‘मिर्गाचो पुरूमेत’ आणि मृगाचा पाऊस

0
45
  • रमेश सावईकर

एका बाजूने दाह सहन न होऊन जीव मेटाकुटीला येतो, तर दुसऱ्या बाजूने पावसाळा सुरू होण्याआधी घरात लागणारी धान्ये, कडधान्ये व इतर पदार्थांचा ‘साठा’ करून ठेवण्यासाठी धडपड सुरू होते. ज्येष्ठ महिन्यातला पहिला पंधरवडा हा पावसाळी हंगामात लागणाऱ्या घरातील अन्नधान्याचा ‘पुरूमेत’ करण्याचा कालखंड. म्हणूनच ‘पुरूमेताचा बाजार’ माणसांच्या गर्दीने फुलून जातो.

वैशाख महिन्यातील कृष्णपक्षात (दुसरा पंधरवडा) उष्णतेचा दाह वाढत जातो. वसंत ऋतूमुळे फुलझाडे, फळझाडांना बहर येतो. आंबे, फणस ही रसयुक्त फळे तयार होऊन खायला मिळतात. रानातील मेवा म्हणजे तर पर्वणीच. करवंदे, चुन्ना, जांभळे, चारां ही रानातील फळे खाण्याची मौज आगळी नि त्यांची रूची तर अवीटच!

निसर्गाची ही देणगीच. तथापि, वसंत ऋतूनंतर ग्रीष्म सुरू झाला की हवेतील उष्णता कडक उन्हामुळे एवढी वाढते की भरदुपारी तो दाह सहन होत नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवली तर मग केव्हा एकदा ग्रीष्म सरून, ज्येष्ठ-मे महिना संपून जून महिना येतो आणि ऋतुराज पर्जन्यराजाचे आगमन होते म्हणून शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे आभाळाकडे लागून राहतात. आकाशात काळ्या ढगांऐवजी पांढऱ्या ढगांची गर्दी वाढलेली दिसली की पाऊस येणार नि हवेत गारवा पसरून जीव सुखावणार अशी कल्पना करून असणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडते.

एका बाजूने दाह सहन न होऊन जीव मेटाकुटीला येतो, तर दुसऱ्या बाजूने पावसाळा सुरू होण्याआधी घरात लागणारी धान्ये, कडधान्ये व इतर पदार्थांचा ‘साठा’ करून ठेवण्यासाठी धडपड सुरू होते. ज्येष्ठ महिन्यातला पहिला पंधरवडा हा पावसाळी हंगामात लागणाऱ्या घरातील अन्नधान्याचा ‘पुरूमेत’ (साठा) करण्याचा कालखंड.
गोव्यात पुरूमेताचा बाजार प्रमुख शहरे व नगरीत भरतो. सुकी मिरची, कोकम सोल, चिंच, मीठ, शिवाय तांदूळ, डाळी, कडधान्ये व इतर पदार्थ विकत घेण्यासाठी ‘पुरूमेताचा बाजार’ माणसांच्या गर्दीने फुलून जातो.

स्वयंपाक करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक अजूनही मातीच्या चुलीचा वापर करतात. त्यासाठी लागणारी ‘लाकडे’ तयार करून त्यांचा साठा केला जातो. शिवाय पावसाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून त्याचीही तरतूद करावी लागते. हंड्यात पाणी तापविण्यासाठी चुलीत अग्नी (विस्तव) पेटविण्याकरिता जळावू लाकडांची- गोमंतकीय लोक ‘जळाव’ म्हणतात- तजवीज करतात.
शेतकरीवर्ग पावसाळ्यात भरड व शेतजमिनीत खरीब भातपीक घेतात. मृग नक्षत्राचा पाऊस सुरू होऊन जमीन ओलसर झाली की शेतजमिनीची नांगरणी करण्यासाठी नांगर व इतर शेत अवजारे तयार ठेवतात. हल्ली आधुनिक पद्धतीनुसार यांत्रिक अवजारे, मशिनी वापरून शेती केली जाते. पण सर्वच शेतकऱ्यांना ते परवडते असे नाही. पूर्वीची जुनी परंपरागत शेती करण्याची पद्धत अजूनही अस्तित्वात आहे.

ज्येष्ठ महिन्याच्या कृष्णपक्षात मृग नक्षत्राला ऋतुराज पर्जन्यराज गोव्यात हजेरी लावतोच. ‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ असे म्हटलेलेच आहे. पण आता पर्यावरणीय असंतुलन, हवेतील प्रदूषण यामुळे पाऊस वेळेवर येतोच असे होत नाही. तो अवचितपणे कधी पाहुणा बनून येईल हे सांगणे कठीण! गोमंतकीय लोक मात्र पावसाच्या आगमनाची चौकशी करताना ‘मिरग केन्हा लागता?’ असा प्रश्न करतात. काहीजण तर पावसालाच ‘मिरग’ समजतात. वास्तविक ‘मृग’ नक्षत्रावरून ‘मिरग’ हा शब्द शेतकरीवर्गात, तसेच सर्वच समाजांमध्ये रूढ झाला आहे.

पावसाळी हंगामात ‘पुरूमेत’ करतात, तशी पाऊसपूर्व अनेक इतर कामेही वेळेतच करावी लागतात. आता शहरातील घरे ‘स्लॅब’ची झाली आहेत. त्यामुळे घराच्या शाकारणीचे काम नसते. कौलारू छप्परांची घरे बहुधा ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. पावसापूर्वी घराची शाकारणी (छप्पराची) करण्याचे काम असते. तसेच स्वयंपाक व स्नानासाठी चुलीत लाकडांचा वापर होतो, म्हणून लाकडांचा साठा लोक करतात.

मृग नक्षत्र जास्तकरून जूनच्या पहिल्या आठवड्यात 6 ते 9 तारीख दरम्यान येते. त्याच मुहूर्तावर मुलांच्या शाळा सुरू होतात. शाळकरी मुलांसाठी त्यांचे गणवेश, क्रमिक पुस्तके, वह्या आणि छत्र्या-रेनकोट यांची खरेदी करण्याकरिता बाजारात गर्दी उसळते. पावसाच्या पुरूमेत बाजारात या बाबीलाही तेवढेच महत्त्व आहे.

अरबी समुद्रावरून वाहणारे वारे ढगांसह पश्चिम घाटातील डोंगरांवर आदळतात तेव्हा गोव्यात पाऊस सुरू होतो. मोसमी पावसाच्या प्रारंभी केरळ राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात तो दाखल होतो. नंतर पावसाळी ढग ‘नॉर्थ-वेस्ट’कडे कूच करतात. केरळनंतर तीनचार दिवसांनी गोव्यावर मोसमी पावसाची वृष्टी होते. मग पर्जन्यराज तसाच मुंबई-गुजरातकडे कूच करतो.
मृगाचा पाऊस पडला की हवेतील उष्णता कमी होऊन गारवा पसरतो, त्यावेळी गोमंतकीय माणूस सुखावतो. काही पावसाळीपूर्व कामे राहिल्याची खंत मनाला खंतावू लागते. पण पाऊस सुरू झाला की आटलेल्या विहिरी, तळ्या, नद्यांना पाणीपुरवठा होऊन पिण्याच्या पाण्याची व सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई दूर होते.

मगृधारा बरसल्या की तप्त धरणीचे स्नान होते. मातीचा सुगंध सर्वदूर दरवळतो. गार वारा वाहू लागतो. खोंड वारेमाप धावू लागतात. शेतकरीवर्ग सुखावतो. धरणीमातेचं स्नान झालं आहे, नंतर लख्ख सूर्याचा सोनेरी प्रकाश पडेल नि शेतीकामांना मुहूर्त लाभेल. पावसामुळे शेतकऱ्याची शेतीकामं करून, कष्ट करून चांगलं पीक घेण्याची इच्छा बळावते. या सुखद क्षणाचे वर्णन करताना कवी म्हणतो-
स्नान झाले धरणीचे,
आता पडेल सोन्याचा प्रकाश
तसेच शेतकऱ्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीचे वर्णन करताना कवी म्हणतो-
मातीचेही बनवीन सोने
मोत्याविना पिकवीन दाणे
‘पुरूमेत’ करून सुखाचा श्वास घेणारा, निश्चिंत बनून मनात सुखावणारा शेतकरी ऋतुराज पर्जन्यराजाच्या शानदार आगमनाने पुलकित होतो, प्रफुल्लित होतो अन्‌‍ नव्या दमाने बैलांना नांगराला जुंपून शेतजमीन नांगरण्याच्या कामाला शुभारंभ करतो.

पावसाचे पाणी अखेर सागराला जाऊन मिळते. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन आकाशी (नभात) जलयुक्त ढग तयार होतात अन्‌‍ वसुंधरा असह्य दाहाने, तहानेने व्याकूळ होते, त्यावेळी आभाळाला वसुंधरेसाठी ढग वितळवून ‘जलदान’ द्यावे असे वाटते. ते वाटणे म्हणजे आकाश नि वसुंधरा यांच्यातील प्रेमामुळे. आभाळ नि पृथ्वी केव्हाच एकमेकांना भेटू शकत नाहीत. तथापि, आकाश ढगांना धरणीमातेपर्यंत पोचवून परस्परांमधील अतूट प्रेम व्यक्त करते. ते प्रेमाचे रूप म्हणजे धरतीवर बरसणारा मोसमी पाऊस…! त्याची बरसण्याची रूपं विविध. स्वभावाची तऱ्हा न्यारी…! तो मुळात लहरी स्वभावाचा! मनात आलं तर मुक्त जलधारेची उधळण करीत अविश्रांत बरसत राहणार अन्‌‍ रुसला तर मात्र हुलकावणी देऊन तिथून निघून जाणार! एका ठिकाणी बरसला म्हणून दुसऱ्या ठिकाणी बरसेलच असे नाही. रुसवा-फुगवा धरून बसेल! कधी प्रतीक्षा करायला लावील तर कधी नकोसा होईपर्यंत यथेच्छ, धुवांधार बरसून एखादा भाग झोडपून काढील!

असा हा पाऊस कधी हवाहवासा वाटणारा…! तर कधी नको-नकोसा वाटणारा…! कधी मेघगर्जना करीत येईल तर कधी गर्जना न करता आगंतुक पाहुण्यासारखा अवचित येऊन जाईल. पाऊस हा आकाश नि वसुंधरा यांच्या प्रेमाचंच एक स्वरूप आहे. मोसमी पावसाचं असं हे येणं, बरसणं नि जाणं! विविध छटा पांघरून, विविध रूपं घेऊन, विविधतेनं वसुंधरेला अद्भुततेचा अनुभव देऊन आपलं अस्तित्व दाखविणारा हा पाऊस.

मृग नक्षत्राचा पाऊस मात्र सर्वांनाच हवाहवासा वाटणारा. लोकांना त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करायला लावणारा. नेमेचि नाही आला तरी कधी लवकरी, कधी विलंबी… पण येऊन वसुंधरेची प्रेमानं भेट घेणारा मृगाचा पाऊस. त्या नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर विराजमान होऊन वसुंधरेच्या भेटीला आला की त्याचं सर्वजण जंगी स्वागत करतात… तू आता आला आहेसच, थोडे दिवस तरी वस्तीला थांब नि नंतर अधूनमधून येत-जात राहा असं लोक त्याच्या कानी सांगतात!