माफीनाम्यानंतर शिवप्रेमींचे आंदोलन मागे

0
9

>> शिवरायांचा कळंगुटमधील पुतळा हटवण्याच्या आदेशानंतर संतापाची लाट

>> आदेश रद्दच्या मागणीसाठी शिवप्रेमींचे 8 तास ठिय्या आंदोल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कळंगुट पोलीस स्थानकासमोर ‘शिवस्वराज्य’ संस्थेने 6 जूनला उभारलेला शिवरायांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याची नोटीस कळंगुट पंचायतीने सोमवारी जारी केल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. परिणामी काल सकाळी 10 वाजता हजारो शिवप्रेमींनी कळंगुट पंचायतीवर मोर्चा काढत आंदोलन छेडले. यावेळी शिवप्रेमींनी सदर नोटीस मागे घेण्यासह सरपंच जोजेफ सिक्वेरा यांनी शिवरायांची माफी मागावी, या मागणीसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पंचायतीसमोरच जवळपास 8 तास ठिय्या मांडला. अटक झाली तरी बेहत्तर पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली. तसेच पंचायत कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. अखेर शिवप्रेमींच्या आंदोलनासमोर जोजेफ सिक्वेरा यांनी नमते घेत शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली. सोबतच शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश रद्द करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवप्रेमींनी आंदोलन मागे घेतले.

कळंगुट पंचायतीने शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेला कळंगुट पोलीस स्थानकाजवळील प्रमुख जिल्हा मार्गालगत नव्याने बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 10 दिवसांच्या आत हटविण्याची नोटीस सोमवारी जारी केली. तसेच संबंधित संस्थेने पुतळा न हटविल्यास पंचायत हा अवैध पुतळा हटविण्याची पुढील कार्यवाही करेल, असेही नोटिसीमध्ये नमूद केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून 6 जूनला पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या नोटिसीनंतर शिवप्रेमींमध्ये असंतोष उफाळला.

या नोटिसीनंतर संतप्त शिवप्रेमींनी मंगळवारी सकाळपासून कळंगुट पंचायतीसमोर गर्दी करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी काल सकाळी श्री शांतादुर्गा मंदिरात शेकडो शिवप्रेमी जमा झाले. देवीला गान्हाणे घालण्यात आल्यानंतर तेथून त्यांनी कळंगुट पंचायतीकडे आपला मोर्चा वळवला. पंचायतीकडे जाताना हातात भगवे झेंडे घेतलेल्या शिवप्रेमींनी शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच पंचायत सदस्यांच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या.
शिवप्रेमींनी पंचायत कार्यालयात प्रवेश करू नये यासाठी कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी पंचायत कार्यालयासमोर पोहोचलेल्या शिवप्रेमींनी पोलीस आणि पंचायतीसमोर दोन मागण्या ठेवल्या. शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश त्वरित रद्द करावा आणि कळंगुट सरपंचांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत माफी मागावी, अशा दोन मागण्या शिवप्रेमींनी लावून धरल्या. तसेच शिवरायांचा पुतळा हटवण्याची नोटीस काढून पंचायतीने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी., उपअधीक्षक जिवबा दळवी, विश्वेश कर्पे, निरीक्षक परेश नाईक, अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच बार्देश तालुक्याचे मामलेदार प्रवीण गावस हेही घटनास्थळी उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी शिवप्रेमींशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते आपल्या मागण्यांवर ठाम होते.

दुपारनंतर संतप्त शिवप्रेमींना आवरणे पोलिसांना कठीण होऊन बसले होते. त्यातच धक्काबुक्की होण्याचा प्रकारही घडला. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. आंदोलनावेळी पंचायत कार्यालयात हजर असलेले सरपंच जोजेफ सिक्वेरा चर्चेसाठी बाहेर येत नसल्याने पाहून संतप्त शिवप्रेमींनी पंचायतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्यांना रोखत कार्यालयाचे शटर बंद केले. त्यानंतर संतप्त शिवप्रेमींकडून कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली.

आदेश रद्दच्या मागणीवर शिवप्रेमी अखेरपर्यंत ठाम
उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी. यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कळंगुट पंचायतीला संबंधित निर्णय स्थगित ठेवण्याचा आदेश दिला; मात्र, हा निर्णय पंचायतीने रद्दच करावा, या मागणीवर शिवप्रेमी ठाम होते. यशस्वीनी बी. यांच्याबरोबरही झालेल्या चर्चेवेळी शिवप्रेमींनी आपल्या दोन मागण्या कायम ठेवल्या. तसेच आदेश रद्द होत नाही आणि जोजेफ सिक्वेरा हे माफी मागत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नाही, अशी भूमिका कायम ठेवली.

शिवप्रेमी आणि सिक्वेरा समर्थकांमध्ये बाचाबाची
जोजेफ सिक्वेरा हे मागण्या मान्य करत नसल्याचे पाहून शिवप्रेमींनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर सायंकाळच्या सुमारास सिक्वेरा यांचे समर्थक देखील दाखल झाले. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. मागण्यांवरून शिवप्रेमी आणि सिक्वेरा समर्थकांत जोरदार बाचाबाची झाली. ती तेवढ्यावरच न थांबता दोन्ही बाजूने एकमेकांवर काचेच्या बाटल्या फेकण्याचा प्रकार घडला, तसेच हाणामारी देखील झाली. त्यात काही जण जखमी झाले.

अखेर सरपंच जोजेफ सिक्वेरांचा माफीनामा
आदेश रद्द आणि माफीनामा या मागणीसाठी सकाळी 10 च्या सुमारास पंचायतीसमोर दाखल झालेले सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या मांडून होते. शिवप्रेमी मागण्यांवर ठाम असल्याचे पाहून अखेर जोजेफ सिक्वेरा हे पंचायत कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेतल्याचे जाहीर केले. सोबतच शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली.