मालीची तुर्कीवर मात

0
90

दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या माली संघाने काल सोमवारी झालेल्या फिफा अंडर -१७ विश्‍वचषक स्पर्धेतील सामन्यात तुर्कीचा ३-० असा पराभव केला. दोनवेळा आफ्रिकन अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेल्या मालीने गोल नोंदविण्याचे २९ प्रयत्न केले. माली संघातील खेळाडूंच्या वेगवान खेळाला उत्तर देण्यात तुर्कीचा संघ खूप कमी पडला. पहिल्या सामन्यातील निसटत्या पराभवानंतर मालीने ‘ब’ गटातील आपल्या दुसर्‍या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. तुर्कीचा गोलरक्षक बर्केओझेर याने मालीच्या आघाडीपटूंचे प्रयत्न निष्फळ ठरविले नसते तर तुर्कीला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला असता. सामन्याच्या पहिल्या तीस मिनिटांत आघाडीपटू लसान एनदाये दोनवेळा गोल नोंदविण्याची उंबरठ्यावर होता. परंतु, ‘फिनिशिंग ट्‌च’ देण्यात तो थोडासा कमी पडला. ३८व्या मिनिटाला हादजी द्रामे याच्या पासवर जेमोसा त्राओरे याने गोलरक्षकाला चकवून मालीचा पहिला गोल झळकावला. ६८व्या मिनिटाला अब्दुल्ला डायबे याने लगावलेला फटका गोलपोस्टला लागून परतल्यानंतर एनदाये याने चेंडूवर ताबा मिळवून संघाचा दुसरा गोल झळकावला. सामना संपण्यास काही मिनिटे असताना फोडे कानोटे याने जोरदार किकद्वारे मालीचा तिसरा गोल करून सामना तुर्कीच्या अवाक्याबाहेर नेला. तुर्कीचा पुढील सामना अव्वल स्थानावरील पॅराग्वेशी तर मालीचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.