>> स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्यास सरकार का घाबरते ?
गोवा सरकार परराज्यातून येणार्या मासळीत फॉर्मेलीन घालणार्या मासळी माफियांना पाठीशी घालू पाहत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
फॉर्मेलीन प्रश्नी आम्ही सभागृहात मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यास सरकार का घाबरत आहे, असा प्रश्न कवळेकर यांनी केला व राज्यातील १५ लाख लोकांच्या आरोग्याची त्यांना मुळीच चिंता नाही हे सरकारच्या भूमिकेवरून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
फॉर्मेलीनचा जास्त वापर करण्यात येतो तो मोठ्या मासळीत असे सांगून लहान मुलांना मासळी खाताना मासळीचा काटा लागू नये यासाठी लोक मुलांना पापलेट, सुरमई अशी मोठ्या आकाराची मासळी खाऊ घालत असतात. ह्या कोवळ्या मुलांच्या पोटात फॉर्मेलीन गेले तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही, असे कवळेकर म्हणाले. आम्ही नेते आजारी पडलो तर आम्ही लवकर बरे व्हावे यासाठी लोक प्रार्थना करतात असे सांगून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही गंभीर व्हायला नको काय, असा सवालही कवळेकर यानी केला. सभापती प्रमोद सावंत यांनी निदान यावेळी तरी आपला अहंकार बाजूला ठेवून आमची मागणी मान्य करायला हवी होती, असे ते म्हणाले.
‘ते’ ट्रक गेले कुठे?
फॉर्मेलीन लावून मासळी घालून आणलेले व अन्न आणि औषध प्रशासनाने ताब्यात घेतलेले परराज्यातील ते १७-१८ ट्रक गेले कुठे. सरकारने जर ते ताब्यात घेतले असतील तर ते सध्या कुठे आहेत. त्यातील मासळीचे काय करण्यात आले हे सरकारने सांगायला हवे. ती मासळी बाजारात आणून गोव्याचीच मासळी असल्याचे सांगून विकण्यात तर आली नाही ना, असा प्रश्नही यावेळी कवळेकर यांनी केला. तसेच सरकारने यावर खुलासा करावा अशी मागणी केली. मासळीचे ट्रक जप्त न करण्यामागील कारण काय तेही सरकारने सांगावे असे ते म्हणाले.
फॉर्मेलिनयुक्त मासळी आणणार्या
इब्राहिमला अटक करा : फालेरो
गोव्यातील १५ लाख लोकांना फॉर्मेलीन नावाचे घातक रसायन खाऊ घालणार्या मौलाना इब्राहीम व त्याच्या साथीदारांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
मौलाना इब्राहीम व त्याच्या साथीदारांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला असताना अजून त्यांच्यावर एफ्आय्आर कसे नोंद करण्यात आले नाही, असा सवालही फालेरो यांनी केला.
अन्न आणि औषध प्रशासनाने ताब्यात घेतलेली मासळी व ट्रक कुठे गेले, असा सवालही फालेरो यांनी केला.
यावेळी आमदार जेनिफर मोन्सेर्रात म्हणाल्या की फॉर्मेलीन हा गंभीर विषय आहे. पण सभापती प्रमोद सावंत यानी ह्या प्रश्नावर आम्हाला बोलू दिले नाही. फॉर्मेलीनचे सुरक्षित असे प्रमाण असूच शकत नसल्याचे त्या म्हणाल्या. फॉर्मेलीन असलेल्या मासळीचे सेवन केल्यास गर्भवती महिलेचा गर्भपात होऊ शकतो. अथवा गर्भाला इजा होऊ शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे असल्याचे त्या म्हणाल्या. ह्या मासळी माफियांवर कठोर कारवाई करण्याची गरज मोन्सेर्रात यानी व्यक्त केली.
फॉर्मेलिन : कॉंग्रेसचा
मार्ग बरोबर नाही
मासळीतील फॉर्मेलीन हा एक गंभीर विषय आहे. पण, कॉंग्रेस पक्षाने सभागृहात या विषयावर चर्चेसाठी अवलंबिलेला मार्ग बरोबर नाही, अशी टिका भाजपचे आमदार निलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत केली.
कॉंग्रेस पक्षात अनेक ज्येष्ठ आमदार आहेत. परंतु, सभागृहाच्या कामकाजाच्या नियमाबाबत ‘ते’ अनभिज्ञ आहेत, असा दावा काब्राल यांनी केला.
सभागृहाचे कामकाज रोखण्याचा कॉंग्रेस पक्षाचा उद्देश स्पष्ट होत नाही. आपण मासळीतील फॉर्मेलीनच्या विषयावर लक्षवेधी सूचना गुरूवारी दिली आहे. त्याला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी उत्तर देणार आहेत, असेही काब्राल यांनी सांगितले.