मच्छीमारी खात्याच्या प्रस्तावित मासळी महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाकारलेला नाही. मच्छीमारी खात्याकडून मासळीच्या दरावर नियंत्रण आणून नागरिकांना स्वस्त दरात मासळी उपलब्ध करून महामंडळ स्थापन करण्यामागील उद्देशाची पूर्तता केली जाऊ शकते, असा दावा मच्छीमारी मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.
माजी मच्छीमारी मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मासळी महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला नकार दिला, असा आरोप केला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मच्छीमारी मंत्री रॉड्रीगीस यांनी वरील माहिती दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी मासळी महामंडळाच्या प्रस्तावाबाबत चर्चा केली जाणार आहे. राज्यातील नागरिकांना माफक दरात मासळी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी मच्छीमारी खात्याकडून मासळीच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य पाऊल उचलण्यात येणार आहे, असेही मंत्री रॉड्रीगीस यांनी सांगितले.
म्हादई प्रश्नी न्यायालयीन लढा सुरूच राहणार आहे. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडून कर्नाटकाला म्हादईबाबत देण्यात आलेल्या पत्राबाबत निर्णय कळविण्यात उशीर होत असला तरी, केंद्राचा निर्णय सकारात्मक असणार आहे, असा दावा मंत्री रॉड्रीगीस यांनी केला.