गेल्या 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 30 मे रोजी म्हापसा येथील हाऊसिंग बोर्ड येथे काही तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अहमद देवडी याचे काल गोमेकॉत उपचारादरम्यान निधन झाले.
एका किरकोळ वादानंतर अहमद देवडी व त्याचा मित्र संदेश साळकर यांच्यावर हा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी यावेळी लोखंडी सळ्यांनी त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केलेली आहे; मात्र या हल्ल्यातील दोन प्रमुख आरोपी हे अद्याप फरार आहेत. या दोन प्रमुख संशयित हल्लेखोरांना जोपर्यंत पोलीस अटक करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही अहमद देवडी याचे गोमेकॉत असलेले शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्याच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
या हल्ल्यातील त्या दोन प्रमुख संशयितांना पोलिसांनी अटक केल्यानंतरच आम्ही शव ताब्यात घेणार असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. या हल्ल्यातील प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने आमच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे अहमद याची आई-वडील, पत्नी व बहिणीने म्हटले
आहे.