- जनार्दन वेर्लेकर
कारेकरांना पहिल्यांदा सवाई गंधर्व समारोहात गाण्यासाठी पं. भीमसेन जोशी यांनी संधी दिली. त्यांच्या मैफलीची वेळ रात्री अकरा-साडेअकराची. त्यांच्या आधी बेगम अख्तर गायलेल्या. प्रसंगावधान राखून कारेकरांनी ‘अहिर भैरव’ या रागाची आळवणी केली. नंतर त्यांनी आपल्या ठेवणीतले ‘प्रिये पहा’ हे नाट्यपद आळवायला सुरुवात केली आणि हजारो कानसेनांनी आपले कान टवकारले. कारेकरांवर पुष्पवृष्टी व्हावी तशी ‘वन्स मोअर’ची बरसात सुरू झाली.
तुला एकेरी संबोधताना मनात ममत्वाशिवाय अन्य भाव नाही. पण तू अस्ताचलाला गेल्यावर तुझी स्वर-सुवर्णतुला करण्याची ऊर्मी मनात दाटून आली आणि खरं सांगतो, माझी पुरती दमछाक झाली. मडगावच्या न्यू इरा हायस्कूलमध्ये व्याकरणाच्या तासाला पारकर सरांनी मेजावर तबल्याचा ठेका धरताना तुला रंगेहात पकडले- तुझ्याजवळ त्यांना शालेय पुस्तकांऐवजी अभंगाची चोपडी गवसली- तेव्हा तुझी जी त्रेधातिरपीट उडाली त्याहून अधिक माझी घाबरगुंडी उडाली एवढं खरं. पारकर मास्तरांनी दम भरल्यागत तुला दटावलं- ‘इंटरव्हलला स्टाफरूममध्ये मला भेटायला ये.’ तुझ्या उरात धडकी भरलेली. आज्ञाधारकपणे तू त्यांना सामोरा गेलास. ‘काय करीत होतास?’ सरांची पृच्छा- कानउघाडणी? ‘भजन गुणगुणत होतो.’ ‘अच्छा- तू गातोस?’ ‘थोडंफार.’ ‘म्हणून दाखव.’ सरांचं कुतूहल चाळवलेलं. आणि तू चक्क ‘सं. कुलवधू’ या नाटकातली पं. सुरेश हळदणकर आणि ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली तोंडपाठ नाट्यपदे ‘हेतू थोर साध्य होत सुंदरता मनाची’ आणि ‘मनरमणा मधुसूदना’ या गाजलेल्या पदांची झलक सरांना ऐकवली. हेडमास्तर गायतोंडे या बालगायकाच्या मैफलीचे दुसरे साक्षीदार. दोघांनीही कौतुकाने तुला आश्वस्त केले. ‘हायस्कूलच्या येत्या वार्षिक स्नेहसंमेलनात तुझी निवड आम्ही नक्की केली आहे.’ संमेलनात तुला ‘वन्स मोअर’ मिळाले. नाट्यपदांनंतर भजनाची फर्माईश झाली. श्रोत्यांमध्ये गुरुदासबाब तिंबलो, रघुवीर रायकर, रामनाथ लोटलीकर यांनी तुझं भरभरून कौतुक केलं. तुझ्या वडिलांना- जनार्दन कारेकर यांना- खास पाचारण करून ‘मुलाचा कल संगीताकडे आहे- उत्तम गुरूची तालीम लाभली तर त्याचं भविष्य उज्ज्वल आहे’ असा कानमंत्र दिला. वडिलांनी तो शिरोधार्य मानला. त्यांच्या मनानं घेतलं- ‘पाचामुखी परमेश्वर.’ पाच भावंडांपैकी मोठा नारायण आणि दुसरा प्रभाकर यांना घेऊन मुंबई गाठायची. इथून प्रभाकरच्या खडतर संगीतसाधनेची सुरुवात झाली.
पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत पासपोर्ट मिळवणे सहजसाध्य नव्हते. मग मडगाव-कुळे हा प्रवास रेल्वेने, वाटाड्यांच्या सहाय्याने कुळे ते कॅसलरॉक व कॅसलरॉक ते बेळगाव लपतछपत पायपीट आणि अखेरीस बेळगावला सत्याग्रही अशी बतावणी करून रेल्वेने मुंबईपर्यंतचा प्रवास पितापुत्रांनी जीव मुठीत धरून केला. ओळखीच्या नातलगाकडे सोय आणि सर्वप्रथम पं. हळदणकरबुवा यांना गाठून मुलांच्या संगीतशिक्षणासाठी त्यांना राजी करायचं, या निर्धाराने त्यांनी हे साहस केले होते. हळदणकरबुवांनी पितापुत्रांचं स्वागत केलं. त्यांचे गाणे ऐकायची इच्छा व्यक्त केली. प्रभाकरच्या गाण्याने ते सुखावले. ‘मी याला शिकवीन; नारायणची सोय अन्यत्र करावी,’ बुवांनी आपला निर्णय बोलून दाखवला. पेटी वाजवायचा सराव असलेल्या नारायणला दुसरीकडे वेल्डिंगच्या कामाची नोकरी मिळाली. तिथेच फुटपाथसदृश्य जागेवर दोघांच्या निवासाची सोय झाली. त्यांच्या खडतर आयुष्याची अग्निपरीक्षा सुरू झाली.
एक दिवस हळदणकरबुवांनी प्रभाकरला विचारले, ‘निवासाची व्यवस्था काय आहे?’ शिष्याने आपली अवघडलेली अवस्था गुरूच्या कानी घातली. त्यांचं मन द्रवलं. ‘आजपासून तू इथेच राहायचं.’ गुरुगृही तब्बल दहा वर्षे राहून गाण्याच्या रियाजाच्या जोडीने घरातली सगळी कामे हसतमुखाने करीत शिष्याने गुरुजींचा विश्वास संपादन केला. गुरुपत्नी कलावतीने आपली मुले आणि प्रभाकर यांच्यामध्ये भेदभाव केला नाही. उलट त्याला मायेची ऊब दिली. त्याच्या येण्या-जाण्यावर, वागण्यावर वडीलकीच्या नात्याने चांगल्या अर्थाने जरब ठेवली. मुळात बुवा निर्व्यसनी, शिस्तप्रिय, अहोरात्र मैफली आणि शिकवण्या या जीवनक्रमाला कटिबद्ध. ही निष्ठा त्यांनी आपल्या या शिष्यात रुजवली.
मा. दीनानाथ, पं. हळदणकरबुवा आणि शिष्योत्तम प्रभाकर यांच्या कंठमाधुर्याची गोडी म्या पामरे काय वर्णावी? भिंगरीसारखी तान किंवा गळ्याची अद्भुत फिरत किंवा तिन्ही सप्तकांत प्रपातासारखी लीलया विहरताना ऐकणाऱ्यांची मती कुंठीत करणारी आणि त्याला सूरलयीच्या हिंदोळ्यावर झोके घ्यायला बाध्य करणारी अशी ज्यांची ख्याती त्यांच्या स्वर-सुवर्णतुलेचा व्यर्थ अट्टहास करणारा मी असा कोण कानसेन वा टिकोजीराव? हा अव्यापारेषु व्यापार करण्यापेक्षा एक उदाहरण देऊनच या विषयाला पूर्णविराम देतो.
नामयाचा एक अभंग. शब्द आहेत- ‘दीनाची माऊली आजि म्यां देखियली.’ संगीतरचना विमल लुकतुके यांची. गायक अर्थातच पं. प्रभाकर कारेकर. पंडितजींच्या गळ्याची मुलायम फिरत आणि दमसास यांचा सुवर्णसंगम अनुभवायचा असेल तर या अभंगाच्या श्रवणाला पर्याय नाही. मी शिष्योत्तमाला गुरुजनांच्या पंक्तीत बसवतो आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर वाचक हो, क्षमस्व! तसा माझा अजिबात इरादा नाही. शिष्याच्या गळ्याची फिरत अनुभवताना जर मला हमखास हळदणकरबुवा आठवतात तर तो दोष माझा नाही. प्रभाकर या शिष्योत्तमाच्या डोळस श्रवणसाधनेचा हा महिमा आहे. ‘नकल आत्महत्या हैं।’ कुमार गंधर्व यांचं हे आवडतं विधान. शिष्योत्तमाने हे विधान शिरोधार्य मानताना नीरक्षीर विवेकाला सोडचिठ्ठी दिली नाही.
एका दशकानंतर हळदणकरबुवांची छत्रछाया सोडण्याचा निर्णय घेताना गुरू-शिष्याच्या नात्यात आणि मनात कालवाकालव झाल्याशिवाय कशी राहील? अभिषेकीबुवा यांच्या गळाला चांगल्या अर्थाने प्रभाकरसारखा नेक आणि संगीताप्रति एकनिष्ठ शिष्य लाभावा ही नियतीची योजना होती एवढं खरं. हळदणकरबुवांनी प्रभाकरला आत्मविश्वास देताना त्याच्या भावी स्वरसिद्धीची पायाभरणी केली. अभिषेकींनी त्याला समजावलं. गुरूप्रमाणे काळी चार पट्टीत गाऊन फाल्गुनरावाच्या शैलीत प्रभाकरला फटकारलं- ‘शिणवू नको कंठ असा तृषीत न मी बोधरसा.’ ख्यालमांडणीत मंद्र आणि मध्य सप्तकात जो भारदस्तपणा सामावला आहे तो तारसप्तकात नाही. काळी पट्टी एक वा दोन ही ख्यालगायकीच्या मर्मबंधातली, कलाकार आणि श्रोत्यांना अंतर्मुख करणारी ठेव. शिवाय तुझी नजर गायक म्हणून अखिल भारतीय नव्हे वैश्विक हवी. म्हणून ती गोवा-महाराष्ट्रापुरती सीमित नको. गाण्यातला कोणताही प्रकार हलका-वर्ज्य नाही. आणि आयुष्यभर रियाजाला- शिष्यवृत्तीला पर्याय नाही.
प्रभाकर बुवांकडून काय शिकले याचे एक मासलेवाईक उदाहरण देण्याचा मोह येथे मला आवरत नाही. जवळपास आठ वर्षे प्रभाकर बुवांच्या सहवासात बहरले. एकदा नांदेडहून कार्यक्रम करून बुवा पहाटे घरी पोहोचले. शिष्य कारेकर स्वरसाथीला त्यांच्याबरोबर होता. प्रवासात दोघांना थोडीही झोप मिळाली नव्हती. घरी पोहोचल्यावर विद्याताईंनी दोघांचे चहापाणी केले. बुवांनी आंघोळ केली, ताजेतवाने झाले आणि लगेच त्यांनी तंबोरा काढला. कारेकर म्हणाले, “अहो बुवा, थोडी विश्रांती घ्या. मग आपण रियाज करू.” बुवा म्हणाले, “नाही. आधी रियाज मग विश्रांती. कारेकर, तुम्हाला रोज भूक लागते ना? रोज जेवता ना? तशी रियाजाची भूक लागली पाहिजे.” (हा उतारा शैला मुकुंदलिखित ‘अभिषेकी’ या चरित्रग्रंथातून साभार.) गुरू-शिष्याची अशी जोडगोळी गोमंतभूमीत निपजावी हे या संगीताच्या माहेरघराचे अहोभाग्य.
पं. जगन्नाथबुवा पुरोहित आणि पं. सी. आर. व्यास यांच्या व्युत्पन्न सहवासाचा भाग्ययोग शिष्य म्हणून कारेकरांच्या कुंडलीत होता. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या घराण्यांतल्या उत्तमोत्तम दागिन्यांचा- अलंकारांचा सोस म्हणा वा असोशी जिथे दस्तुरखुद्द अभिषेकीबुवांना कायम हवीहवीशी वाटत राहिली तिथे कारेकरांनाही तो मोह आवरता आला नाही याचे नवल वाटण्याचे कारण नाही. “व्यासबुवांकडून मला झुमरा-तिलवाडासारख्या तालांत निबद्ध बंदिशी शिकायला मिळाल्या. रागशुद्धतेला बाधा न आणता अनवट आणि जोड रागांची मैफलीत मांडणी कशी करावी हे मी त्यांच्याकडून शिकलो.”
अशा बुजुर्ग गुरुजनांच्या सहवासाचा असर कारेकर या शिष्योत्तमाला लाभल्यामुळे एक हमखास, हुकमी मैफल रंगवणारा गायक म्हणून हळूहळू कारेकरांचा सार्वत्रिक दबदबा सुरू झाला. मैफल हे विद्वत्ता पाजळण्याचे नव्हे तर श्रोत्यांच्या वकुबानुसार आणि स्थल-काल-परिस्थितीनुरूप त्यांच्या कसोटीला उतरण्याचे कलाकार म्हणून उत्तरदायित्व आहे, ही अभिषेकीबुवांची शिकवण कारेकरांनी प्रमाण मानली आणि मिळेल त्या संधीचे सोने केले.
कारेकरांच्या आयुष्यातली एक संधी त्यांचे नाव संगीतविश्वात चिरस्थायी करणारी ठरली. रसिकाग्रणी पु. ल. देशपांडे यांनी ‘रंगसंगीत’ या नाट्यसंगीतावर बेतलेल्या कार्यक्रमाची सुविहित आखणी केली. कार्यक्रमाचं शीर्षक ठरलं- ‘शाकुंतल ते सौभद्र.’ सूत्रनिवेदन पु.लं.चे, त्यामुळे या कार्यक्रमाचे औत्सुक्य कमालीचे वाढले. पं. वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा, पं. कुमार गंधर्व, ज्योत्स्ना भोळे, पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा या स्वनामधन्य कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर, अशी या कार्यक्रमाची हवा संगीतविश्वात पसरली. ‘सौभद्र’ या नाटकातील ‘नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा’ आणि ‘प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा’ या नाट्यपदांसाठी पु.लं.ना एक कलाकार हवा होता. लालजी देसाई हे उत्तम तबलावादक आणि बालगंधर्वांच्या गायकीचे अभ्यासक. त्यांनी पु.लं.ना प्रभाकर कारेकर या नवोदित गायकाची सहज शिफारस केली. पु.लं.चं आमंत्रण म्हटल्यावर कारेकर मोहरले. मात्र त्यांच्यासाठी जी नाट्यपदं पु.लं.नी निवडली होती त्यामुळे त्यांचा थोडा विरस झाला. कारण ही नाट्यपदे त्यांच्या ठेवणीतली नव्हती. मात्र पु.लं.नी त्या पदांची तालीम कारेकरांना दिली. ‘सौभद्र’ या नाटकातल्या पदांनी कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगणार होता. अर्थात कारेकर कार्यक्रमाचे शेवटचे भिडू म्हणून श्रोत्यांना सामोरे जाणार होते. त्यांच्या मनात धाकधूक होती. शेवटी पु.लं.च्या निवेदनानंतर ते श्रोत्यांना सामोरे आले. दोन्ही पदे त्यांनी त्यांच्या शैलीत आत्मविश्वासाने आळवली. मात्र ‘प्रिये पहा’ हे नाट्यपद आळवताना कारेकरांनी आपल्या दमसासयुक्त तानांच्या लडी उलगडल्या, त्या ऐकताना श्रोत्यांची जणू स्वरसमाधी लागली. ‘वन्स मोअर’च्या अविरत बरसातीत कारेकर चिंब भिजले. ‘प्रिये पहा’ या नाट्यपदावर जणू त्यानंतर पंचेचाळीस वर्षे कारेकरांची मक्तेदारी प्रस्थापित झाली. या कार्यक्रमाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांची खास उपस्थिती होती. कार्यक्रम संपल्यावर ते आवर्जून कारेकरांना भेटले. त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आपली गाडी पाठवून मुंबईत ते जिथे उतरले होते तिथे त्यांनी कारेकरांना बोलावून घेतले. त्यांना यथेच्छ नाश्ता दिला. एका आकस्मिक जुळून आलेल्या ऋणानुबंधाची ही सुरुवात होती. भाऊसाहेबांनी कारेकरांच्या नावाची आग्रही शिफारस करून त्यांच्या कार्यक्रमांच्या पुणे-मुंबई-दिल्ली-गोवा आदी महत्त्वाच्या समारोहांसाठी- संगीतोत्सवासाठी- त्यांच्या मैफली आयोजित केल्या.
कारेकरांना पहिल्यांदा सवाई गंधर्व समारोहात गाण्यासाठी पं. भीमसेन जोशी यांनी संधी दिली. त्यांच्या मैफलीची वेळ रात्री अकरा-साडेअकराची. कारेकरांनी रागसमयाला अनुसरून ‘मालकंस’ या रागाची निवड केली; मात्र प्रत्यक्ष मैफल सुरू झाली तेव्हा पहाटे साडेतीन वाजायला आलेले. कारेकर हवालदिल झाले. कारेकरांच्या आधी बेगम अख्तर गायलेल्या. त्यांच्यानंतर गायन सादर करताना कारेकर बऱ्यापैकी नर्वस झाले. आणि कारेकरांना दिलेली एकूण वेळ पस्तीस मिनिटे. प्रसंगावधान राखून कारेकरांनी ‘अहिर भैरव’ या रागाची आळवणी केली. दिलेला अवधी संपला. मात्र संवादिनीवर साथ करणाऱ्या बुजुर्ग अप्पा जळगावकर आणि तबल्यावर संगत करणाऱ्या चंद्रकांत कामत यांनी कारेकरांना दहा मिनिटे तू सुखनैव गा म्हणून त्याला उत्तेजन दिले. कारेकरांनी ठेवणीतले ‘प्रिये पहा’ हे नाट्यपद आळवायला सुरुवात केली आणि हजारो कानसेनांनी आपले कान टवकारले. कारेकरांवर पुष्पवृष्टी व्हावी तशी ‘वन्स मोअर’ची बरसात सुरू झाली. कारेकरांनंतर सिंगबंधू यांची मैफल अपेक्षित होती; मात्र भीमसेनजींनी श्रोत्यांचा एकूण रागरंग ओळखून कारेकरांनंतर सिंगबंधू गाणार नसून ते दुसऱ्या दिवशी मैफल सादर करतील अशी घोषणा केल्यावर रसिकांची चुळबुळ एकदाची शमली.
या रंगलेल्या मैफलीनंतर मंडपाच्या शामियान्यातच कारेकरांना आगामी चार-पाच प्रतिष्ठेच्या मैफलींची निमंत्रणे मिळाली. एक काळ असा होता की मोठ्या मिनतवारीने कारेकरांना आपले गाणे व्हावे यासाठी मुखंडांचे- संस्थांचे- आयोजकांचे उंबरठे झिजवावे लागले होते. या दिग्विजयानंतर कारेकर आसेतुहिमालय तर गायलेच; जगभर त्यांच्या मैफलींनी रसिकांवर गारुड केले.
गोव्यात साठीनिमित्त कारेकरांचा फोंडा शहरातील राजीव गांधी कलामंदिरात भव्य सत्कार-समारोह आयोजित करण्यात आला. पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या शुभहस्ते कारेकरांना साठीनिमित्त गौरवण्यात आले. पं. पुरुषोत्तम वालावलकर या सोहळ्याला कारेकरांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. गोवा राज्याचे तत्कालीन सभापती माननीय विलास सतरकर यांच्या उपस्थितीत हा कृतज्ञता समारोह यादगार ठरला. या समारंभाने कारेकरांवर गुणगौरवपर मानपत्र लिहिण्याची- वाचण्याची देवदुर्लभ संधी मला मिळाली हे नम्रपणे नमूद करीत आहे. मडगाव शहरातही गोव्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री माननीय दिगंबर कामत यांच्या पुढाकाराने रवींद्र भवन येथे कारेकरांच्या भव्यदिव्य सत्कार समारंभातही मी खारीचा वाटा उचलला होता, याची सय मनातून काही केल्या जात नाही.
चित्रपटसृष्टीचे अभिनयसम्राट दिलीपकुमार हे कारेकरांच्या गाण्याचे प्रचंड प्रेमी- चाहते होते. मद्रासला ‘राम और श्याम’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना या नटसम्राटाने कारेकरांना आपले सनदी लेखापाल जोशी आणि तबलापटू अभ्यंकर यांच्या समवेत मुंबईहून मद्रासला येण्याचे आग्रही निमंत्रण दिले. कारेकरांच्या आयुष्यातला तो पहिलावहिला हवाईप्रवास होता. आपल्याच आलिशान हॉटेलात पाहुण्यांची सोय आणि बडदास्त ठेवण्याची व्यवस्था या संगीतप्रेमीने केली. कैक दिवस पाहुणचार आणि चित्रीकरणानंतर रात्री मैफलींचे आयोजन अशी खाशी तजवीज करण्यात आली होती. दिलीपकुमार कारेकरांच्या ‘अहिर भैरव’ या रागावर भलतेच फिदा होते. कैक वेळा या रागाची फर्माईश ते करायचे. मोजक्याच संगीतप्रेमींमध्ये सिनेतारका वहिदा रहमान आणि खलनायक प्राण यांची उपस्थिती असायची. असे मंतरलेल्या दिवसरात्रींचे धनी होते आपल्या गोव्याचे लाडके गायक पं. प्रभाकर कारेकर.
कारेकर आता आमच्यात नाहीत ही दुःखद बातमी मला माझा भाऊ रामकृष्ण याने सर्वप्रथम गुुरुवारी सकाळीच दिली. माझे निवासस्थान ते कार्यालय या प्रवासात मी नावेली-आके-पाजीफोंड- मडगाव या तीन किलोमीटर प्रवासात मला मडगावच्या न्यू इरा हायस्कूलची उतरण पार करावी लागते. काल मी या प्रवासात असताना कारेकरांच्या शाळेसमोर क्षणमात्र थबकलो- स्तब्ध झालो- मौनराग आळवायला लागलो. कारेकरनामक ‘मर्मबंधातली ठेव’ जपण्याची ती माझी केविलवाणी धडपड. तुला एकेरी संबोधण्याच्या प्रमादाबद्दल क्षमस्व.