>> मत्स्योद्योग खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती
मालीम येथे मच्छिमारांसाठी अद्ययावत सुविधा असलेल्या तरंगत्या जेटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. मत्स्यसंपदा योजनेंतर्गत राज्याने केंद्राला सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) सादर केलेला आहे. केंद्राने मान्यता दिल्यानंतर काम सुरू होणार असल्याची माहिती मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.
मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांसह मालीम जेटीची काल पाहणी केली. मालीम जेटीच्या विस्ताराचे काम जीएसआयडीसीतर्फे सुरू आहे. सदर काम संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडलेले आहे. हे काम पूर्ण करण्याबाबत जीएसआयडीसीला कळविले जाईल. पाणी, प्रसाधनगृहांसह अन्य सुविधा निर्माण करण्यासह जेटीच्या विस्ताराचे काम सुरू आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.
सध्याच्या जेटीचा विस्तार करण्याव्यतिरिक्त जवळच स्वतंत्र तरंगती जेटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतचा प्रकल्प आराखडा केंद्राला पाठविण्यात आला आहे. मत्स्यसंपदा योजनेंतर्गत तरंगती जेटी बांधली जाईल. स्थानिक मच्छिमारांना अधिकाधिक सुविधा देण्याचाच उद्देश या मागे आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले. कुटबण जेटीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मालीम जेटीवरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. स्वच्छता राखण्यासाठी प्रसाधनगृहे तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही हळर्णकर यांनी स्पष्ट केले.