‘मास्क’ टोळीकडून 50 तोळे सोने जप्त

0
7

>> गेल्या 6 महिन्यांत मास्क परिधान करणाऱ्या टोळीकडून राज्यात 19 घरफोड्या

मास्क परिधान करून नंतर घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या एका टोळीने राज्यात उच्छाद मांडला असून, आत्तापर्यंत त्या टोळीने 19 घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ह्या टोळीकडून सुमारे 500 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

गेल्या 6 महिन्यांपासून उत्तर गोव्यात एका मास्क परिधान करणाऱ्या टोळक्याकडून घरफोड्या केल्या जात असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. राज्यातील विविध पोलीस स्थानकात याबाबत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, असे अक्षत कौशल यांनी सांगितले.

पर्वरी पोलिसांनी गेल्या आठवड्यात मास्क परिधान करून चोरी करणाऱ्या मारियो सांताना बाप्टिस्ता (रा. बाणावली) आणि त्याचा साथीदार मोहम्मद सुफियान (रा. नावेली मडगाव) या दोघांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये मारियो बाप्टिस्ता याने मास्क परिधान करून फेब्रुवारी 2024 पासून राज्यभरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचे सोन्याचे दागिने फिलिप राटो याच्याकडे सुपूर्द केल्याची कबुलीही त्याने दिली. तो त्यानंतर चोरलेले सोन्याचे दागिने मडगाव येथे छोटे दागिन्यांचे दुकान असलेले सुवर्णकार समर पाल याला विकायचा. त्यानंतर पर्वरी पोलिसांनी फिलिप राटो आणि समर पाल यांना अटक केली. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान मडगाव येथील ज्वेलर्स दीपक बांदोडकर आणि आरोपी समर पाल यांच्याकडून एकूण 442 ग्रॅम चोरीचे वितळलेले सोने जप्त करण्यात आले आहे. याशिवाय 100 ग्रॅम चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध घेण्यात यश आले असून, योग्य वेळी सोने ताब्यात घेतले जाणार आहे, असेही कौशल यांनी सांगितले.

मास्क टोळीने पर्वरी भागात 4, पणजी येथे 4, आगशी येथे 2, म्हापसा येथे 1, हणजूण येथे 2, फोंडा येथे 5 आणि जुने गोवा येथे 1 घरफोडी केल्याची कबुली दिली आहे, असे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.