- डॉ. सीताकांत घाणेकर
आज 21 जून- जागतिक योगदिन. दरवर्षी एकत्रित राष्ट्रसंघ एक ध्येय देतो. परंतु विश्वामध्ये या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी गरज आहे शास्त्रशुद्ध तत्त्वज्ञानासहित योगसाधनेची. दरवर्षी हे ध्येय बदलते. यंदाचे ध्येय आहे- ‘एक पृथ्वी व एक आरोग्य.’
आपला भारत अत्यंत प्रगत देश आहे. हजारो वर्षांचा इतिहास या देशाला आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाचा सहभाग आहे- साहित्य, विज्ञान, कला, अध्यात्म, वैद्यकीय, भाषा, धर्म… पुष्कळ साहित्य प्रत्येक विषयात उपलब्ध आहे. जरी साहित्य जुने असले तरी हल्लीच्या तथाकथित प्रगत विश्वात उपयोगी आहे. हल्ली तर नवनवे संशोधन यांतील विविध विषयांत होत आहे.
भारत एकेकाळी अत्यंत समृद्ध देश होता. प्रगतीशील होता. त्यामुळे विविध आक्रमणे भारतावर झाली. सुरुवातीला मोगल, तद्नंतर पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्लिश… यांतील प्रत्येकाने वेगवेगळ्या तऱ्हेने या देशावर राज्य केले. आपापल्या देशाची भाषा, धर्म, संस्कृती, कायदे जबरदस्तीने येथील नागरिकांवर लादले. विविध तऱ्हेचे अत्याचार केले. आपली मंदिरे उद्ध्वस्त केली. येथे पूर्वी नावाजलेली विद्यापीठे होती. उत्कृष्ट दर्जाचे साहित्य तिथे उपलब्ध होते. जाळपोळ करून साऱ्याचा नाश केला गेला. तरीही आपले साहित्य, संस्कृती, वैदिक सनातन धर्म शाश्वत राहिला. त्याची कारणे अनेक आहेत.
एक कारण म्हणजे भारत ही पुण्यभूमी आहे. येथे अनेक साधू-संत, महापुरुष, ऋषी-महर्षी जन्माला आले. त्यांनी आपल्या संस्कृतीची पाळेमुळे व्यवस्थित सांभाळली होती. अनेक ऋषींचे आश्रम म्हणजे निसर्गरम्य वातावरणात प्रगत झालेली विद्यापीठे होती. कदाचित त्यामुळेच भगवंताला या भूमीत अवतार घेण्याची इच्छा झाली.
आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे व बलिदानामुळे या कराल कलियुगातदेखील विविध विषयांवर संशोधन सुरू झाले. ते विषय प्रत्येक क्षणाला प्रगती करत आहेत. आपली आर्थिक परिस्थितीदेखील जलद गतीने सुधारत आहे. काही विषयांचा जरी विचार केला तरी ही गोष्ट सहज लक्षात येईल. उदा.
1) भाषा ः आपल्यावर जरी पाश्चात्त्यांनी स्वतःच्या भाषा- इंग्रजी, पोर्तुगीज मुख्यत्वेकरून- आपल्यावर लादल्या तरी मातृभाषांची प्रगती चालू राहिली. अवश्य गती कमी आहे, पण निराश होण्याचे कारण नाही. अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृत भाषेचा विश्वातील अनेक देश अभ्यास करताहेत. संगणकासाठी ती भाषा अत्यंत उपयुक्त आहे असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. पाश्चात्त्य देशांत संस्कृतच्या शिक्षकांची गरज भासते आहे.
- आयुर्वेद ः जरी पाश्चात्त्य वैद्यकीय विज्ञान- ॲलोपॅथी- जास्त वापरात आहे, तरी आयुर्वेद पुन्हा एकदा वापरला जात आहे. विविध रोगांसाठी आयुर्वेदातील औषधे वापरली जात आहेत. यातून नवनवीन शैक्षणिक संस्था निघत आहेत.
- योगशास्त्र ः हे शास्त्रदेखील प्रगती करत आहे. जगभर या शास्त्राचा उपयोग वाढत आहे. याचे एक उत्तम प्रमाण म्हणजे- जागतिक योग दिवस (21 जून)- हजारो ठिकाणी करोडो व्यक्ती योगा करून साजरा करतात.
सन 2014 मध्ये एकत्रित राष्ट्रसंघातील बहुतेक देशांनी या संबंधात ठराव पास केला व 2015 पासून हा दिन मोठ्या उमेदीने जगभर साजरा केला जातो.
या दिवशी आवर्जून आठवण होते ती स्वामी विवेकानंदांची. या महापुरुषाने विश्वातील अनेक देशांत वेदांत, योग या विषयांचा प्रचार व प्रसार केला. त्यामुळे विश्वाला या विषयाचे ज्ञान मिळाले. योगशास्त्र त्यांनी विविध तऱ्हेने समजावले. त्यांची काही प्रचलित वाक्ये आहेत. त्यामध्ये एक म्हणजे- ‘तत्त्वज्ञानाशिवाय योगाला मूळ नाही, उगम नाही. योगाशिवाय तत्त्वज्ञानाला फळ नाही.’ ही दोन वाक्ये समजली की योगतत्त्वज्ञानाचे महत्त्व कळेल. बहुतेकजण योग करतात, पण त्यामागचे तत्त्वज्ञान न शिकता. त्यामुळे योगाचा संपूर्ण फायदा होत नाही. जसे मुळाशिवाय वृक्ष टिकणार नाही. त्याउलट अनेक व्यक्ती योगतत्त्वज्ञान शिकतात, पण अपेक्षेप्रमाणे योग करत नाहीत. त्यामुळे योग्य फळ मिळत नाही. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात, योगशास्त्र योगसाधना म्हणून समजून करायला हवी.
स्वामीजींचे गुरू श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत ः ‘हा संसार म्हणजे काट्याकुट्यांनी भरलेले एक अथांग जंगल आहे. त्यापासून आम्ही दूर जाऊ शकत नाही व काटे काढूही शकत नाही. त्याला उपाय एकच- चांगले लांब बूट घालायचे आणि ते बूट म्हणजे शास्त्रशुद्ध योगशास्त्र!’
योगतत्त्वज्ञानाप्रमाणे मानवाचे पंचकोश आहेत- - अन्नमय कोश (शरीर), 2. प्राणमय कोश, 3. मनोमय कोश (मन), 4. विज्ञानमय कोश (बुद्धी), 5. आनंदमय कोश (आत्म्याचा कोश). हे पाचही कोश तेवढेच महत्त्वाचे म्हणून योगतंत्रामध्ये त्यातील प्रत्येकासाठी विविध तंत्रे आहेत. पण सर्वात मुख्य म्हणजे आत्म्याचा कोश. त्यासाठी आध्यात्मिक ज्ञान सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. हा आत्मा परमात्म्याचा अंश आहे- हे ज्ञान आधी हवे.
स्वामी विवेकानंद याची जाणीव करताना सांगतात- ‘हे अमृताचे अधिकारीगण! ईश्वराचे पुत्र तुम्ही, तुम्ही अमृताचे वारसदार. पवित्र, पूर्ण आत्म्ये, तुम्ही या मर्त्यभूमीवरील देवता…
उठा! भृगराजांनो उठा आणि आपण मेंढरे आहोत हा खोटा भ्रम काढून टाका. तुम्ही म्हातारपण- मरण नसलेले मुक्त, नित्यानंदस्वरूप आत्म्ये आहात.’
बहुतेकजण योगतत्त्वज्ञानाचा अभ्यास करत नाहीत. त्यामुळे त्यांना या दृष्टिकोनाबद्दल जाणीवच नाही. पुढे ते म्हणतात- ‘प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. बाह्य व आंतरिक प्रकृतीवर नियंत्रण ठेवून हे अव्यक्त ब्रह्मरूप व्यक्त करणे हेच मानवी जीवनाचे परम ध्येय आहे. कर्म, भक्ती, मनसंयम, ज्ञान यांतील कुठल्याही एक अथवा एकापेक्षा जास्त मार्गांनी हे ध्येय साध्य करा व मुक्त व्हा. वास्तविक धर्म हाच आहे. सिद्धांत, वाद, कर्मकांड, धर्मग्रंथ, मंदिर, आकृती- हे सर्व गौण आहे.’
स्वामीजींनी कथित केलेले हे ज्ञान नसल्यामुळे आपण गौण गोष्टीतच अडकलो आहोत.
चार मार्ग जे सांगितले आहेत, ते म्हणजे- ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग व अष्टांगयोग. योगसाधकाने या चारही मार्गांचा सखोल अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.
स्वामीजींनी या चारही योगांवर अनेक प्रवचने केली आहेत. ते त्यांचे साहित्य प्रसिद्धच आहे. तसेच पतंजली योगसूत्रे, हठयोग प्रदीपिका यांचादेखील अभ्यास हवा. श्रीमद् भगवद्गीता तर योगशास्त्रच आहे- सर्वतोपरी ज्ञानासाठी.
मानवी जीवनाचे ध्येय समजावताना विवेकानंद सांगतात- ‘जगातल्या सर्व दुःखांपासून सोडवणूक करून, नित्यानंदाचा अनुभव घेऊन आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे- हेच आहे.’
जागतिक योगदिन- 2015 रोजी एकत्रित राष्ट्रसंघाने दिलेले ध्येय होते- ‘समन्वय व शांतीसाठी योग.’ विश्वामध्ये या ध्येयासाठी गरज आहे ती शास्त्रशुद्ध तत्त्वज्ञानासहित योगसाधनेची- जी स्वामीजींनी सांगितली आहे. दरवर्षी हे ध्येय बदलते. 2025 मधील ध्येय म्हणजे- ‘एक पृथ्वी व एक आरोग्य.’
वैदिक सनातनधर्माप्रमाणे भारताचे ध्येयवाक्य आहे- ‘वसुधैव कुटुम्बकम्।’ त्यामुळे या वर्षीचे घोषवाक्यदेखील योगसाधनेमुळे सहज साधले जाईल. पण त्यासाठी फक्त आसने, प्राणायाम व ध्यान करून नाही तर योगशास्त्रातील चारही मार्गांचा अभ्यास व त्याप्रमाणे साधना केली पाहिजे. आणि हे सर्व एक दिवस नाही तर निरंतर, खंड न पडता, प्रामाणिकपणे व प्रेमपूर्वक करायला हवे.
विश्वाला या तत्त्वज्ञानाची व साधनेची अत्यंत गरज आहे- मानवी जीवनाचे ध्येय साधण्यासाठी!