माळीण दुर्घटना – निष्काळजीपणाचे बळी

0
362

– उदय सावंत, वाळपई
पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर महाभयंकर संकट कोसळले आहे. दुसर्‍या जागेवरून या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते व आज हे गाव अगदी संकटाच्या खाईत गेले आहे. अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र राजकीय स्तरावर परिणामकारक उपाययोजना करण्याची काळाची गरज होती. तिची परिपूर्णता झालेली नाही आणि काही स्वार्थी वृत्तीच्या घटकांमुळे हे करण्याची मानसिक वृत्ती आपल्यात नाही असे समजण्यास वाव आहे.
सध्याचे माळीण गावावर ओढवलेले संकट हे मानवनिर्मित की निसर्गनिर्मित यावरील चर्चांना ऊत आला आहे. पर्यावरणीय स्तरावर हा प्रकार मानवनिर्मित तर विकासाचा बाऊ करून स्वतःची, स्वतःच्या समर्थकांची तुंबडी भरण्यासाठी निसर्ग समतोलाचा कोणताही मागील पुढील विचार न करता ‘मनी आणि मसल’चा वापर करणार्‍यांना हा प्रकार निसर्गनिर्मित असल्याची स्वप्ने पडलेली आहेत. अनेक बाजूंनी अनेकांकडून निसर्गाचा व आपला कोणताही संबंध नाही, आपल्याशी त्याचे कोणतेही देणे-घेणे नाही अशा स्वरूपाची वक्तव्ये कानावर पडतात तेव्हा त्यांच्या बुद्धिकौशल्याची कीव करावीशी वाटते. निसर्गाने आपणास सुंदर पद्धतीने जगण्याचे सामर्थ्य निर्माण करून दिल्याची कोणतीही भावना त्यांना नसणे ही बाब दुर्दैवी स्वरूपाचीच आहे.
विकासाचा प्रवाह साधताना आधुनिकीकरणाच्या नावाखाली आज आगळीक होणार नाही याचे भान ठेवल्यास अनेक अनाकलनीय गोष्टींवर आपल्याला नियंत्रण राखता येईल. मात्र दुर्दैवाने याबाबत आज कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही. माळीण गावावर अशाच स्वरूपाचे संकट मागे कोसळले होते. माळीण गावाच्या घाटमाथ्यावर एका कंपनीने आपले बेकायदेशीर बस्तान बसविण्यासाठी निसर्गावर केलेली कुरघोडी आणि याचा परिणाम मात्र दुर्दैवाने ते गाव उद्ध्वस्त होण्यात झाला. एका कंपनीच्या विस्तारासाठी डोंगरकापणी आणि मोठ-मोठ्या महाकाय यंत्रांचा वापर करण्यात आल्याने भूगर्भातील रचनेवर त्याचा परिणाम झाला. तेथील स्थानिक आमदारांनी अशा निसर्गकोपी कारवायांना आवर घालण्याची मागणी अनेकवार राज्य शासनाला केली होती. मात्र धन व दमदाटी यांच्या रंगात न्हाऊन गेलेल्या व डोळ्यावर राजकीय अलंकाराची आभूषणे चढविलेल्या राजकारण्यांना त्याचे गांभीर्य दिसले नाही. आज याचा परिणाम आपणास काय झाला तो दिसला!
हा निसर्गकोपी प्रकार घडण्यापूर्वी निसर्गाने सदर माळीणवासियांना सावधानतेचा इशारा दिला होता. दोन दिवसांपासून घरातील जमिनींत ओलावा जाणवत होता. कदाचित घाटमाथ्यावर झालेला प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा यामुळे ही पाण्याची पाझरण झाली असावी, असा अंदाज आहे. तसेच काही पर्यावरणवाद्यांच्या माहितीनुसार काही दिवसांपासून या भागातील घाटमाथ्यावरील उतरणीवर असलेली झाडे काही प्रमाणात जागेवरून हलली होती व अनेक ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या होत्या. याची स्पष्ट माहिती शासनाला देण्यात आली होती. मात्र यासंबंधी गावातील रहिवाशांना इतर ठिकाणी हालविण्याची साधी तसदी राज्य शासनातर्फे घेण्यात आली नाही. यावरून सदर प्रकार हा राज्यशासनाचा निष्काळजीपणा समजण्याला वाव आहे.
माळीण गाव हा सह्याद्रीच्या व पश्‍चिम घाट पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. सदर स्वरूपाची घोषणा करताना व तद्नन्तर या पर्यावरणीय भागाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी सोडाच, पण या भागावर महाराष्ट्र व गोवा राज्यातही मोठ्या प्रमाणात आघात, अत्याचार होताना दिसत आहेत. मात्र शासन दरबारी कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. पर्यावरणाच्या माध्यमातून संवेदनशील असलेल्या भागावर विकासाच्या नावाखाली पर्यटनस्थळे विकसित करताना कोणत्याही स्वरूपाचे तारतम्य न बाळगता होणार्‍या आततायीपणाचा परिणाम म्हणजेच माळीण गावाचे उदाहरण देता येईल. गोवा व महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग परिसरात लाखो चौ.मी. जमिनी भूखंड करण्यासाठी बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्या आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या खटपटीत हा व्यवसाय सर्वांत चांगला असल्याचा विचार प्रत्येकाच्या मनात भरत असल्याने मोठ्या प्रमाणात लोक यासाठी उत्सुक असलेले दिसतात. यामुळेच निसर्गाची अपरिमित हानी होताना दिसत आहे. कोणत्याही दूरगामी स्वरूपाचा विचार न झाल्यास माळीण गावासारखे झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
गोव्याची परिस्थिती याहून वेगळी नाही. आजही मोठ्या प्रमाणात माणसांची निसर्गावर कुरघोडी करण्याची स्पर्धा आपल्याला दुष्परिणामांच्या अध्यायाकडे घेऊन जाणारी आहे. गोव्याच्या सडा-वास्को-पेडणे येथील वायडोंगरावर होणार्‍या मानवनिर्मित कारवाया यांचा सारासार अभ्यास केल्यास माळीणप्रमाणे गंभीर स्वरूपाचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. यासंबंधी सरकारला धोक्याची जाणीव असताना सरकार कोणतीही उपाययोजना करीत नाही आणि करण्याचा प्रयत्नही करीत नाही. प्रत्येक वर्षी या डोंगराकडील काही भाग कोसळल्याच्या घटना घडताना दिसतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोंगरावर विकासाच्या नावाखाली वाढलेला बिल्डरांचा संचार, वापरात येणारी महाकाय यंत्रे यामुळे या डोंगराला असलेली धोक्याची तीव्रता वाढत आहे.
सत्तरीतील कुडसे, धारखण, सालेली, पिसुर्ले, झर्मे गावावरही आज मोठ्या प्रमाणात संकटाची छाया निर्माण झाली आहे, हे नाकारता येणार नाही. कारण या सर्व गावांवरही मानवनिर्मित संकटे वाढून ठेवलेली आहेत. कुडसे या सावर्डे-सत्तरी ग्रामक्षेत्रातील गावाची समृद्ध जंगलसंपत्तीमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र जवळपास १५ वर्षांपूर्वी हजारो हेक्टर जमिनीतील वनखात्याने वनक्षेत्राचा र्‍हास करून त्याजागी काजू कलमांची लागवड केली. हा प्रकार निसर्गासाठी तेवढा पोषक नाही, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. जंगली स्वरूपाची झाडे, ज्याप्रमाणे मातीची धूप रोखून धरतात त्याप्रमाणे काजूची झाडे परिणामकारक नाहीत. म्हणून समांतर जमिनीत काजू झाडांची लागवड ठीक आहे. डोंगराळ भागात नाही. आज सत्तरीत मोठ्या प्रमाणात डोंगराळ भागातही काजू झाडांची लागवड झालेली आहे. यात बर्‍याच प्रमाणात जंगली झाडे आसपास असल्याने तेवढासा धोका नाही. पण तिथेही काजूची लागवड झाल्यास धोक्याची संभावना नाकारता येण्यासारखी नाही. कुडसे डोंगरावर सरकारनेच जंगली झाडांच्या जागेवर काजू झाडांना स्थान दिले आहे. यामुळे भविष्यात यांचा परिणाम होऊ शकतो. सालेली गावाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. या ठिकाणी खडी क्रशर मालकांनी डोंगरावर घातलेले थैमान याचा जबरदस्त परिणाम सालेली गावावर होण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने गावातील नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे गावाची सुरक्षितता बळावली आहे. तरीसुद्धा दगड फोडण्यासाठी वापरण्यात आलेला सुरुंग स्फोट यामुळे या डोंगरावर मातीपासून अलग झालेले दगड कोणत्याही क्षणी खाली येण्याची शक्यता आहे. पिसुर्ले गावासंबंधी काही बोलण्याचीच गरज नाही. धन, दौलत यांच्या पांढर्‍या वातावरणात राहण्यासाठी काही राजकीय वलयातील इसमांनी पिसुर्ले गावाचा बळी दिला असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. खाणीच्या वलयासाठी नैसर्गिक संपत्तीचा बळी देऊन उजाड बनलेल्या भागावर खाणव्यावसायिकांनी केलेली काजूची लागवड पिसुर्ले गावाचे धोक्याचे संकट आपल्या खांद्यावर पेलू शकेल काय?