>> 27 जागांवर विजय; सत्ताधारी एमएनएफचा दारुण पराभव
मिझोरम विधानसभा निवडणुकीत 27 जागा जिंकत झोरम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) ने सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) पक्षाचा दारुण पराभव केला. एमएनएफला केवळ 10 जागाच जिंकता आल्या. दुसरीकडे तीन राज्यांत बहुमत मिळवलेल्या भाजपला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
मिझोरामच्या 40 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. झेडपीएमने 27 जागा जिंकून बहुमत मिळवले.
विद्यमान मुख्यमंत्री आणि एमएनएफचे नेते झोरामथांगा यांचा आयझॉल-पूर्व 1 मतदारसंघातून पराभव झाला. त्यांचा झेडपीएमच्या लालथनसांगा यांनी त्यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. मिझोरमचे उपमुख्यमंत्री तवान्लुइया तुईचांग यांच्या मतदारसंघात झेडपीएमचे उमेदवार डब्ल्यू चुआनावामा यांनी बाजी मारली. 909 मतांच्या फरकाने त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पराभूत केले. दरम्यान दुसरीकडे पराभवानंतर झोरामथांगा यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
झेडपीएमचे सर्वेसर्वा लालदुहोमा यांनी चमकदार कामगिरी करत प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपण पक्षाच्या विजयाने आनंदी आहे. आपण येत्या 2 दिवसांत राज्यपालांना भेटून आपण सरकार स्थापनेचा दावा करेन. या महिन्यात शपथविधी होणार आहे, असे लालदुहोमा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा प्रमुखही राहिले आहेत. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदारही झाले; मात्र वादानंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती.