>> चालू महिन्यांत पाच राज्यांत निवडणुका
>> 3 डिसेंबर रोजी निकाल होणार जाहीर
चालू नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून छत्तीसगड आणि मिझोराममध्ये उद्या 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांतील प्रचार काल रविवारी 5 नोव्हेंबर रोजी बंद झाला.
मिझोरममध्ये उद्या 7 रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल. त्यातील पहिला टप्पा उद्या दि. 7 रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
याच दिवशी म्हणजे 17 रोजी मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होईल. यानंतर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तर तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. या पाच राज्यांमध्ये एकूण 1.77 लाख मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
सध्या भाजपकडे मध्य प्रदेशमध्ये सत्ता असून, मिझोरममध्ये मित्रपक्ष सत्तेत आहे. काँग्रेसच्या ताब्यात राजस्थान, छत्तीसगड असून, तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समितीचे सरकार आहे.
लोकसभेचा विचार केला तर, एकूण देशभरातील लोकसभेच्या 543 पैकी 82 मतदारसंघ या राज्यांमध्ये येतात. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांत भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच सामना रंगतोय, तर तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) विरोधात काँग्रेस तसेच भाजप अशी तिरंगी लढत आहे. मिझोरममध्ये सत्तारूढ एनएमएफला काँग्रेससह झेडपीएम या स्थानिक पक्षाने आव्हान दिले आहे.
पाच राज्यांतील सद्यःस्थिती
सध्याच्या घडीला मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 जागांपैकी 128 जागा भाजपकडे आणि 98 जागा काँग्रेसकडे आहेत. राजस्थानमध्ये एकूण 200 जागा असून काँग्रेसचे 108, भाजपचे 70, आरएलडीचा एक, आरएलएसपीचे तीन, बीटीपी, डाव्यापक्षाचे प्रत्येकी दोन, 13 अपक्ष आमदार आहेत. छत्तीसगडमध्ये 90 जागा असून त्यात काँग्रेसचे 71, भाजपचे 15, बसपाचे दोन आणि जेजेएसचा एक आमदार आहेत.
राज्यांनुसार मतदान
मिझोरम ः 7 नोव्हेंबर
छत्तीसगड ः 7, 17 नोव्हेंबर
मध्य प्रदेश ः 17 नोव्हेंबर
राजस्थान ः 23 नोव्हेंबर
तेलंगणा ः 30 नोव्हेंबर
निकाल ः 3 डिसेंबर
भरारी पथकाकडून 953 कोटी जप्त
विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानाच्यानिमित्ताने निवडणूक आयोगाकडून पाचही राज्यात धडक कारवाई सुरू आहे. निवडणुकीसंबंधी जप्ती करत असताना रोख रकमेपासून मद्य, अमली पदार्थ अशा अनेक वस्तू भरारी पथकाच्या हाती लागल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये आयोगाने 9 ऑक्टोबर रोजी आदर्श आचारसंहिता लागू केल्यापासून 953.34 कोटींची रोकड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. रोख रकमेसह दागिने, मौल्यवान धातू, मद्य, अमली पदार्थ, गॅझेट आणि घरगुती वस्तूंचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.