मान्यताप्राप्त १० खाण लिजेस अंतिम प्रक्रियेसाठी सचिवांकडे

0
91

फोमेंतो, चौगुले, अगरवाल कंपन्यांची लिजेस
राज्यातील खाण व्यवसाय लवकर पूर्ववत सुरु व्हावा या हेतूने सरकारने लिजांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली असून खाण खात्याने दहा लिजांना मान्यता देऊन पुढील अंतिम प्रक्रियेसाठी प्रस्ताव खाण सचिवांकडे पाठविले आहेत.त्यात फोमेंतो कंपनीच्या काही लिजांचा तर ३ चौगुले कंपनीच्या तर २ अगरवाल मिनरल कंपनीच्या लिजांचा त्यात समावेश आहे. एमएमडीआर कायद्यातील कलम ८ (३) नुसार या लिजांचे नूतनीकरण केले जाईल, अशी माहिती खाण खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
गेली दोन वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या एप्रिलमध्ये खाण बंदी उठविली व राज्य सरकारला खाण धोरण तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सरकारने खाण लिजांच्या नूतनीकरण धोरणाचा मसुदा करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळविली होती. या लिजांचा लिलाव व्हावा, अशी काही बिगर सरकारी संस्थांची मागणी होती. पर्रीकर सरकारने ती फेटाळली व मूळ लिजधारकांनाच लिजे देण्याचे धोरण अवलंबिले.
प्रत्यक्ष खनिज उत्खननाचे काम पुढील वर्षीच होऊ शकेल.
खाण बंदीमुळे राज्यात बेरोजगाराची समस्या निर्माण झाली होती. काही प्रमाणात त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने खाण पॅकेज दिली होती. प्रत्यक्ष खनिज उत्खनन कधी सुरु होईल याकडे खाण अवलंबितांचे लक्ष लागले आहे. वरील खाण कंपन्यांनी यापूर्वीच स्टँप ड्युटी भरली आहे. राज्य सरकारने लीज नूतनीकरणाचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर खाण कंपन्यांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून ना हरकत दाखले मिळावे लागेल. या प्रक्रियेस विलंब लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.