माहेरओढ पंढरीची…

0
54
  • – जनार्दन वेर्लेकर

आषाढी-कार्तिकीला ज्याची माहेरओढ लागते त्या जोडाक्षरविरहित विठोबाने माझे अवघे भावविश्‍व व्यापून टाकले आहे. विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, गोरोबा, विसोबा (खेचर), ज्योतिबा (फुले) आणि विनोबा (भावे) यांचं मराठी माणूस देणं लागतो.

आषाढी-कार्तिकीला ज्याची माहेरओढ लागते त्या जोडाक्षरविरहित विठोबाने माझे अवघे भावविश्‍व व्यापून टाकले आहे. विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, चोखोबा, गोरोबा, विसोबा (खेचर), ज्योतिबा (फुले) आणि विनोबा (भावे) यांचं मराठी माणूस देणं लागतो. इरावती कर्वेंचा हा बॉय-फ्रेन्ड, सावतामाळ्याचा ‘कांदा-मुळा भाजी’, संत एकनाथांसाठी ‘बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई’ आणि तुकोबा सहज त्याच्याशी सलगी करतात- ‘शिणभाग त्यासी सांगेन आपुला| तो माझा बापुला सर्व जाणे॥ नामयाच्या जनीचे दळण दळणारा, श्रीखंड्या बनून कावडी वाहणारा आणि दामाजी पंतासाठी तोच ‘झाला महार पंढरीनाथ| काय देवाची सांगू मात॥ थकल्या-भागल्या जनीवर मायेने आपला भरजरी शेला पांघरणारा आणि ‘कान्होबा, तुझी घोंगडी चांगली| आम्हास का दिली वांगली॥ या आपल्या भक्ताच्या सात्त्विक तक्रारीने सुखावणाराही तोच.

संतांना ताळकुटे, निरुद्योगी, दैववादी, निवृत्तीमार्गी म्हणून हिणवण्याचा, त्यांची निर्भत्सना, हेटाळणी करणार्‍यांचाही एक पक्ष त्यांच्या काळी होताच आणि आजही आहे. प्रागतिक, बुद्धिप्रामाण्यवादी हे या पक्षाचे स्वयंघोषित पुढारी- समर्थक. अशा संतांच्या म्हणा वा ईश्‍वरनिष्ठांच्या मांदियाळीत निवृत्ती आणि विरक्तीची-वैराग्याची कास न धरता प्रवृत्तीमार्गी, समाजसन्मुख आचरणाची मशाल तेवत ठेवणारे संतसज्जन अलीकडच्या काळात निपजल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. सार्वजनिक सत्यधर्माची ध्वजा फडकवणारे, उच्च-नीच, जाती-वर्ण यांचा प्रखर निषेेध करणारे, स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष करणारे तुकोबांचे ‘अभंग’ तसे ज्योतिबांचे ‘अखंड’ समाजप्रबोधनाला चालना देणारे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं विस्मरण म्हणूनच आमच्या करंटेपणाची झाडाझडती घेणारं. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आचार्य विनोबा भावे ही बापमंडळी मराठी मुलुखात निपजली हे वास्तव दुर्लक्ष करण्यासारखे नाही. समर्थ रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद आणि आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्या सत्‌प्रवृत्तीची पायाभरणी तर आपल्या देशातील युगपुरुषांनीच केलेली आहे. गोष्टीरूप गौतमबुद्ध चरित्राच्या वाचनाने गोव्यातील एका शाळकरी, संस्कारक्षम मुलाच्या आयुष्याचा कायाकल्प झाला. प्रकांड पंडित आचार्य धर्मानंद कोसंबी यांची गोष्ट अशी स्फूर्तीदायी-प्रेरणादायी. शिवबा ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे परिवर्तन समर्थ रामदास आणि तुकोबा यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे आणि सत्‌शिष्याच्या आदर्शवत आचरणाचे द्योतक. या जोडगोळीमुळे मराठी जनमानसाला लाभला- ‘निश्‍चयाचा महामेरु| बहुतजनांसी आधारु|’
समाज म्हणून आपण वर्तमानात न जगता निरंतर भूतकाळातच वावरतो का? ‘सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख’ हे समर्थवचन आपण कायम अडगळीत, विस्मरणात टाकून इतिहासाचे गोडवे गाण्यात धन्यता मानतो का? प्रश्‍न अंतर्मुख करणारा आहे. माझ्या या लेखाचे पहिले दोन परिच्छेद हाच यासाठी सबळ पुरावा म्हणायला हरकत नसावी. मीच स्वतःकडे केलेला हा अंगुलिनिर्देश. मात्र आता अधिक फापटपसारा टाळून शुभवर्तमान सांगायला हवे. म्हणून प्रतिपाद्य विषयाकडे वळतो.

ही कथा आजोबा- नातीची. मडगाव येथील विद्याभारती शाळेत तिसर्‍या इयत्तेत शिकणारी माझी नात वेदिका तिच्या नेहमीच्या उत्साहाने ओसंडलेल्या लाघवी स्वरात माझ्याशी किलबिलली. ‘‘आजोबा, आमच्या शाळेत आषाढी-एकादशीचा उत्सव आहे. तर तू मला एखाद्या संताची गोष्ट लिहून द्यायची. नाहीतर एखादा अभंग गायला शिकवायचा. आमच्या वर्गशिक्षिकेने आम्हाला घरी गोष्टीची, अभंगाची प्रॅक्टिस करायला बजावलं आहे. मला तुझी मदत हवी.’’ थोडक्यात तिचा हक्काचा लडका म्हणजे आजोबाची सत्त्वपरीक्षा. मग मी तिला आश्‍वस्त केलं- ‘‘मी तुला गोड, सोपा अभंग शिकवीन.’’

आजोबाची शब्द देण्याबद्दल ख्याती; ती पाळण्याबद्दल नाही. म्हणते कशी- ‘‘तू नेहमीच वाचनात- लेखनात निमग्न. नाहीतर संगीत ऐकण्यात आणि क्वचित स्वान्तःसुखाय पेटीवर गाणी वाजवण्यात हरवलेला. आमच्या वाट्याला तसा कमीच.’’ तिच्या सहज बोलण्यात तक्रारीचा सूर कमी. मी तिची इच्छापूर्ती खात्रीने करीन हा तिचा आशावाद मात्र बळकट. तिच्यामुळेच तर अस्मादिकांच्या ‘आजोबा’ या पदवीचे अप्रूप आणि सार्थक.
आर्या मोरोपंताची, ओवी ज्ञानोबाची, अभंग तुकोबाचा. असे कितीतरी अभंग मला मुखोद्गत. माझ्या पिढीचे हे मौखिक संचित. अभंग अल्पाक्षरी असावा. तो फारसा तत्त्वचिंतनात्मक, गंभीर प्रकृतीचा नसावा. शक्यतो माझ्या नातीला त्याचा अर्थ उमगायला सोपा असावा. आणि शब्दबंबाळ, जोडाक्षरविरहित असेल तर दुधात साखर. डोक्याला फारसा ताप न देता सरळ जगद्गुरू तुकोबाला शरण गेलो. या निवडीत माझ्या एकापेक्षा एक आवडत्या अभंगांवर मला नाईलाजाने फुली मारावी लागली. माझे निकषच माझ्या निवडीवर वरचष्मा गाजवायला लागले. या अमृतमंथनातून तुकोबाच्या या अभंगाने मला माझ्या नातीला दिलेल्या शब्दाला जागल्याचे समाधान दिले-
देव माझा मी देवाचा| हीच माझी सत्य वाचा॥
देह देवाचे देऊळ| आत-बाहेरी निर्मळ॥
देव पहायास गेलो| देव होऊनिया आलों॥
तुका म्हणे धन्य झालों| आज विठ्ठला भेटलों॥
अभंगाचे एकूण शब्द सव्वीस. राग भैरवी. अर्थात आमच्या सांगे या गावातील साप्ताहिक भजनाची सांगता भैरवीचे सूर आळवून होते हे वेगळं सांगायची गरज नाही. खरे तर भैरवी ही रागिणी. संस्कृत ग्रंथांमध्ये या रागिणीचा समय प्रातःकाल. मात्र आपल्या संगीतविश्‍वात ती सदारंजनी मानली गेली आहे. मैफल संपल्याची हुरहुर लावणारी, कधी विरहिणी, कधी विकल मनोवस्था मुखर करणारी, तर कधी ‘अवघा रंग एक झाला| रंगी रंगला श्रीरंगा॥ ‘आनंदाचे डोहीं आनंद तरंग| आनंदची अंग आनंदाचें॥ ‘अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता| चरणी जगन्नाथा चित्त दिनू ठेले॥ किंवा ज्ञानोबा माऊलीच्या शब्दांत ‘आजि सोनियाचा दिनू| वर्षे अमृताचा घनू| हरि पाहिला रे॥ आनंद-तृप्ती-साफल्याचा अमृतमेघ बरसल्याचा साक्षात्कार घडवणारी भैरवी, अशा नानाविध भावभावनांच्या आविष्कारात तन्मय भैरवी एकाच वेळी विरहाची अतृप्ती आणि सर्जनाची-नवनिर्माणाची तृप्ती-हमी-दिलासा देणारी.

भैरवीचा गहन, सखोल अर्थ वेदिकाला समजावून सांगण्याच्या फंदात मी पडलो नाही. सोप्या शब्दांत तुकोबाच्या अभंगाचा अर्थ मी तिला उलगडून दाखवला. तिने व्याकरणाची एक चूक माझ्या नजरेस आणून दिली- अर्थात तिच्या बालसुलभ जिज्ञासेने. ‘वेदी म्हणे धन्य झाली| आज विठ्ठला भेटली॥ आजोबा, मी खरे तर असं म्हणायला नको का?’ मी तिची समजूत काढली. ‘तू म्हणत असलीस तरी अभंग तुकोबाचा आहे.’ (त्याच्या भाववृत्तीशी एकरूप होऊन तो आळवायचा असतो. हे मी मनातल्या मनात बोललो.) वयपरत्वे तिची उमज-समज वाढेल. तुकोबाची वाणी वज्रलेख. लक्षावधी वारकरी-भक्त-सज्जनांच्या ओठीं ती सुखरूप-सुरक्षित आहे. जरा-मरणाची तिला भीती नाही. ती अजर-अमर.
सासर- माहेर- संसार- सासुरवास- माया- ममता- भक्ती- प्रीती- श्रद्धा या शब्दांचा अर्थ उमगायला तिला अजून खूप अवकाश आहे. पेटीवर तिला साथसंगत करताना ती मला म्हणाली- ‘‘शाळेत मला तुझ्या पेटीची साथसंगत नसेल. मग प्रॅक्टिस करताना ती कशाला? अशाने माझे लक्ष विचलित होते. शब्द आणि सूर यांची गल्लत होते.’’ तिच्या या प्रश्‍नावर मी निरुत्तर झालो. तिची शिकण्याची इच्छा, लगनच तिला तिचा सूर मिळवून देईल. शांक-नील या बंधुद्वयांनी संगीतबद्ध केलेल्या आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी आळवलेल्या तुकोबाच्या या अभंगाची तिच्या पुढच्या वाटचालीत तिला माहेरओढ लागेल हे माझे स्वप्नरंजन आहे-
विठ्ठल सोयरा सज्जना विसावा| जाईन त्याच्या गावा भेटावया॥
शिणभाग त्यासी सांगेन आपुला| तो माझा बापुला सर्व जाणे॥
माय-माऊलीया बंधू-वर्गा जाणा| भाकीन करुणा सकळीकांची|
माझीया माहेरा सुखा काय उणे| नलगे येणे जाणे तुका म्हणे॥