>> १४ जूनपर्यंत जोरदार वृष्टी; शेतकरी सुखावला
गेले बरेच दिवस कारवारमध्ये रेंगाळलेला नैऋत्य मान्सून काल राज्यात अखेर दाखल झाला. राज्यभरात मान्सूनच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला. तसेच पावसाअभावी शेतीची कामे रखडल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. आता मान्सून दाखल झाल्याने शेतकरी सुखावला असून, शेतीकामांना वेग येणार आहे. राज्यात दमदार हजेरी लावल्यानंतर पुढे आगेकूच करत मान्सूनने सिंधुदुर्गात अर्थात महाराष्ट्रात प्रवेश केला.
नैऋत्य मान्सूनने गेल्या ३१ मे रोजी कारवारला हजेरी लावली होती; मात्र तेथून गोव्यात पोचायला मान्सूनने तब्बल १० दिवस लावले. आता मान्सून संपूर्ण अरबी समुद्र, संपूर्ण गोवा, कर्नाटक व कोकणच्या काही भागांत दाखल झाला आहे, अशी माहिती काल भारतीय हवामान खात्याने दिली.
१४ जूनपर्यंत राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच शनिवारी व रविवारी राज्याच्या काही भागांत जोरदार, तर काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १४ जूनपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या. दुपारनंतर खर्या अर्थाने पावसाने दमदार बरसात केली. राज्याच्या सर्वच भागांना पावसाने झोडपून काढले. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेत सायंकाळी ७ च्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. डिचोली, काणकोण या भागात जोरदार वृष्टी झाली. परिणामी आता पावसाअभावी खोळंबलेल्या शेतीकामांना वेग येणार आहे.