‘मी आज मुख्यमंत्री असेन अन्यथा कोणीही नसेन’ : डिसोझा

0
87

मुख्यमंत्री निवडीआधीच उपमुख्यमंत्र्यांचे बंड

अनिच्छेने गोवा सोडून केंद्रात जाण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर राजी झाले आणि त्यांच्या उत्तराधिकार्‍याच्या निवडीवरून गोव्याच्या राजकीय पटलावर कालपासून बंडाचे एक छोटे वादळ घोंघावले. आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर किंवा सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्यातच नव्या मुख्यमंत्र्यासाठी चुरस असल्याचे चित्र निर्माण झाले असताना लंडन दौर्‍यावरून उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा गोव्यात काल दुपारी धडकल्यानंतर या बंडाला वेग मिळाला. खुद्द डिसोझा यांनीच माध्यम प्रतिनिधींशी उघडपणे आपण मुख्यमंत्रीपदाचा प्रथम दावेदार असल्याचे स्पष्ट केले.

आमदार-मंत्र्यांचा पाठिंबा
डिसोझा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याला भाजपच्या काही आमदार-मंत्र्यांनी उघडपणे पाठिंबा व्यक्त केला. आज भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून राज्याच्या नवा मुख्यमंत्री म्हणून आपली निवड केली जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे असे डिसोझा यांनी वृत्तवाहिनी प्रतिनिधीशी स्पष्ट केले. ‘उपमुख्यमंत्री म्हणून आज (शुक्रवारी) माझा शेवटचा दिवस आहे. उद्या एक तर मी मुख्यमंत्री असेन किंवा कोणीही नसेन’ अशी बेधडक प्रतिक्रिया त्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. आपण ‘ज्युनियरला रिपोर्ट’ करणार नाही असेही एका प्रश्‍नावर ते उतरले. यावेळी त्यांचा रोख लक्ष्मीकांत पार्सेकरांवर होता.
काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भाजपच्या २१ पैकी ६ आमदार डिसोझा यांच्या घरी उपस्थित होते. विधीमंडळ बैठकीत नेता निवडीसाठी गुप्त मतदान घेतल्यास किमान १५ आमदारांचा आपल्याला पाठिंबा मिळणार असल्याचे डिसोझा यांनी वृत्तवाहिनीला सांगितले.
मुख्यमंत्रीपदी निवड नैसर्गिक
राज्याचा विद्यमान उपमुख्यमंत्री असल्याने मुख्यमंत्रीपदासाठी आपली निवड ही नैसर्गिक ठरते असा डिसोझा यांचा दावा आहे. याचे समर्थन करताना ते म्हणाले, मी चार वेळा आमदार, तीन वेळा मंत्री झालो आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी मीच पात्र ठरतो. जर मी मुख्यमंत्री होऊ शकत नसेन तर या सरकारात रहावे की राहू नये याचा मला दोनदा विचार करावा लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
..तर भाजपविषयी संशय निर्माण होईल
‘भाजप विषयी अल्पसंख्यकांच्या मनात कोणताही संशय नाही. पण जर हे घडले तर मात्र भाजपबाबत संशय निर्माण होईल’ असे ते म्हणाले. आपल्याला मुख्यमंत्री न केल्यास भाजपला असलेल्या अल्पसंख्यकांच्या पाठिंब्यावर परिणाम होऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘माझे वय सध्या ६० आहे. मला राजकारणात जास्त काळ रहायचे नाही. आजवर मी अनेक पदे हक्काने मिळवली. मात्र नव्या घडामोडींमुळे मला पक्ष सोडायची गरज नाही. मात्र मी पद सोडू शकतो’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
संघाशी चांगले संबंध
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपण कोणत्याही बाबतीत दोष देऊ इच्छित नाही. संघाच्या अनेक नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. आपण प्रत्यक्ष संघाशी संबंधित नाही म्हणून आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा द्यायचा नाही याला कोणतेही कारण नाही असेही ते म्हणाले.