मानवी जीवनाच्या रंगीबेरंगी छटा

0
22

योगसाधना- 654, अंतरंगयोग- 240

  • डॉ. सीताकांत घाणेकर

सकारात्मक विचाराच्या माणसाचा यश-अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. यश मिळाले तर त्याचे समाधान, नाही मिळाले तरी तो खचून जात नाही. कारण त्याला त्याने केलेल्या प्रयत्नांमध्ये समाधान वाटते. त्याच्या मनात एक दृढ संकल्प असतो, मजबूत प्रेरणा असते.

प्रत्येक व्यक्तीचे जीवन विविध धाग्यांनी विणलेले आहे. आमचे कपडेही वेगवेगळ्या रंगीत आकर्षक धाग्यांनी भरलेले आहेत. पण मानवाच्या आयुष्यातील धागे मुख्यतः सुख-दुःखाचे, ताण-तणावाचे, मौज-मस्तीचे, आनंद-समाधानाचे असतात. सकारात्मक घटनांमुळे मानवी जीवन खुलून जाते. सगळीकडे आनंदीआनंद असतो. नकारात्मक घटनांनी वातावरण दुःखाचे, चिंतेचे बनते. एक सोपे उदाहरण घेऊ. बालकाचा जन्म म्हणजे सगळीकडे जणू आनंदोत्सव. याउलट मृत्यूमुळे घरात उदासीन वातावरण असते. तसेच वातावरणातील बदल- थंड हवा, आल्हाददायक वातावरण, सुंदर निसर्ग, सुगंधी फुले वगैरे… हे सगळे असले की मन प्रसन्न होऊन जाते. पण उलट असले की म्हणजे- गरम हवा, अंगात घाम, सुकलेली झाडे, पाण्याविना नदी यामुळे मनात एकप्रकारची खिन्नता दाटून येते. तसेच परीक्षेचा चांगला निकाल, उत्तम गुण, इच्छित विषयात प्रवेश, हवी तशी नोकरी, चांगल्या शहरात राहणी अशा वातावरणात प्रसन्नता लाभते. याउलट प्रयत्न करूनही परीक्षेत नापास अथवा गुण कमी, मनाविरुद्ध नको असलेल्या विषयात पुढील अभ्यास, जेमतेम पगाराची नोकरी, राहण्यासाठी मनपसंद जागा नाही अशा वातावरणात आपल्याला उदासीनता जाणवते.
मानवी जीवनाच्या या विविध रंगीबेरंगी छटा आहेत. त्याप्रमाणेच स्वतःच्या मनाची अवस्था होते. अशावेळी आपल्या हातात एकच गोष्ट असते, ती म्हणजे, प्रामाणिक प्रयत्न व मिळेल त्या परिस्थितीत समाधान. अशावेळी चांगल्या समुपदेशनाचा अत्यंत फायदा होतो. सकारात्मक विचार करणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा, सोबत्यांचा फार आधार वाटतो.

काही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत सुख मानून घेतात. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. अनेकजण धार्मिक विचारांचा आसरा घेतात. ते म्हणतात- ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे।’ पण याचा अर्थ परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करून ती शक्यतो बदलण्याचा प्रयत्न अवश्य करावा. तो केव्हाही सोडू नये. अनेकवेळा यशदेखील येते. अशा गटामध्ये थोड्या व्यक्ती अगदी सकारात्मक दृष्टिकोनाच्या असतात. यश-अपयशाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच असतो. यश मिळाले तर त्याचे समाधान, नाही मिळाले तरी ते खचून जात नाहीत. कारण त्यांना त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे समाधान वाटते. प्रगतीकडे त्यांची वाटचाल चालूच असते. त्यांच्या मनात एक दृढ संकल्प असतो. मजबूत प्रेरणा असते.
जीवन हे ध्येय, लक्ष्य आहेच; पण त्यापर्यंत जाण्याचा प्रवास हा मुख्य आहे. त्या प्रवासात विविध प्रसंग, समस्या येतीलच, तसे चांगले अनुभवदेखील येतील. तेव्हा यशामुळे प्रयत्न थांबवू नका. आणखी पुढे जा. तसेच अपयशामुळे खचून जाऊ नका. आणखी जिद्दीने, उमेदीने ध्येयापर्यंत पोचण्याचा प्रवास व प्रयत्न चालू ठेवा.
इतिहासाकडे नजर फिरवली- स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक- तर अशी असंख्य उदाहरणे दृष्टिक्षेपात येतील. या थोर व्यक्ती, संत-महात्मे, महापुरुष एका जागेवर थांबले नाहीत. यश-अपयशाने, स्तुती-निंदेने स्वस्थ राहिले नाहीत. ध्येयाकडे वाटचाल करीत राहिले.

या अशा व्यक्तींमध्ये अनेकजण येतात-

  • ध्रुव, प्रल्हाद, नाचिकेता- यांच्यासारखे बालक.
  • महाराणा प्रताप, शिवाजी-संभाजी महाराज यांच्यासारखे राजे-महाराजे.
  • राणी लक्ष्मीबाई, राणी चिन्नम्मा, जिजामाता यांच्यासारख्या राजमाता व राण्या.
  • भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, रामप्रसाद बिस्मिल्ला, मंगल पांडे- यांच्यासारखे स्वातंत्र्यसैनिक.
  • ज्ञानेश्वर, तुकाराम, निवृत्ती, नामदेव, गोरा कुंभार यांच्यासह जनाबाई, मीराबाई असे संत.
  • वसिष्ठ, विश्वामित्र, पतंजली यांसारखे महर्षी.
  • श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान बुद्ध यांच्यासारखे अवतार.
    अशांची यादी अमर्यादित आहे. त्याशिवाय हल्लीच्या काळातील विविध क्षेत्रांतील धुरिण- विज्ञान, खेळ, संगीत, नाटक, साहित्य, कला क्षेत्रात नावलौकिक कमावून आहेत.
    योगसाधनेत न विसरू शकणारे स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरू श्री रामकृष्ण परमहंस.
    त्याशिवाय प्रत्येक राष्ट्रात विविध क्षेत्रांत उच्चकोटीला पोचलेले अनेक महापुरुष आहेत.
    ही नावे आठवण करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे यातील कुणाचाही प्रवास सुखाचा-आनंदाचा नव्हता. प्रत्येकाला अत्यंत कठीण परिश्रम करावे लागले. हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. यश-अपयशदेखील वेळोवेळी आले.

पण या सगळ्यांत काही गोष्टी समान होत्या-

  • विश्वास- स्वतःवर, भगवंतावर.
  • प्रयत्न- अथक व त्यावर श्रद्धा.
  • पवित्रा- गरज पडेल तेव्हा आवश्यकतेप्रमाणे बदलता पवित्रा.
  • समजूतदारपणा- गरज पडेल तेव्हा दुसऱ्याचे मत व यशस्वी बदल, माघार.
    यांच्या उज्ज्वल व यशस्वी जीवनाची हीच काही प्रमुख कारणे आहेत. इतर अनेक कारणे असतीलदेखील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हर क्षणी असे विविध प्रसंग येतातच. त्यावेळी यांच्या चारित्राचा समरसून अभ्यास करावा. त्यावर चर्चा, चिंतन करावे व आपल्यासाठी योग्य मार्ग निवडावा. त्या मार्गात श्रद्धेने, आत्मविश्वासाने वाटचाल करावी. काही अडचण आली तर गरज असेल तेव्हा मार्ग बदलावा. अहंकाराच्या आहारी मात्र जाऊ नये.
    महाभारतात दुर्योधन, शकुनी, कर्ण, धृतराष्ट्र, अश्वत्थामा यांच्या प्रखर नकारात्मक दृष्टिकोनाची व अहंकाराची उदाहरणे आहेत. तसेच रामायणात रावण महान वेदशास्त्र पारंगत, बुद्धिमान, ज्ञानी, वेदांना ऋचा लावणारा, महान शंकर भक्त; पण त्याचे काही महाभयंकर विचार. परस्त्रीचे आकर्षण व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर भयंकर अत्याचार. अहंकार- स्वतःच्या विद्येचा व कर्तृत्वाचा. भारतीय संस्कृतीला एक प्रथम पाया आहे. ‘विद्या विनयेन शोभते’ हे न समजल्यामुळे त्याचा सर्वनाश झालाच, पण त्याबरोबर कुटुंबाचा, राष्ट्राचा, नागरिकांचा सर्वनाश झाला. याउलट रावणाचा छोटा बंधू बिभीषण. तो सत्याच्या बाजूला राहिला. लंकेचा राजा झाला. श्रीरामाच्या आशीर्वादामुळे यशस्वी झाला.
    आपणातील अनेकांच्या बाबतीत असे विविध प्रसंग येतात. काही प्रसंगाच्या वेळी आपण प्रयत्न करतो, यश मिळवतो, तर केव्हा केव्हा अपेक्षित यश मिळत नाही. अशावेळी पूर्वीच्या प्रसंगात आलेल्या यशाची व अपयशाची विविध कारणे संशोधन करून शोधून काढावी. ती परिस्थिती पुन्हा येऊ नये याची दक्षता घ्यावी. आणि आलीच तर दुसरे पर्याय तयार ठेवावेत. हे सर्व करताना एका गोष्टीचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका- या आपल्या कार्यात स्वतःची भूमिका, कर्तृत्वशक्ती जबरदस्त असते. पण त्याशिवाय एक मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे ईश समर्पण व त्याची कृपा. ते केव्हाही विसरू नका. अनेकवेळा अहंकारापोटी काही व्यक्ती भगवंताची कृपा विसरतात.
    दरक्षणी भगवंताची आठवण करून कर्म केले तर ते कर्म कर्मयोग होते. यातून यश नक्कीच मिळते. त्यासाठी प्रत्येक योगसाधकाने समर्पित होऊन ईश्वराची आठवण करावी. केव्हा केव्हा अपेक्षित यश मिळाले नाही तर अपयशाची कारणे शोधावी व दुसऱ्या वेळी दक्षता घ्यावी. पण खचून जाऊ नये.
    आमच्या वैद्यकीय क्षेत्रात असे केव्हा केव्हा घडते- ऑपरेशनची सर्व तयारी उत्तमरीत्या केलेली असते. सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे पार पडतात. पण केव्हा केव्हा यश मिळत नाही. कदाचित रोग्याची रोगप्रतिकारशक्ती, इच्छा व आत्मशक्ती कमी असू शकते अथवा काही प्रारब्धवश घटना असू शकतात.