पणजी (प्रतिनिधी)
आयात करण्यात येणार्या मासळीची तपासणी आणि देखरेख ठेवण्यासाठी निर्यात तपासणी परिषदेचे (ईआयसी) सहकार्य घेतले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी ट्विट संदेशातून काल दिली.
राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याबरोबर बैठक घेऊन मासळीतील फॉर्मेलीनशी निगडीत विषयावर चर्चा केली. मासळीतील फॉर्मेलीनची तपासणी करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असलेली प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी निर्यात तपासणी परिषद (ईआयसी) सहकार्य करणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली आहे.
ईआयसीच्या सहकार्यातून मासळीतील फॉर्मेलीनच्या तपासणीसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. राज्यात विक्री करण्यात येणारी मासळी खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे दाखविण्यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. मोबाईल अन्न तपासणी प्रयोगशाळा तसेच मासळीतील फॉर्मेलीन तपासणीसाठी सुसज्ज कार्यालय व प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एफडीएने मासळीतील फॉर्मेलीनच्या प्रश्नावर नागरिकात पुन्हा एका विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.