मिकी, आवेर्तानना मंत्रीपदाची शपथ

0
98
मंत्रीपदाची शपथ घेताना आवेर्तान फुर्तादो व मिकी पाशेको.

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेंकर यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. त्यानिमित्त काल राजभवनवर आयोजित शपथग्रहण सोहळ्यात आवेर्तान फुर्तादो व मिकी पाशेको यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली.राज्यपाल मृदूला सिन्हा या गोव्याबाहेर असल्याने हा शपथग्रहण सोहळा लांबणीवर पडला होता. काल शेवटी केंद्रीय संरक्षण मंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सर्व मंत्रीगण, आमदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. मिकी पाशेको यांनी इंग्रजीतून तर आवेर्तान फुर्तादो यांनी कोकणीतून शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपले सरकार सत्तेवर आले. पण मंत्र्यांचे खातेवाटप झाले नव्हते. त्यामुळे प्रशासन एकाप्रकारे ठप्प झाले. आज शनिवारी खोतवाटप होणार असून त्यामुळे सोमवारपासून मंत्री आपल्या खात्यांचा ताबा घेऊन कामे हाती घेतील.
मिळेल त्या खात्याचा आनंद
दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांनी मिकी पाशेको यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, जे खाते मिळेत ते आपण आनंदाने स्वीकारीन. आपण कोणताही गुन्हा केलेला नसून आपणावर खोटे आरोप करून लोकांनी खटले घातल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
अवेर्तात फुर्तादो यांनी आपणाला दुसर्‍यांदा मंत्रीपद मिळाल्याचे आनंद झाल्याचे सांगितले.
‘जलद कामांसाठी प्रशासनाला निर्देश’
भ्रष्टाचारमुक्त व चांगले प्रशासन देण्याबरोबरच राज्यातील गरिबातील गरीब लोकांच्या फायद्यासाठी आपले सरकार झटणार आहे. प्राधान्यक्रमाने मामलेदार कार्यालये, पोलीस स्थानके तसेच सरकारी इस्पितळे व आरोग्य केंद्रे येथे कामासाठी जाणार्‍या लोकांना चांगली सेवा देण्यात येईल. याकडे आपण खास लक्ष देणार असल्याचे पार्सेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मामलेदार, सरकारी डॉक्टर्स, पोलीसकर्मी यांना जनतेची कामे विनाविलंब व चांगल्या प्रकारे करण्याची सूचना करण्यात येईल. आपले सरकार जनतेच्या प्रती संवेदनशील असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात का स्थान देण्यात आले असे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, मिकी पाशेको यांना लोकांनी निवडून आणलेले आहे. यावेळी निवडून आल्यानंतर त्यांच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.