>> 86 टक्के मतांसह लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून निवड; भारत-कॅनडा संबंध सुधारणार?
कॅनडाला लवकरच नवीन पंतप्रधान मिळणार आहेत. लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून मार्क कार्नी यांची निवड करण्यात आली आहे. लिबरल पक्षाच्या निवडणुकीत 59 वर्षीय मार्क कार्नी यांनी विजय मिळवला. कार्नी हे पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रुडो यांची जागा घेणार आहेत. कार्नी हे अनेक वर्षे बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही रविवारी लिबरल पक्षच्या निवडणुकीत जवळपास 1 लाख 52 हजार सदस्यांनी मतदान केले. यापैकी 86 टक्के मते ही कार्नी यांनी मिळाली. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड या राहिल्या. पंतप्रधान पदावर कार्नी यांची निवड झाल्यानंतर कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे 9 वर्षांचे शासन संपुष्टात येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेबरोबर सध्या सुरू असलेल्या ‘टॅरिफ वॉर’ दरम्यान कॅनडाला नवीन पंतप्रधान मिळणार आहेत. याशिवाय कॅनडाचे भारताबरोबरचे संबंध देखील गेल्या काही दिवसांपासून तणावाचे राहिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पद स्वीकारल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाचे पंतप्रधान पद सोडण्याची घोषणा केली होती.
59 वर्षीय मार्क कार्नी यांचा जन्म 16 मार्च 1965 रोजी नॉर्थवेस्ट टेरिटरीजच्या फोर्ट स्मिथ येथे झाला. त्यांचे संगोपन एटमॉन्टन, अल्बर्टा येथे झाले. कार्नी यांनी 2008 ते 2013 पर्यंत बँक ऑफ कॅनडा आणि 2013 ते 2020 पर्यंत बँक ऑफ इंग्लंडचे संचालक म्हणून काम केले. 2008 च्या आर्थिक संकटाच्या काळात कॅनडाला सावरण्याचे काम केल्यानंतर, 1694 साली स्थापन झालेल्या बँक ऑफ इंग्लंडचे संचालक म्हणून नियुक्ती मिळालेले ते पहिले बिगर ब्रिटीश व्यक्ती होते.