मिचौंग चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले

0
13

बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वादळ नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान बापटला येथे दुपारी 1 वाजता धडकले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या दरम्यान 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसही झाला. त्यानंतर वादळ कमकुवत होऊन पुढे सरकले. हवामान खात्याने बुधवारपर्यंत आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या वादळाचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये झाला. दोन्ही राज्यांमध्ये 100 हून अधिक रेल्वे आणि 50 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. 29 एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातून 9500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.

तमिळनाडूच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे राज्यात 2 दिवसांत 3 महिन्यांचा पाऊस पडला. पावसामुळे चेन्नई शहर जलमय झाले होते. या चक्रीवादळात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी वाहने, काही ठिकाणी घरे देखील पाण्याखाली गेली.
तमिळनाडूच्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नईमध्ये 70-80 वर्षांत पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे.