- पौर्णिमा केरकर
जमिनीत जे पिकलेले आहे त्याला मातृतत्त्व आणि पुरुषतत्त्वांच्या मीलनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ग्रामदेवी सातेरी स्त्रीतत्त्वाचे प्रतीक होऊन पुरुषतत्त्वाच्या रवळनाथाशी शिवलग्नाचा सोहळा साजरा करते. प्रकृती-पुरुष यांच्या मीलनाचा हा सोहळा विजयादशमीला समूर्त होतो.
गोवा-कोकणातील लोकमानसाने भाद्रपदानंतर येणार्या आश्विन महिन्याशी मातृपूजनाची परंपरा जोडलेली आहे. भाद्रपद चवथीला गणपतीची पूजा ही सृजनत्वाचे पैलू मिरवणार्या मातीविषयीची कृतज्ञता. मान्सूनचा पाऊस सुजलाम् सुफलाम्तेची परितृप्ती समस्त सृष्टीला बहाल करतो. भाद्रपदातच भाताची कणसे डोलू लागतात. पोपटी दाण्याला सोनेरी वर्ख लाभतो. आणि आश्विनात पाऊस ओसरू लागताच भाताची कापणी केली जाते. पावसाळी मौसमाने कणसात धान्याची परिपूर्णता येते. त्यासाठी धरित्री अन्नदात्री म्हणून वंदनीय ठरलेली आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ग्रामदेवीच्या गर्भगृहात नऊ प्रकारचे धान्य रुजत घातले जाते. प्रत्येक रात्रीला एक याप्रमाणे नऊ पुष्पमाला अर्पण करतात. अष्टमीनंतर येणारी महानवमीची रात्र महत्त्वाची. गर्भगृहात नऊ धान्यांचा सर्जन आविष्कार घडविते. त्यासाठी आश्विनातला दहावा दिवस उजाडतो तो दसरा म्हणूनच! रूजत घातलेले कोंब प्रसादाच्या रूपात वाटले जातात. ती लवलव करणारी हिरवी-पिवळी पाती हे सृजनत्व सुवासिनींना भावते. पावसाळ्यात सृजनत्वाला जोजविणारी महामाया जागृत होते; आणि म्हणूनच तिचा जागर करणे हे भाविक आपले आद्य कर्तव्य मानतात. गोमंतकीय लोकमानसाने मातेला जननी म्हणून पुजले. जनन, पोषण आणि मरण या तीन अवस्थांशी मानवी समाजाचे नाते जडलेले आहे. युगायुगांपासून मातेने आपला पान्हा प्राशून अपत्यांचे भरण-पोषण केलेले आहे. परंतु जेव्हा आसुरी शक्तींनी हाहाकार माजविला तेव्हा ही जननी, पोषणकर्ती संहारक रूपात प्रकटली. तिने कधी महिषासुराचे निर्दालन केले, तर कधी शुंभ-निशुंभाला धूळ चारली. म्हणून मातेला, पुरुषतत्त्वाला नऊवारी साडीने सजविले-धजविले जाते. त्रिशूळ, डमरू, खडग आणि रक्तपात्र धारण केलेला अश्वारूढ रवळनाथ पुरुषतत्त्वांचे प्रतीक म्हणून सातेरीसमोर प्रकटतो.
सत्तरीत राणे मंडळींना सरदेसाईपण लाभले तेव्हा इथल्या ग्रामसंस्था लोपल्या. त्याची जागा मोकासदारीने घेतली. राणे सरदेसाईंना सत्तरी इनाम लाभली. त्याला अपवाद ठरला तो केवळ पिसुर्ले गावाचा. इथल्या कष्टकर्यांनी आपल्या गावाची ग्रामसंस्था मोकासदारीपासून मुक्त ठेवली. ग्रामदेवी नवदुर्गा प्रारंभी मृण्मयी वारूळाच्या रूपात पुजली जायची. लोह खनिज उत्खनन होण्यापूर्वी हा गाव हिरव्यागार शेतीने समृद्ध होता. वार्यावरती भाताची कणसे डोलू लागायची तेव्हा गावाची संपन्नताच बोलायची. कधीकाळी आकाशमार्गे जाणार्या देवीला धनधान्याची समृद्धी असलेल्या पिसुर्ले गावाचे हृदयंगम दर्शन झाले. सोनसळी झळाळी लाभलेल्या इथल्या भातशेतीने तिला भुरळ घातली. तेव्हा तिला इथल्या पेजेचा आस्वाद घेण्याची इच्छा तीव्र झाली. ही देवी तेव्हापासून पेजाळी म्हणून पिसुर्लेत स्थायिक झाली असे लोक मानत आलेले आहेत. आपले अस्तित्व विसरून देवानेही येथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो पिसोदेव म्हणून वंदनीय ठरला. नवदुर्गा आणि रवळनाथ, त्याचप्रमाणे स्वयंभू महादेव यांच्या गावात पेजाळी देवी, पिसोदेव यांची भर पडली. लोह खनिज उत्खननाने पिसुर्लेचे भातशेतीचे वैभव लुप्त झाले. असे असूनही रवळनाथ-नवदुर्गा यांच्या तरंगांचे मेळ जेव्हा मिरवणुकीतून गावात जातात तेव्हा स्त्री आणि पुरुषतत्त्वांच्या मीलनाचा सोहळा शिवलग्नातून समूर्त होतो.
नवाष्म युगाशी नाते सांगणारा सत्तरीतील म्हाऊस हा गाव सातेरी केळबाय, महादेव, रवळनाथाचा गाव. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या म्हाऊस गावात भातशेतीची परंपरा शेकडो वर्षांपासूनची. जमिनीत जे पिकलेले आहे त्याला मातृतत्त्व आणि पुरुषतत्त्वांच्या मीलनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ग्रामदेवी सातेरी स्त्रीतत्त्वाचे प्रतीक होऊन पुरुषतत्त्वाच्या रवळनाथाशी शिवलग्नाचा सोहळा साजरा करते. प्रकृती-पुरुष यांच्या मीलनाचा हा सोहळा विजयादशमीला समूर्त होतो.
गोव्यात ज्या गावांना शेकडो वर्षांच्या इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेली आहे त्यात सत्तरीतील वेळूस गावाचा समावेश होतो. विजयनगरच्या साम्राज्याखाली येणार्या या गावातील सातेरी-रवळनाथाचे मंदिर पंधराव्या शतकापूर्वीच्या इतिहासाशी नाते सांगणारे. सातेरी आणि रवळनाथ यांच्या तरंगांचे मीलन दसराच्या दिवशी येथे संपन्न होते. दक्षिण गोव्यातील चंद्रनाथ पर्वताचा अधिष्ठाता चंद्रेश्वर भूतनाथ इथल्या बावीस गावांच्या इतिहासाशी नाते सांगणारा. सह्याद्रीच्या डोंगररांगांत आपले वैभव राखणारा चंद्रनाथ पर्वत म्हणजे महाकाय शिवलिंगाचेच रूप! दोन हजार वर्षांच्या इतिहासाशी संबंधित असलेला चंद्रेश्वर भोज साम्राज्यापासून भाविकांवर कृपेचा वरदहस्त धारण करून उभा आहे. त्याच्याच कृपाशीर्वादाने कुशावती तीरावर चंद्रपूर राजधानी उदयाला आली. छात्र धर्माची परंपरा मिरवणारे आणि यादव कुळाच्या संस्कृतीशी नाते सांगणारे मुसळनृत्य विस्मृतीत गेलेला इतिहास समूर्त करते. त्यामुळे चंद्रेश्वर भुतनाथाचा विजयादशमीचा उत्सव ऐतिहासिक पैलूंवर प्रकाशझोत टाकतो. भोजांच्या साम्राज्याशी नाते सांगणार्या चंद्रेश्वर भूतनाथाला दोन हजार वर्षांचा असलेला इतिहास पर्वतावरच्या ऐतिहासिक मंदिराच्या वास्तूपासून सुरू होतो आणि त्याच्या जीर्ण अवशेषांचे दर्शन सासष्टीच्या चांदोर गावात विस्मृतीत गेलेल्या चंद्रपूर राजधानीतून घडते. कदंब, विजयनगर अशा कित्येक राजघराण्यांचा इतिहास कुशावती तीरावरील चंद्रपुरात घडला. अन्याय, अत्याचारांविरुद्ध ज्यांची शस्त्रे खणणाली त्या क्षत्रियांनी ख्रिस्तीकरणाची दीक्षा पत्करली. असे असूनही आपला बाणा आणि क्षात्रतेज कायम राखले. धर्म बदलून संस्कृती बदलत नाही याचा प्रत्यय चंद्रेश्वर पर्वताच्या शिखरापासून पायथ्यापर्यंत आणि कुशावती नदीच्या तीरावर विखुरलेला पाहायला मिळतो. बावीस गावांचा अधिपती असणार्या चंद्रेश्वर भूतनाथाचे दर्शन दसर्याच्या वेळी संपन्न होणार्या विविध परंपरा, रीतिरिवाजांतून घडते. डिचोलीत मांडवी तीरावर कोथंबी गाव आहे. तेथेही चंद्रेश्वर भुतनाथाचे मंदिर आहे. तेथे होणार्या दसरोत्सवात ऐतिहासिक पैलूंचे दर्शन घडते. दसर्याचे आगमन खरेतर मान्सूनचा पाऊस कमी झाल्यावर शरद ऋतूत होते.
पावसाळ्यानंतर येणारी शरद पौर्णिमा चांदण्यांचा इतका सुरेख आविष्कार घडविते की त्यावेळी सृष्टिदेवता आपल्या वैभवाची दोन्ही हातांनी जणू काही पखरण करत आहे अशीच अनुभूती येते. मानवीमनाला साक्षात वैभवलक्ष्मीचाच संचार सर्वत्र होत असल्याचा आभास होतो. कोण जागे आहे? याचा प्रत्यय घेत लक्ष्मी कोजागिरीला पृथ्वीतलावर येऊन भ्रमंती करते. या चांदण्याच्या परिपूर्ण उत्साहात पेडणे शहरातील दसरा संपन्न होतो. गोवा-कोकणातल्या लोकमनाला सृष्टीच्या कणाकणांत दैवीशक्तीचा प्रत्यय जाणवला. त्यासाठी आश्विनात नवरात्रीनंतर येणार्या दसरोत्सवात परंपरा, विधी यांबरोबरच लोकोत्सवाचे दर्शन घडते. दसर्याद्वारे सृजनतत्त्वाला सन्मान देण्याबरोबरच प्रकृती-पुरुष मीलनाला प्राधान्य दिलेले आहे.