीत असत. एकदा तर पावणे तीनशे ओळींची कविता त्यांनी लिहून काढली. बालकवींनी ती नंतर उतरवून घेतली. लक्ष्मीबाईंच्या कविता त्यांचे सुपुत्र देवदत्त टिळक यांनी ‘भरली घागर’ या नावाने प्रसिद्ध केल्या. नावाप्रमाणे भावमाधुर्याने ही भरलेली घागर आहे.
ना. वा. टिळकांनी सुरू केलेल्या ‘अभंगांजलि’ या ‘ज्ञानोदय’च्या सदरात टिळकांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंनी अभंगलेखन चालू ठेवले. टिळकांच्या अपुर्‍या राहिलेल्या ‘ख्रिस्तायन’ या काव्याचे चौसष्ट अध्याय सोप्या, रसाळ शैलीत लिहून ‘ख्रिस्तायन’ त्यांनी पूर्ण केले. शेवटचा अध्याय देवदत्त टिळकांनी लिहिला.

लक्ष्मीबाई टिळक ‘स्मृतिचित्रे’ या आपल्या अविस्मरणीय आत्मचरित्रामुळे रसिकांच्या मनात भरतात. पण त्यांच्या कवितेचा तेवढ्या प्रमाणात उल्लेख होत नाही. तेवढीच भावनात्मकता आणि चित्रमयता कवितेच्या शब्दकळेत असूनही! कधीकधी असे घडते खरे! शिवाय त्यांची कविता अल्पवीणीची होती. स्त्रीमनाची कणव त्यांच्या संवेदनशीलतेत भरून राहिली होती. तिचा आविष्कार किती सहजसुलभ! किती अभिनिवेशविरहित! त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे मानसशास्त्रापेक्षा त्यांना ‘माणूसशास्त्र’ अधिक कळलेले होते. म्हणूनच अशी प्रक्रिया घडत असावी.

‘मी तुझी मावशी तुला न्यावया आलें!’ या कवितेत मावशी आणि तिची भाची यांच्या व्यक्तिरेखा साकार झाल्या आहेत. त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत असे म्हणता येईल. मावशीचा स्वर या कवितेत मुखर झालेला आहे. भाची अबोल आहे. भावमुग्ध आहे. ती बोलू इच्छिते; पण बोलत नाही. या भावस्थितीत अर्थातच तत्कालीन सामाजिक संदर्भ येतो. त्यामुळे आपोआप त्यावेळच्या सामाजिक परिसराचे, रीतिरिवाजांचे आणि परंपरांचे चित्र उभे राहते. तो काळ असा होता मुलींच्या भावजीवनाच्या दृष्टीने? खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्या डोक्याला मुंडावळ्या बांधून त्यांना सासरी पाठवले जात असे. त्यांच्या भावनांची, इच्छा-आकांक्षांची पर्वा होती का कुणाला? मुसक्या बांधून अनोळखी घरात लोटण्याचाच तो प्रकार होता. त्यात पुन्हा विषम विवाह. ‘शारदा’ नाटकातील ‘शारदा’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. अशावेळी ‘मूर्तिमंत भीती उभी राहिली मजसमीप!’ यापलीकडे ती दुसरे काय म्हणणार?
लक्ष्मीबाई टिळकांनी मावशीच्या मुखातून जे उद्गार व्यक्त केले आहेत, त्यातून त्यांनी नकळत आपल्याला तत्कालीन समाजवास्तवाकडे नेले आहे. दिवाळीचे दिवस आलेले आहेत. त्यात ती अल्लड पोर. निरागस वयातच तिला सासुरवास घडलेला. माहेरच्या विसाव्याच्या क्षणांसाठी ती सदैव आसुसलेली.

ती मुलगी पाणवठ्यावर घागर घेऊन उभी आहे. हा पाणवठा म्हणजे तिच्या मनातील भावनांदोलनांचा सखा आहे. तिच्या मनातील तरंग आणि घागर भरताना पाण्यामध्ये उठलेले तरंग, हिंदकळलेले पाणी यात तिला समलय जाणवते. आपल्याला कोणीतरी न्यायला आलेले आहे असे तिला क्षणोक्षणी वाटते. ती वाटेकडे पाहते आणि निराश होते. बालपणीच ध्यानीमनी नसताना तिचे लग्न ठरले. ती सासरी आली. तिचा दिवाळसणाच्या दिवसांत माहेराकडे ओढा असणार यात नवल ते कोणते? अशा वेळी तिचे मन जाणणारी मावशी तिला न्यायला आली आहे. ती तिला लडिवाळ भाषेत विचारते, ‘‘बाळे, ही भरलेली घागर तुझ्या डोक्यावर आहे. तू येथे पाणवठ्यापाशी उभी आहेस. पण तुझे डोळे कुठे कुठे लागून राहिलेले आहेत?’’
दूर अंतरावरून गाडीचा खडखड खडखड आवाज ऐकू येतोय. आणि इकडे तुझे ऊर धडधडत आहे. तू क्षणात प्रसन्न दिसतेस आणि क्षणात उदास भासतेस. असे वाटते की मेघांमध्ये दुसरा चंद्रच दडलेला आहे.
लाडके, तू अल्लड आणि साधी पोर आहेस. पण वडीलधार्‍यांना मात्र तू वाढलेली लेक वाटली आणि लगबगीने तुझे लग्न करून तुला सासरी रवाना केले. या लहान वयात तुला संसार योग्य होता का ग? लाडके, दोन दिवस तरी या जाचातून तुझी सुटका व्हावी म्हणून माझे मन अधीर झाले आहे (आईइतकीच मावशीही प्रेमळ असते हे तर सर्वश्रुतच आहे.) आणि तुझ्या माहेरी गेले. आपण तुझ्या माहेरी भाऊबीजेला जाऊ.
ऐन दिवाळीत तुला न्यायला बाबा किंवा भाऊ येतील. तू येशील तेव्हा आपण सगळ्यांनी काय करू? हे अवेळी आलेले प्रौढपणाचे ओझे फेकून देऊ. मुक्त मनाने जेवढे म्हणून खेळ खेळता येतील तेवढे खेळू.

मावशी सहजतेने हृदयसंवाद साधते, ‘‘बाळे, तुझ्या मनात आलेली ही तीव्र इच्छा मला कळत का नाही! मी बरोबर ओळखले की नाही? सांग ना! तुझे डोळे अश्रूंनी भरून जाऊ देत बरं! मी तुझी मावशी तुला न्यायला आले आहे.’’
‘महाराष्ट्र-रसवंती’मधील लक्ष्मीबाई टिळकांची ही कविता भावनाप्रधान तर आहेच; पण ती त्या काळाच्या संदर्भात अधिक काहीतरी सुचवू पाहते. बालविवाहाच्या रूढीपायी बालपणीचा आनंद गमावून बसलेल्या सासुरवाशिणीसाठी दिवाळसण ही मोठी पर्वणी असायची. ‘मी तुझी मावशी तुला न्यावया आलें’ या मावशीच्या उद्गारांतील उत्कटता आजच्या पिढीतील सासुरवाशिणींना कदाचित उमजणार नाही. पण स्त्रीमन जागे करण्याची क्षमता आणि संवेदनशीलता या कवितेत भरपूर प्रमाणात आहे. लक्ष्मीबाई टिळकांचे कवितेतील रूपदर्शन त्यांच्या गद्याइतकेच विलोभनीय वाटते.