मालदीवला तडाखा

0
24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीमुळे आणि तेथील निसर्गसौंदर्याच्या त्यांनी मुक्तकंठाने केलेल्या प्रशंसेमुळे आपल्या पर्यटनाधारित अर्थव्यवस्थेला आव्हान निर्माण झाल्याची भावना झालेल्या मालदीवमधील युवा सशक्तीकरण मंत्री मरियम शियुना यांनी मोदींविरुद्ध असभ्य भाषेत टिप्पणी काय केली, आजच्या भारताची ताकद काय आहे ह्याची चुणूक अल्पावधीतच तिला आणि तिच्या दोन सहकारी मंत्र्यांना मिळाली. मालदीवच्या मंत्र्याच्या ह्या मोदी व भारतविरोधी टिप्पणीनंतर मालदीवला पर्यटनासाठी जाणाऱ्या हजारो लोकांनी आपले हॉटेल आणि विमानांचे आरक्षण रद्द करायला धडाधड सुरूवात केली आहे. त्यामुळे आपल्या पर्यटनाधारित अर्थव्यवस्थेला बसणारा जबर दणका लक्षात घेऊन तेथील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष महंमद मुईझ्झू यांना सदर मरियमसह तीन मंत्र्यांना डच्चू द्यावा लागला. वास्तविक हे नवे राष्ट्राध्यक्ष भारतविरोधी प्रचाराच्या बळावरच गेल्या सप्टेंबरमध्ये तेथे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. मालदीवला भारतापासून दूर करून चीनशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. असे असतानाही त्यांना आपल्या मंत्र्याच्या भारतविरोधी टिप्पणीमुळे तीन मंत्र्यांना डच्चू लावावा लागणे ह्यात भारताच्या एकशे तीस करोड जनतेची ताकद काय असू शकते हे दिसून येते. केवळ मोदींवर असभ्य टीका केली म्हणून ह्या मंत्र्यांना डच्चू मिळालेला नाही. ह्या टीकेचे परिणाम गंभीर होतील ह्याची जाणीव झाल्यानेच त्यांना मंत्रिपदे सोडायला लावणे नूतन राष्ट्राध्यक्षांना ते भारतविरोधी असूनही भाग पडले आहे. हे मुईझ्झू राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासूनच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांचे पूर्वसुरी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम महंमद सोलिह हे भारत समर्थक गणले जायचे. इंडिया फर्स्ट ही त्यांची घोषणा होती. मात्र इंडिया आउटची घोषणा करीत हे मुईझ्झू त्यांच्याविरोधात निवडणुकीत उतरले आणि पन्नास टक्क्यांवर जनसमर्थनानिशी ते राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. वास्तविक मालदीवच्या आजवरच्या राष्ट्राध्यक्षांची पहिली विदेश भेट भारतात असे. माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम, त्यांचे पूर्वसुरी गयूम, महंमद नाशिद वगैरेही अनेकदा भारतभेटीवर येऊन गेले आणि राष्ट्रकुल, सार्क, नाम, संयुक्त राष्ट्रसंघ अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मालदीवने आजवर भारताची साथ दिली. मात्र, हे नवे राष्ट्राध्यक्ष निवडून आल्यावर भारतविरोधक गणल्या जाणाऱ्या तुर्कियेला म्हणजे तुर्कस्थानाला गेले. आता सध्या ते चीनभेटीवर रवाना झाले आहेत. चीनशी आणि अरब जगताशी जवळीक साधून भारताला दूर करण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसतो. मालदीवमध्ये आपला लष्करी तळ आहे, कारण आपल्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठाणे आहे. मात्र, भारताने आपले हे सैन्यदल हटवावे ही मुईझ्झू यांची मागणी राहिली आहे. खरे म्हणजे आजपर्यंत मालदीव आणि भारताचे संबंध अतिशय मैत्रिपूर्ण राहिले होते. 1965 साली मालदीवला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या देशाला मान्यता देणारा पहिला देश भारत होता आणि मालदीवने जेव्हा जगातील चार देशांत आपले दूतावास उघडले, तेव्हा त्यातील एक देशही भारत होता. मालदीवमध्ये त्सुनामी आली तेव्हा मदतसामुग्री घेऊन काही तासांत आपली विमाने तेथे उतरली होती. मालदीवच्या पर्यटनाधारित अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वाटा भारतीयांचाच राहिलेला आहे. रशियन आणि चिनी पर्यटकांचा क्रमांक त्याखाली लागतो. प्रस्तुत मंत्र्याच्या वादग्रस्त टिप्पणीतून नाराज झालेल्या भारतीयांनी मालदीवकडे पाठ फिरवली तर काय होईल, आपल्या अर्थव्यवस्थेचे किती मोठे नुकसान होईल याची जाणीव नूतन राष्ट्राध्यक्षांना आहे. त्यामुळेच त्यांनी आता ह्यावर सारवासारव चालवलेली दिसते. मात्र, मोदींची नुकतीच झालेली लक्षद्वीप भेट, तेथील शांत रमणीय निसर्गसौंदर्याची वायरल झालेली छायाचित्रे यामुळे भारतीयांमध्ये लक्षद्वीपला जाण्याची ओढ लागली आहे. त्याचा फटका सरळसरळ मालदीवला बसेल हे उघड आहे. मरियमची टिप्पणी त्यासंदर्भातच होती. पंतप्रधान मोदींविरुद्ध त्यात अशिष्ट शब्द वापरले गेले. त्यांना इस्रायलच्या हातचे बाहुले संबोधले गेले. नेटकऱ्यांमध्ये त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नापसंती व्यक्त केली. सचिन तेंडुलकरने आपण आपला पन्नासावा वाढदिवस सिंधुदुर्गात कसा साजरा केला होता आणि तेथील आतिथ्य आपल्यासाठी जन्मभराची आठवण कसे होऊन राहिले आहे ही आठवण सांगितली. मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे तेथील पर्यटनाला बहर येईल हे तर झालेच, परंतु मालदीवच्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारतीय नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली तर नुकसान त्या देशाचेच आहे. आधीच गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपासून भारतविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेले राष्ट्राध्यक्ष, त्यात त्यांच्या मंत्र्यांनी निर्माण केलेला हा वाद, तुर्कस्थान आणि चीनसारख्या भारतविरोधी देशांशी तो देश साधू पाहात असलेली जवळीक यामुळे भारतीय नाराज आहेत आणि त्याची किंमत त्या देशाला चुकवावीच लागेल!