मावळिंगेत कोल्ह्याच्या  हल्ल्यात दोन मुले जखमी

0
100

वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष विकोपाला जाऊ लागलेला असून रविवारी भराडे-मावळिंगे येथे एका कोल्ह्याने दोन लहान मुलांवर हल्ला करून त्याना जखमी करण्याची घटना घडली. दोन्ही मुलांना उपचारासाठी म्हापसा आझिलो इस्पितळात हलवण्यात आले आहे.
सदर घटना काल सकाळी ९ च्या सुमारास घडली. भराडे-मावळिंग येथे घराबाहेर असलेले संजय देवारकर (१२) व सिध्दार्थ देवारकर (७) या दोन मुलांवर कोल्ह्याने हल्ला केला.सदर कोल्हा गवताच्या बाजूने अचानक आमच्यासमोर आला त्याने आपल्या तोंडावर पंजा मारला तसेच डोक्याला चावा घेतल्याने रक्त आल्याने संजय देवारकर या मुलाने सांगितले. त्यानंतर त्याने सिध्दार्थ याच्या कमरेला जखम केली व तिथून अंतरावर निघून गेला. घडल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलांनी आरडाओरड करताच आईवडीलांनी त्यांना त्वरित दुचाकी करून डिचोली इस्पितळात आणले. इस्पितळात येण्यासाठी येत असताना सदर कोल्हा पुन्हा त्यांच्या गाडीमागून धावून आल्याने सांगण्यात आले. डिचोलीत प्राथमिक उपचार करून जखम मोठी असल्याने व त्यातच कोल्ह्याची लाळ मोठ्या प्रमाणात गळत असल्याचे लक्षात आल्याने कोल्हा पिसाळलेला असल्याची शक्यता लक्षात घेऊन जखमीना म्हापसा येथे हलवण्यात आले. म्हादई अभयारण्याचे वन अधिकारी परेश परोब यांना या प्रतिनिधीने माहिती देताच त्यांनी त्वरित वन अधिकारी व कर्मचार्‍यांची तुकडी घटनास्थळी पाठवली. परेश परोब, ऍडवर्ड रॉड्रिग्स, तृशांत नाईक, प्रदीप सिनारी आदींनी स्थानिकाच्या सहकार्याने या भागाचा तपास करत परिसर धुंडाळला त्यांना दोन ठिकाणी कोल्ह्याच्या ढोली व खुणा सापडल्याचे परेश परोब यांनी सांगितले. सदर कोल्ह्याबरोबर काही लहान पिल्ल्यांचा समावेश असल्याची शक्यता असल्याने पिल्लांच्या संरक्षणासाठी त्याने समोरील मुलांना जखमी केले असावे अशी शक्यता परेश परोब यांनी व्यक्त केली. मात्र नेमके कारण स्पष्ट झालेले नसून या भागात सर्वत्र पाहणी केली असता एकाच कोल्ह्याच्या पाऊल खुणा आढळल्याने सांगण्यात आले.