मालमत्ता बक्षीसपत्रासाठी नोंदणी शुल्कामध्ये दुरुस्ती

0
16

राज्य सरकारच्या कायदा खात्याने मालमत्तेच्या बक्षीसपत्र आणि विभाजनपत्रासाठी किमान नोंदणी शुल्कात दुरुस्ती केली असून, या किमान नोंदणी शुल्क सुविधेचा लाभ आता कुटुंबातील आणखी पाच नातेवाईकांना मिळणार आहे. यापूर्वी वडील, आई, मुलगा आणि मुलगी यांना किमान शुल्काचा लाभ मिळत होता. या सवलतीमध्ये जावई, सुना, नातवंडे, पुतणे, पुतणी आणि भावोजी यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या कायदा विभागाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. मालमत्तेच्या विभागणी, बक्षीस पत्रासाठी आकारल्या जाणाऱ्या सवलत शुल्काचा लाभ ठराविक नातेवाईकांनाच मिळत होता. वडील, आई, मुलगा आणि मुलगी यांच्या नावावर कितीही मोठ्या किमतीच्या मालमत्तेचे बक्षीसपत्र दिले, तरी त्याला कमाल 5 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागत होते. कुटुंबातील इतर नातेवाईकांना या सवलतीचा लाभ मिळत नव्हता. इतरांना हेच शुल्क मालमत्तेच्या किमतीच्या 3 टक्के इतके भरावे लागत होते. आता, राज्य सरकारने या सवलत शुल्कात जावई, सुना, नातवंडे, पुतणे, पुतणी आणि भावोजी यांचा समावेश केला आहे. त्यामुळे त्यांना 5 हजार रुपये इतकेच नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.