- भाग्यश्री केदार कुळकर्णी (पर्वरी)
पावसाळ्यात पावसात भिजलो नाही, चिखलात पाय खराब केले नाही, धबधब्याचा अनुभव घेतला नाही, भाताची शेती पाहिली नाही, भुट्टा खाल्ला नाही, टपरीवरचा फक्कड चहा नि सोबत गरमागरम कांदा भजी खाल्ली नाहीत तर कसलं जगतोय ‘जीवन…?’
कोसळणे हा गुणधर्म असला तरी सौंदर्य खुलवणे हे चैतन्य असल्याची साक्ष दिसून येते. फक्त आपल्या चक्षूंनी ते आपण अचूक टिपले पाहिजे.
जंगलातून जाताना असंख्य प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती बघायला मिळतात आणि हजारोंच्या संख्येने, रंगीबेरंगी … अद्भुत प्रवास .!! मग ज्यासाठी केला हा अट्टहास असा तो प्रेक्षणीय धबधबा …. थंड गार, निर्मळ असे पाणी अतिशय सुंदर, सुडौल बांधा ..
रोज ऑफिस ते घर, घर ते शाळा एवढीच जगाची लांबी रुंदी करून सुरळीत जगता येतं. पण एवढं पुरेसं नाहीये आपल्याला … कधीतरी सुरळी करून ठेवलेला तो जगाचा नकाशा काढणार … त्यात आपला देश, आपले राज्य .. मग बरंच काही मनन चिंतन झाल्यावर .. एकदा डोक्यात विचार येऊन गेला की तो तडीस नेल्याशिवाय चैन नाही.
खरंय, कधीकधी त्या विधात्याने निर्माण केलेले जग घरात पाहण्याचा अट्टहास जरी केला नं तरी आपल्या जाणिवा काही इंच रुंद झाल्याचा भास होईल. जाणिवांचा विस्तार म्हणजे प्रवासाची सुरुवात..!!! त्यात काय बघायचं… म्हणणार्यांच्या मनांना या विश्वाची दारे कायमची बंद होतात. त्यामुळे आपण कशाला मुकलो आहोत हे कळणं अवघडच..!! तर बेस्ट वे, आपल्या विश्वाचं अंगण आपण ठरवायचं..! आणि अशा पावसाळी वातावरणात ‘घरात बसणे’ अशक्य आहे. पावसाळ्यात पावसात भिजलो नाही, चिखलात पाय खराब केले नाही, धबधब्याचा अनुभव घेतला नाही, भाताची शेती पाहिली नाही, भुट्टा खाल्ला नाही, टपरीवरचा फक्कड चहा नि सोबत गरमागरम कांदा भजी खाल्ली नाहीत तर कसलं जगतोय ‘जीवन…?’
रोजच्या अतिसामान्य कटकट्या व्यवहाराच्या सांदिफटित आपल्यामध्ये वैश्विक होण्याची तहान, हे उमलणारं संवेदन आपल्याजवळ आहे का..?? याचा शोध घ्यायला आमची गाडी दर रविवारी निघते … आणि एक अद्भुत, विलक्षण सौंदर्याने नटलेला निसर्ग पाहायला मिळतो. चला तर मग आज जंगलांचे वरदान लाभलेल्या गोव्याच्या परिसरात घनदाट वन संपदा नव्हे वन सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करु या. या घनदाट जंगलांमधे गोव्याच्या आसपास असलेले धबधबे बघुया.
हरवळे धबधबा – पणजीपासून ३० किमी व डिचोलीपासून ८ किमीवर असलेला हरवळेचा धबधबा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. आता पावसाळ्यात तर प्रचंड पाण्याचा ओघ आणि भरपूर मोठा साठा असतो. खाली कोसळत असलेल्या पाण्याला पाहून काही वेळा रौद्र रूपाची प्रचिती येते. जमिनीवर पडल्यावर फार खोल असे नाही पण उथळ असल्याने पाण्यात उतरून आनंद घेता येतो. शिवाय येथे लाभलेल्या प्रचलित रूद्रेश्वर मंदिराचा वारसा आहे, पांडव लेणीदेखील पाहायला मिळते. अगदी हे सगळं पाहिल्यावर त्या काळात गेल्यासारखे वाटते. पूर्वी एक दुजे के लिये सिनेमातील एका गाण्याचे चित्रीकरणही इथे झालेले आहे. त्यामुळे नक्कीच भेट द्यायला हवी.
अंबोली घाट – बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्या दर्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्या अधिकच सुंदर दिसतात.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोली घाटमाथ्याला हा घाट रस्ता आपणास घेऊन जातो. महाराष्ट्रातील महत्त्वाचा असा हा मार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा हा मार्ग आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा घाट मार्ग अजूनही सुरक्षित आहे. या रस्त्याने प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग पाहत घाटातील नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक आनंदाचा ठेवा ठरतो. पावसाळ्यात तसेच जोडून येणार्या सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरू असतो. दाट जंगले, दर्या- खोर्यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद सृष्टिसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. शिवाय येथे थाटलेली उघड्यावरची हॉटेलं म्हणजे जणू प्राणवायू … कांदा भजी, भुट्टे, अंडा भुर्जी, मॅगी, चहा, कॉफी… ई. मन आणि पोट तृप्त व्हायला होते.
नेत्रावळी धबधबा – याला ‘सावरी वॉटरफॉल’ देखील म्हणतात. पणजीपासून ८१ किमी अंतरावर नेत्रावळी वाईल्डलाईफ सॅन्क्चुअरीमधे हा ‘सावरी धबधबा’ स्थित आहे.
खरंतर येथील ट्रेकींग हे खरोखर पर्यावरणाचा सुखद अनुभव आहे. सगळं काही सेंद्रिय (ऑरगॅनिक). आम्ही तणशीकर स्पाईस फार्मचा अनुभव घेतला होता. सुंदर ट्री हाऊस कॉटेजेस… मसाला शेती, पारंपरिक जेवण, २५० वर्षापूर्वीचे पारंपरिक मातीचे घर, गूढ असा बबल लेक … हे सगळं पाहिल्यावर हुरळून जायला होतं आणि मुख्य आकर्षण ‘सावरी वॉटरफॉल ’….!! इथे जायला आधी आम्ही जीप सफारी केली … मग ३ किमीचा जंगलरस्ता आहे ट्रेकींगसाठी. जंगलातून जाताना असंख्य प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती बघायला मिळतात आणि हजारोंच्या संख्येने, रंगीबेरंगी … अद्भुत प्रवास .!! मग ज्यासाठी केला हा अट्टहास असा तो प्रेक्षणीय धबधबा …. थंड गार, निर्मळ असे पाणी अतिशय सुंदर, सुडौल बांधा … जणू आपल्या दुर्मीळ चालीने सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता हा धबधबा..! नानाविध प्रकारच्या मासोळ्या.. बघायला मिळतात. शिवाय पाय पाण्यात टाकून बसल्यावर अगदी मसाज झाल्यासारखा सुखद अनुभव मिळतो.
दुधसागर वॉटरफॉल – हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. हा धबधबा कर्नाटक आणि गोवा या राज्यांची सीमारेषा आहे. इतका मोठा जलप्रपात हा संपूर्णपणे जंगलातील जैविक विविधतेने नटलेला आहे. नावाप्रमाणेच दुधाचा भव्य सागर असलेला हा धबधबा विश्वातील सुंदर आणि लोकप्रिय झर्यांमधील एक आहे ज्याची उंची ३१० मीटर आहे व भारतातील ५ व्या नंबरवर याची गणती आहे. पणजी पासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान यांच्या मधोमध विस्तारलेला आहे. ह्या रस्त्यातील सफारी म्हणाल तर स्वर्ग..!! असंख्य जातीचे पक्षी …ज्यांना जवळून फोटोग्राफी करायची असेल त्यांना ही सुवर्णसंधी..!! बॉर्डरवर असलेल्या ह्या धबधब्याचे रेल्वेतून तर अतिशय मनोहारी दृश्य दिसते.. की त्याला ‘सी ऑफ मिल्क’ असे संबोधले जाते.
म्हणूनच तर चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाचे चित्रीकरण येथे करण्यात आले.
तांबडी सुरला धबधबा – पणजीपासून साधारण ६५ किलोमीटर अंतरावर
भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थित, अतिशय दाट, घनदाट जंगलात हा वॉटरफॉल मनसोक्त नाद करतो आहे. तांबडी सुरला हे अतिशय पारंपरिक नाव नक्कीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. हा वॉटरफॉल जास्त करून जल खेळासाठी (वॉटर स्पोटर्स) व निसर्गप्रेमींसाठी प्रसिद्ध आहे. हे पवित्र ठिकाण शिवाच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, इथेही पांडवांचे काही काळ वास्तव्य होते. १२ व्या शतकातील कदंबा राज्यकर्त्यांच्या काळातील हे शिवमंदिर म्हणजे अद्वितीय कलेचा आविष्कार आहे.
केसरवल फॉल्स –
पणजीपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेला केसरवल धबधबा हा वेर्णाच्या पठारावर आहे. इथल्या नीरव शांततेचा आस्वाद घेण्यासाठी लोक आतुरलेले असतात. केसरवल हा शब्द गरुडांच्या राहण्याची कॉलनी (हाऊस ऑफ ईगल)च्या संदर्भात संबोधला आहे. येथे पाम व सुपारीच्या झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे. वसंतामधे या झर्याने एक वेगळेच रूप धारण केलेले असते. पडणार्या प्रवाहाचे जलतुषार अतिशय सुंदररित्या खाली पडत असतात. म्हणूनच याला ‘द केसरवल स्प्रिंग’ असेही म्हणतात. या पाण्याला औषधी गुणधर्म प्राप्त झालेले आहेत हे त्याचे वैशिष्ट्य ..!!
सडा वॉटरफॉल –
सडा वॉटरफॉल हा चोरला घाटात आहे. ८ किमी अंतरावर छोट्या गावातून याचा रस्ता जातो. अतिशय उत्साही आणि साहसी वातावरणात पायी आजूबाजूला हिरवळ बघत ट्रेक करताना फार मजा येते.
याचप्रमाणे हिवरे धबधबा हाही एक स्वतःचे वेगळेपण घेऊन वाळपईपासून काही अंतरावर वाहतो आहे.
जसे वर्षाऋतूच्या आगमनाने हा निसर्ग न्हाऊन निघतो.. तरूच्या सर्वांगाला उन्मेषाचे भरते येते… सूर्यकिरणांच्या प्रथम स्पर्शाने ते कमल हलकेच विकसित होते… जलस्पर्शाने मिठाचे खारटपण सुटून ते जलरूप होते….. थोडक्यात सजीव असो निर्जीव, चैतन्य कणाकणात आहे. आणि वेळोवेळी ते प्रकटही होतच असते.. फक्त व्यक्त होण्याची परिभाषा अत्यंत वेगवेगळी आणि प्रचंड विलक्षण..!!
असाच काहीसा अनुभव मला ह्या धबधब्यांच्या सान्निध्यात आला. कोसळणे हा गुणधर्म असला तरी सौंदर्य खुलवणे हे चैतन्य असल्याची साक्ष दिसून येते. फक्त आपल्या चक्षूंनी ते आपण अचूक टिपले पाहिजे.