
>> भारत-द. आफ्रिका शेवटचा टी-२० सामना
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा व अखेरचा टी-२० सामना आज खेळविला जाणार आहे. उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला असल्याने आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेचा विजेता ठरणार आहे.
पहिल्या सामन्यात २८ धावांनी विजय साकारल्यानंतर भारतीय संघाला दुसर्या सामन्यात सपाटून मार खावा लागला होता. विशेष म्हणजे भारताचे प्रमुख अस्त्र असलेली युजवेंद्र चहल या नावाचे अस्त्र या सामन्यात निकामी ठरले होते. एकदिवसीय मालिका गाजवल्यानंतर चहल टी-२०तही चालेल अशी अपेक्षा होती. परंतु, पहिल्या दोन्ही सामन्यात मिळून केवळ एक बळी त्याला घेता आला आहे. आजच्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर तुटून पडणार आहेत. त्यामुळे भारताला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. चहलला वगळून कुलदीपला खेळविण्याचा पर्यायही कोहलीकडे आहे. लुंगी एन्गिडी, हेन्रिक क्लासेन, ज्युनियर डाला या नवख्या खेळाडूंनी भारताविरुद्ध प्रभावी कामगिरी करत अनुभवापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे आत्तापर्यंत दाखवून दिले आहे. अनुभवी खेळाडू सातत्य दाखवण्यात कमी पडत असताना या त्रिकुटाने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. टी-२०मध्ये एन्गिडी नसला तरी क्लासेन व डाला यांनी भारताची डोकेदुखी वाढवली आहे. भारताकडून शार्दुल ठाकूरने आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने दुसर्या टी-२० सामन्यात छाप सोडली होती. त्यामुळे शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या समावेशासाठी कोहलीला कसरत करावी लागणार आहे.
भुवनेश्वर कुमारने नेहमीप्रमाणे धावा आटवून द. आफ्रिकेवर दबाव टाकण्याचे काम चोख केले होते. परंतु, चहलच्या गोलंदाजीची धुलाई होत असताना सुरेश रैनाला एखादे षटक देऊन पाहिले असते, तरी चालले असते. परंतु, चहलवरील अतिआत्मविश्वास भारताला दुसर्या सामन्यात नडला. कर्णधार कोहलीला पहिल्या दोन्ही सामन्यात अपेक्षित सूर गवसलेला नाही. रोहितच्या असातत्यपूर्ण कामगिरीचा हात धरणारा दुसरा तरी फलंदाज संघात नाही त्यामुळे शिखर धवनवर दबाव वाढला आहे. उभय संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा असून दौर्याचा शेवट विजयाने करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला अजून केवळ १७ धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी त्याच्याकडे आहे.
भारत (संभाव्य) ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर व युजवेंद्र चहल, द. आफ्रिका (संभाव्य) जेजे स्मट्स, रिझा हेंड्रिक्स, जेपी ड्युमिनी, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, फरहान बेहार्दिन, आंदिले फेलुकवायो, ज्युनियर डाला, तबरेझ शम्सी व ऍरन फंगिसो.