कोकण रेल्वेच्या वीर आणि करंजाडी या स्थानकां दरम्यान काल सकाळी मालगाडीचे सात डबे घसरल्याने या मार्गावरील रेलसेवा ठप्प झाली. परिणामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्या प्रवाशांचे बरेच हाल झाले. यामुळे बर्याच गाड्या रद्द करण्यात आल्या. काल सकाळी ७ वा. वरील दुर्घटना घडली. मात्र त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. घसरलेले डबे हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. या अपघातामुळे डबल डेकर एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पनवेल येथे अडकून पडल्या. मंगला एक्स्प्रेस रत्नागिरी येथे, कोईमतूर-बिकानेर एक्स्प्रेस कणकवलीत, केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस आडवलीत व नेत्रावती-एर्नाकुलम एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकावर थांबवण्यात आली होती.
दरम्यान, कोकण रेल्वे सेवा पुर्ववत होण्यासाठी आणखी किमान सात तास लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी शक्यतो लवकर रेलसेवा पुर्ववत होण्याची सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच स्थानकांवर प्रचंड संख्येने प्रवासी अडकून पडले आहेत. गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचे पैसे परत केल्यानंतर पुढील प्रवास तुमच्या सोईने करा असे सांगण्यात आल्याने प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडली. मात्र खेड रेल्वे स्थानकाजवळून एसटीने पर्यायी सोय केली होती. ३० खास बसगड्या तेथे दाखल झाल्या होत्या. करंजाडी पुलाजवळ ज्या ठिकाणी मालगाडी घसरली तेथे मोठ्या प्रमाणात भराव होता. त्या भरावात मालगाडीचे डबे रुतले आहेत. त्यामुळे भराव हटविल्यानंतरच डबे मोकळे होणार आहेत. या कामाला दीड दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.