शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचे प्रतिपादन
जगभरात आज तंत्रज्ञान वेगाने बदलू लागलेले असून तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याण व विकासासाठीच व्हायला हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैज्ञानिक अनिल काकोडकर यांनी काल ‘तंत्रज्ञान दृष्टी २०३५’ या विषयावरील व्याख्यानात केले. पांडुरंग मुळगावकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.आजच्या युगात तंत्रज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे ठरलेले असून एका गोष्टीसाठी तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा आजच्या काळात अन्य वेगवेगळ्या गोष्टींसाठीही वापर होत असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा लोकशाही बळकट करण्यास तसेच देशातील कमकुवत घटकांचे सबलीकरण व सक्षमीकरण यासाठीही कायदा होऊ शकतो व तो तसा व्हायला पाहिजे यावर त्यांनी व्याख्यानातून भर दिला.
तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा र्हास
तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचाही र्हास होत असतो, असे सांगून तंत्रज्ञानामुळे निसर्गाचा विद्ध्वंस होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर केल्यास मानव जातीला त्याचा मोठा लाभ होत असतो व तेच उद्दिष्ट असायला हवे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बालकांना व मुलांना आरोग्यदायी, पोषक असे अन्न मिळण्याची गरज असून तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर व्हायला हवा. देशाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व देशाची सुरक्षितता यासाठीही तंत्रज्ञान फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जलस्रोत स्वच्छतेसाठी तंत्रज्ञान वापरावे
नद्या-नाले स्वच्छ ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानामुळे आज कागद वापरण्याची गरज राहिलेली नसून कागदाचा कमीत कमी वापर व्हायला हवा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या जमान्यात भोंदुगिरीला स्थान नसून भविष्य सांगू शकणार्या तंत्रज्ञानाची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले. देशासमोर असलेला कित्येक अणीअडचणी केवळ तंत्रज्ञानामुळे दूर होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.