मायकल, दिगंबरचे भाजपशी संधान

0
14

>> दिनेश गुंडूराव यांचा थेट आरोप; लोबोंचे गटनेतेपद काढले

आषाढी एकादशी आणि बकरी ईद साजरी करण्यात गोमंतकीय दंग असताना, तीन वर्षांपूर्वी याच दिवशी १० जुलै २०१९ रोजी कॉंग्रेसमधून घडलेल्या घाऊक पक्षांतराच्या आठवणी ताज्या करीत काल राज्यात घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींत कॉंग्रेसच्या काही आमदारांनी रात्री थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठल्याने खळबळ माजली. विरोधी पक्षनेते व कळंगुटचे कॉंग्रेस आमदार मायकल लोबो यांनी कॉंग्रेस पक्ष प्रभारी दिनेश गुंडूराव यांना गुंगारा देत आल्तिनोवर जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. कुंभारजुवेचे कॉंग्रेस आमदार राजेश फळदेसाई, साळगावचे कॉंग्रेस आमदार केदार नाईक यांनीही आपल्या पक्षाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित न राहता लोबोंपाठोपाठ मुख्यमंत्र्यांचा बंगला गाठला.

या प्रकाराने उद्विग्न झालेले कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत आणि पक्षाचे विधिमंडळ गटनेते मायकल लोबो हे दोघेही भारतीय जनता पक्षाशी संधान बांधून असल्याचा थेट आरोप करीत लोबो यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करीत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासमवेत संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, कार्लुस परेरा व रुडॉल्फ फर्नांडिस हे कॉंग्रेसचे पाच आमदार उपस्थित होते. आणखी एक आमदारही पक्षासमवेत असून सहा जण अद्याप कॉंग्रेस पक्षात आहेत. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या इराद्याने जे मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले आहेत त्यांच्यापाशी दोन तृतीयांश बहुमत नसल्याने त्यांच्यावर पक्ष अपात्रतेची कायदेशीर कारवाई करील असा इशारा त्यांनी दिला.

कोणी पक्षांतर करीत असेल तर आमदारकी वाचवण्यासाठी दोन तृतीयांश आमदारांची आवश्यकता असल्याने आणि आपल्या पत्रकार परिषदेस कॉंग्रेसचे पाच आमदार उपस्थित असल्याने जे तसा विचार करीत आहेत त्यांनी माघारी यावे असे आवाहन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी यावेळी केले.

गुंडूराव यांची पत्रकार परिषद होईस्तोवर पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचले नव्हते, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. पक्षाच्या बैठकीस व पत्रकार परिषदेस ते अनुपस्थित राहिल्याने कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी पत्रकार परिषदेत मायकल लोबों बरोबरच दिगंबर कामत यांच्यावरही टीकेची झोड उठवली.

घाऊक पक्षांतराचे प्रयत्न
आजपासून राज्य विधानसभेचे दहा दिवशीय पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर गोव्यात विरोधी पक्ष कॉंग्रेसला दणका देण्याच्या दिशेने राजकीय हालचालींना गेले काही दिवस वेग आला होता. भाजपचे केंद्रीय नेते सी. टी. रवी यांनी जुलै महिन्यात कॉंग्रेसचे काही आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच दोन महिन्यांपूर्वीच केले होते. त्यामुळे काल कॉंग्रेसच्या आमदारांमधील बेबनाव उघड होताच काही आमदारांची घाऊक पक्षांतराच्या दिशेने पावले पडत असल्याचे दिसून आले.
कॉंग्रेस आमदारांच्या पक्षांतराच्या हालचालींची चर्चा गेले काही दिवस गोव्यात होती. त्याची कुणकूण लागताच अ. भा. कॉंग्रेस महासमितीचे सरचिटणीस व पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव तातडीने गोव्यात दाखल झाले होते व त्यांनी कॉंग्रेस आमदारांसमवेत शनिवारी विधिमंडळ गटाची बैठक घेतली होती. त्या बैठकीस पक्षाचे दहा आमदार उपस्थित होते. ‘भाजपाच्या आमिषाला बळी पडू नका व एकसंध राहा’ असे आवाहन गुंडूराव यांनी पक्षाच्या आमदारांना त्यावेळी केले होते. एकाही आमदाराने तेव्हा पक्षत्यागाचा संकेत न दिल्याने श्री. गुंडूराव तसेच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नसल्याचा दावा छातीठोकपणे शनिवारी केला होता.

आमदारांशी वैयक्तिक गाठीभेटी
काल रविवारीही गुंडूराव यांनी कॉंग्रेस आमदारांना रोखण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मडगावच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी पक्षाच्या एकेका आमदाराशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, मडगावात असूनही पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत सदर बैठकीस अनुपस्थित होते. पक्षाच्या अकरा आमदारांपैकी मायकल लोबो यांच्यासह सात आमदार यावेळी गुंडूराव यांच्या भेटीस गेले. पक्षाचे चार आमदार अनुपस्थित होते.

गुंडूराव यांची भेट घेणार्‍यांत मायकल लोबो यांचाही समावेश होता. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आम्ही कॉंग्रेस आमदार एकत्र असून सोमवारपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरवण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता.
दिगंबर कामत यांच्यासह चार आमदार या बैठकीस हजर नव्हते. मात्र, दिगंबर कामत यांना त्यासंबंधी विचारले असता, दिनेश गुंडूराव यांच्याशी आपले आधीच बोलणे झालेले आहे. ते आपल्याला भेटायला आपल्या घरी आले होते व आज बेंगळुरूला परत जाणार होते. त्यामुळे मडगावात पुन्हा काही बैठक आयोजित केली असल्याची आपल्याला कल्पना नाही असा दावा त्यांनी केला.

कॉंग्रेसचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ‘‘सगळे आमदार इथे उपस्थित आहेत. उद्यापासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. त्यात आपलाही तारांकित प्रश्न असून उद्या सरकारविरोधात भूमिका कशी घ्यायची याची चर्चा या बैठकीत झाल्या’’चे पत्रकारांस सांगितले. पक्षाचे कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाई आणि साळगावचे आमदार केदार नाईक यांच्यासमवेत त्यांनी आम्ही कॉंग्रेसमध्येच आहोत असे ठासून सांगितले. राजेश फळदेसाई व केदार नाईक यांनी स्वतःही पक्षांतराच्या वृत्ताचा इन्कार केला. मात्र, संध्याकाळी ते दोघेही मायकल लोबो यांच्या पाठोपाठ थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बंगल्यावर जाऊन धडकल्याचे दिसून आले.
नुवेचे कॉंग्रेस आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मडगावात गुंडूराव यांना भेटल्यानंतर पत्रकारांनी पक्षांतराबाबत विचारले असता ‘राजकारणात काहीही शक्य आहे’ असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले. काही आमदार पक्ष सोडणार का या प्रश्नावर सरळ उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
देवाला कसे फसवाल? – गिरीश
कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेसच्या आमदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पणजीत महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि बांबोळीच्या क्रॉसपुढे पक्षांतर न करण्याच्या शपथा घेतल्या होत्या याचे स्मरण करून दिले. आमदार पक्षाला, जनतेला फसवू शकतात, परंतु ते देवाला फसवू शकत नाहीत असे श्री. चोडणकर म्हणाले.

कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेस
फक्त ५ आमदारांची उपस्थिती

कॉंग्रेस पक्ष एकसंध असल्याचे दर्शविण्यासाठी दिनेश गुंडूराव यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला पक्षाचे ११ पैकी केवळ ५ आमदार उपस्थित राहिले. दुसरीकडे पक्षाचे विधिमंडळ गटनेते मायकल लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक व कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यासमवेत आल्तिनोवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाराज झालेल्या गुंडूराव यांनी पक्षाचे विधिमंडळ गटनेते मायकल लोबो व ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी भाजपशी संधान बांधल्याचा थेट आरोप करीत त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी पक्षांतर न करण्याच्या शपथा देवदेवतांपुढे घेतल्या, पक्षाला तशी प्रतिज्ञापत्रेही भरून दिली, ते पाठीमागून भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून वावरत आहेत. केवळ स्वतःची कातडी बचावण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या दोघा प्रमुख नेत्यांनी भाजपसमवेत कॉंग्रेस पक्ष फोडण्याचे कटकारस्थान रचले आहे. जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी पाच आमदारांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पक्षविरोधी कारवाया करीत असल्यामुळे लोबो यांचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेण्यात आले असल्याची घोषणाही गुंडूराव यांनी केली. यावेळी पक्षाचे पाच आमदार आपल्यासमवेत पत्रकार परिषदेस उपस्थित आहेत, त्यामुळे दोन तृतीयांशचे बहुमत फुटिरांपाशी नसल्याने ते पक्षांतरबंदी कायद्यानुसार आपसूक अपात्र ठरतील, त्यासाठी कॉंग्रेस पक्ष सर्वतोपरी कायदेशीर पाठपुरावा करील असेही गुंडूराव यांनी सांगितले.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, हळदोण्याचे आमदार कार्लोस परेरा हे या पत्रकार परिषदेस श्री. गुंडूराव तसेच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासमवेत उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष देशातील विरोधी पक्षांना संपविण्यामागे लागला असून अशी स्वार्थी पक्षांतरे रोखण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या काय करता येईल त्यावर आपला पक्ष विचार करील असे गुंडूराव यांनी सांगितले. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून मायकल लोबो आणि दिगंबर कामत, तसेच त्यांना साथ देणार्‍या आमदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. भाजपची साथ देणार्‍या आमदारांनी जनतेचा विश्वासघात चालवला आहे. गेल्यावेळीही पक्षाच्या काही आमदारांनी असाच विश्वासघात केला, त्यांना त्यानंतरच्या निवडणुकीत मतदारांनी घरी बसवले याची आठवण गुंडूराव यांनी करून दिली. गोव्यातील घटनाक्रमाची माहिती आपण पक्षश्रेष्ठींना दिल्याचे गुंडूराव यांनी सांगितले.

दिगंबर व मायकलवर कठोर ताशेरे
दिगंबर कामत यांना पक्षाने सर्व पदे दिली. ते पाच वर्षे मुख्यमंत्रीही राहिले. परंतु केवळ व्यक्तिगत फायद्यासाठी त्यांनी भाजपशी तडजोड चालवली असून स्वस्त, घाणेरड्या राजकारणाचे दर्शन घडवले आहे असे गुंडूराव म्हणाले. मायकल लोबो हे गद्दार असून त्यांनी आपण कोणत्या पातळीचे राजकारणी आहोत हे आपल्या कृतीने दाखवून दिले आहे. त्यांचे चारित्र्य या त्यांच्या वागण्यातून स्पष्ट झाले आहे. केवळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे अशी घणाघाती टीका गुंडूराव यांनी केली.

विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच भेट ः मुख्यमंत्री

सोमवारपासून सुरू होणार्‍या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामात आपण व्यस्त आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक लोक विविध कामानिमित्त येत असतात. कॉंग्रेसचे मायकल लोबो व काही आमदारही असेच काही कामानिमित्त आले होते. कॉॅँँग्रेस पक्षातील राजकीय घडामोडींबाबत आपण अनभिज्ञ आहोत. कॉंग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत आपणाला काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली.
भाजपचे केंद्रीय नेते भूपेंद्र यादव गोव्यात असल्याने ते कॉंग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी आल्याची चर्चा असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काही कामानिमित्ताने गोव्यात आले असल्याचा दावाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केला.

सोमवारपासून सुरू होणार्‍या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामात आपण व्यस्त आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक लोक विविध कामानिमित्त येत असतात. कॉंग्रेसचे मायकल लोबो व काही आमदारही असेच काही कामानिमित्त आले होते. कॉॅँँग्रेस पक्षातील राजकीय घडामोडींबाबत आपण अनभिज्ञ आहोत. कॉंग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत आपणाला काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली.
भाजपचे केंद्रीय नेते भूपेंद्र यादव गोव्यात असल्याने ते कॉंग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी आल्याची चर्चा असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काही कामानिमित्ताने गोव्यात आले असल्याचा दावाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केला.

पणजीतील हॉटेलात रात्री भाजपाची खलबते

कॉंग्रेसमध्ये आठ आमदारांचे घाऊक पक्षांतर घडविण्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी तरी फसल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रात्री उशिरा पणजीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खलबते चालवल्याचे दिसून आले. सभापती रमेश तवडकर हेही रात्री या हॉटेलमध्ये दाखल झाल्याने काहींच्या भुवया उंचावल्या. आपण उद्याच्या विधानसभा अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त असल्याने येथे आल्याचे त्यांनी सांगितले.

त्या १० जुलैची आठवण

तीन वर्षांपूर्वी कालच्याच दिवशी १० जुलै २०१९ रोजी कॉंग्रेसमधून तब्बल दहा आमदार तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षातून बाहेर पडून डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये सामील झाले होते. त्याची तीन वर्षांनी त्याच मुहूर्तावर पुनरावृत्ती करण्याचा बेत कॉंग्रेसच्या काही आमदारांनी ऐनवेळी तूर्त पक्षासोबत राहणे पसंत केल्याने मध्यरात्रीपर्यंत तरी तडीस जाऊ शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्री पत्रकारांशी बोलताना सोमवारपासून राज्य विधानसभेचे अधिवेशन होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे काही आमदार आपल्या भेटीस आले होते असे सांगत त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला काहीच ठाऊक नाही असा दावा केला.

कॉंग्रेसचे कोण आमदार कुठे?
दिनेश गुंडुरावांच्या पत्रकार परिषदेतः
१. संकल्प आमोणकर, मुरगाव २. युरी आलेमाव, कुंकळ्ळी
३. कार्लोस परेरा, हळदोणे ४. एल्टन डिकॉस्टा, केपे
५. रुडॉल्फ फर्नांडिस, सांताक्रुझ
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसः
१. मायकल लोबो, कळंगुट २. केदार नाईक, साळगाव
३. राजेश फळदेसाई, कुंभारजुवे
पक्षाच्या पत्रकार परिषदेस अनुपस्थितः
१. दिगंबर कामत, मडगाव २. आलेक्स सिक्वेरा, नुवे
३. डिलायला लोबो, शिवोली

उपसभापती निवडणूक रद्द
गोवा विधानसभेच्या उपसभापतींची निवड करण्यासाठी १२ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेली निवडणूक रद्द करण्यात आली आहे. सभापतींनी यासंबंधीची सूचना रविवारी जारी केली. गोवा विधानसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीबाबत गेल्या ८ जुलै २०२२ रोजी सूचना जारी करण्यात आली होती. राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर उपसभापतीची निवडणूक रद्द करण्यात आली.

मी दुखावलोय – दिगंबर

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याऐवजी भाजपातून निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस प्रवेश केलेल्या मायकल लोबो यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे दिल्यापासून माजी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत पक्षावर नाराज होते. त्यांनी आपली ही नाराजी पक्षनेतृत्वाकडे व्यक्तही केली होती. आपण ‘रिटायर्ड हर्ट’ म्हणजे निवृत्त व दुखावलेला असल्याचे त्यांनी पक्षाचे सरचिटणीस व गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांना सांगितले. गुंडूराव यांनी रविवारी मडगावात बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीसही ते अनुपस्थित राहिले.