मायकल लोबो आज कॉंग्रेसमध्ये

0
17

>> साळगावात कॉंग्रेस नेत्याच्या प्रचारात सहभागी

भाजपचे कळंगुटचे आमदार, ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो पत्नी डिलायला लोबो यांच्यासमवेत कॉंग्रेस पक्षात आज सोमवारी प्रवेश करण्याची शक्यता आहे. रविवारी मंत्री लोबो यांनी साळगाव मतदारसंघातील कॉंग्रेसचे नेते केदार नाईक यांच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेऊन कॉंग्रेस प्रवेशाचा संकेत दिला. पत्रकारांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या प्रश्‍नाला सोमवारी उत्तर मिळेल, असे मोघम उत्तर मंत्री लोबो यांनी दिले.

भाजपचे आमदार, मंत्री मायकल लोबो कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत, अशी कबुली विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍यांचे स्वागत केले जाईल, असेही कामत यांनी सांगितले.
राजकीय पक्षामध्ये दुसर्‍या राजकीय पक्षातील नेत्यांना प्रवेश देऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मंत्री लोबो यांनी सांगितले. मंत्री लोबो यांना भाजप संघटनेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज बनलेले आहे. शिवोली मतदारसंघातील भाजपची उमेदवारी पत्नी डिलायला यांना मिळवून देण्यासाठी मंत्री लोबो प्रयत्न करीत आहेत.

तथापि, भाजप संघटनेकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. मंत्री लोबो हे डिलायला यांच्या शिवोली मतदारसंघातील निवडणूक प्रचारात सहभाग घेत आहेत. मंत्री लोबो यांचे निकटवर्तीय गजानन तिळवे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, साळगाव मतदारसंघातील कॉंग्रेसचे गटाध्यक्ष अतुल नाईक यांनी मंत्री लोबो यांनी कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्याने गट अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.