मानवा, नको वृथा अभिमान!

0
7

योगसाधना ः 660, अंतरंगयोग- 246

  • डॉ. सीताकांत घाणेकर

शारीरिक उपभोग, भौतिकता हेच त्याला सर्वस्व वाटते. मानव विसरतो आहे की हा त्याचा देहाभिमान व्यर्थ आहे. हा देह क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. तसेच ज्या भौतिक गोष्टींसाठी तो एवढा खटाटोप करतो त्या गोष्टीदेखील नाशवंत आहेत.

भारत एक पुरातन देश आहे. आपला हिंदू धर्म सनातन धर्म आहे. सर्व क्षेत्रांबरोबरच भारताने आध्यात्मिक क्षेत्रात फार प्रगती केली होती. वेद, उपनिषदे, गीता, आयुर्वेद, रामायण-महाभारत ही महाकाव्ये, भागवत, योगशास्त्र, पुराणे… असे विविध ज्ञानपूर्ण साहित्य आपल्या तपस्वी ऋषिमहर्षींनी समाजाला दिले. त्याशिवाय अनेक संतांनी साध्या-सोप्या प्राकृत भाषेमधून हे सर्व कठीण साहित्य सामान्य व्यक्तीसाठी सोपे करून सांगितले. उदा. ज्ञानेश्वर माउलींची ‘ज्ञानेश्वरी’ (श्रीमद्‌‍ भगवद्गीता), तुकारामांची गाथा, एकनाथी भागवत, संत रामदासांचा ‘दासबोध.’
हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशाला छान विशेषणाने ओळखले जायचे- ‘सोने की चिडिया.’ खरेच सर्व सुखसोयींनी नटलेला हा विश्वातील एक सुंदर देश. निसर्गाने फुललेला, समृद्धीने परिपूर्ण असा. सत्य, नीतिमत्ता यांना प्राधान्य देणारे राजे-महाराजे व त्यांच्याबरोबर चालणारी प्रजा…
असुर राजा रावण याचे राज्य म्हणजे श्रीलंका. अर्थात सोन्याची लंका. सर्व तऱ्हेची सुखसमृद्धी असलेले हे राज्य. पण फरक हा होता की लंकेचा राजा नीतिमत्तेला धरून चालत नव्हता. माता केससी हिच्या संस्कारांमुळे त्याची आसुरी वृत्ती होती. वेदांना ऋचा लावणारा वेदशास्त्र पारंगत, फार मोठा शिवभक्त असला तरी तो तेवढाच स्वार्थी, आत्मकेंद्री व अहंकारी होता. तर रावणाचा लहान भाऊ बिभीषणदेखील ज्ञानी, सात्त्विक वृत्तीचा, रामभक्त होता. रावणाची पत्नी मंदोदरीदेखील पवित्र विचारांची पतिव्रता होती. म्हणून पाच कन्यांमध्ये तिचे नाव आहे (पाच सती स्त्रिया).
अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा।पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम्‌‍॥
गौतम ऋषींची पत्नी अहल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, प्रभू रामचंद्राची पत्नी सीता, हरिश्चंद्राची पत्नी तारामती आणि रावणाची पत्नी मंदोदरी. या पाच महासतींचे जो नामस्मरण करतो त्याच्या महान पातकांचा नाश होतो, असा समज आहे.
येथे मुख्य मुद्दा हा की, फक्त कर्मकांडात्मक स्मरण अपेक्षित नाही तर त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून प्रत्येकाने स्वतःचे चरित्र त्याप्रमाणे घडवायला हवे.
मंदोदरी रावणाचा रोष पत्करून क्षणोक्षणी त्याच्या सीताहरणाची आठवण करून द्यायची. परस्त्रीचे अशा तऱ्हेने अपहरण कसे चूक आहे हे त्याला समजावीत होती. बिभीषणानेदेखील यासंदर्भात त्याला सांगितले, तर रावणाने त्याला लंकेतून हाकलून लावले. सारांश काय तर रावण, त्याचे भाऊ, त्याचे पुत्र आणि लंकेची असंख्य जनता केवळ रावणाच्या अहंकारामुळे मृत्युमुखी पडली. एका ज्ञानी, अहंकारी माणसाच्या विकारवासनेमुळे हे सारे घडले.
पुराणकथांनुसार या जन्माचे रावण व कुंभकर्ण हे जय-विजय म्हणून भगवान विष्णूचे द्वारपाल बनले. ही कथादेखील अत्यंत रोचक आहे. जिज्ञासू अभ्यासकांनी जरूर जाणून घ्यावी.

अध्यात्माच्या दृष्टिकोनातून रावणाचा अभ्यास केला तर हा दहा तोंडाचा रावण म्हणजे विकारवासनांनी बरबटलेला मानवच आहे. दहा तोंडे व असुर प्रवृत्ती ही प्रतीकं आहेत. असे विपरित घडण्याचे कारण म्हणजे आपले आध्यात्मिकतेपासून दूर जाणे.
अध्यात्म म्हणजे शेवटी आत्म्याचे शास्त्र. परमात्म्याकडून आलेला हा आत्मा पवित्र आहे. तो अमर, अजर, अविनाशी, निराकारी, निर्विकारी, निरहंकारी आहे. पण मायेच्या प्रभावामुळे सत्‌‍युगातून निघालेला हा आत्मा त्रेतायुग, द्वापरयुग व आता कलियुगामध्ये स्थानापन्न झालेला आहे. त्याला स्वतःच्या मानवधर्माचा विसर पडला आहे. तो मोहजालात अडकला आहे.

शारीरिक उपभोग, भौतिकता हेच त्याला सर्वस्व वाटते. मानव विसरतो आहे की हा त्याचा देहाभिमान व्यर्थ आहे. हा देह क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. तसेच ज्या भौतिक गोष्टींसाठी तो एवढा खटाटोप करतो त्या गोष्टीदेखील नाशवंत आहेत. एवढेच नाही तर आपले आप्तेष्ट, मित्रपरिवार कुणीही टिकणार नाहीत. पण आपल्याला स्मृतिभ्रंश होत आहे. बहुतेकजण मानवधर्म विसरले आहेत. आपले आत्मज्ञान नष्ट होत आहे. कारण अध्यात्माचा अभ्यास आपण केलेला दिसत नाही.
आपण तर सामान्य मानव. अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर हा श्रीकृष्णाचा सखा व आवडता भक्तदेखील स्वतःच्या क्षात्रधर्माला विसरला. त्याला मोह झाला. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नाव आहे- अर्जुनविषादयोग. येथे तो श्रीकृष्णाला सांगतो की, यत्किंचित भौतिक राज्यासाठी मी माझ्या पितामहा भीष्माशी, गुरू द्रोणाचार्यांशी, आपल्या नातेवाइकांशी कसा लढू? त्यांचा वध का करू?
त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण त्याला आत्मज्ञान देतात. दुसऱ्या सांख्ययोगामध्ये आत्म्याबद्दल सत्य ज्ञान देतात. अर्जुनाला हा मुद्दा संपूर्ण पटत नाही. तो सारखे प्रश्नावर प्रश्न करतो. प्रश्नांचा भडिमार करतो. त्यातून अठरा अध्यायांचा हा गीतेचा विस्तृत प्रपंच झाला.
तत्त्ववेत्ते म्हणतात की भगवंताने अर्जुनाला निमित्त करून हे गीतेचे नाटक केले आहे. काही का असेना, मानवतेला एक चांगला आध्यात्मिक ग्रंथ मिळाला. उच्च ज्ञान मिळाले.

एका क्षणी तर श्रीकृष्णाला स्वतःचे विश्वरूप दाखवून अर्जुनाला पटवावे लागले की तो फक्त त्याचा सखा देवकीनंदन नाही तर याच्यापलीकडे फार उच्च स्थितीतील परमात्मा आहे.
अर्जुन व आपण- फरक म्हणजे आपण क्षणभंगुर भौतिक संपत्तीसाठी भांडणे करतो. याउलट अर्जुनाला तशी संपत्ती मिळवण्यासाठी आप्तेष्टांशी युद्ध करायचे नव्हते.
सारांश एवढाच, आपण हा बोध घ्यायचा की देहाभिमानी न होता आत्माभिमानी व्हायचे. शरीर, भौतिक संपत्ती जीवनातील प्रवासात जरूर आवश्यक आहे, पण आपण आत्मा आहोत व त्याचे गुण विसरू नयेत.
पूर्वजन्माच्या संचिताप्रमाणे जे शरीर व परिस्थिती लाभली आहे, त्या जीवनामध्ये सत्कर्म करणे हेच आपले कर्तव्य व खरा धर्म आहे. म्हणजे पुढच्या अनेक जन्मांत चांगले प्रारब्ध मिळेल. या जन्मातील सुख-दुःख भोगावेच लागणार. आत्मशक्ती वाढवून आपण सर्व तऱ्हेच्या प्रसंगांना सामोरे जाऊया, आणि म्हणूनच शास्त्रशुद्ध योगसाधना आवश्यक आहे.
आज आध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे नैतिकता रसातळाला जाताना दिसते आहे. मानव इंद्रियसुखाकडे जास्त आकर्षित होत आहे. चौफेर नजर फिरवली तर अशा गोष्टी सहज दिसतील.
उदाहरण म्हणून हल्लीच घडलेली घटना बघूया. काही नराधमांनी एका तरुण महिला डॉक्टरवर कोलकात्याच्या एका हॉस्पिटलमध्ये सामूहिक बलात्कार करून, नंतर तिचा खून केला. तद्नंतर जेव्हा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व इतर कर्मचाऱ्यांनी संप केला तेव्हा हजारो गुंड येऊन त्यांनी त्यांना मारहाण केली व हॉस्पिटलचा काही भाग उद्ध्वस्त केला.

आता या घटनेवर सर्व तऱ्हेच्या चौकशा होणार. कदाचित गुन्हेगारांना (सापडले तर) शिक्षा होणार. नवीन कायदेदेखील येणार. अर्थात त्यांचे पालन किती होणार हा प्रश्न वेगळा आहे. कुटुंबालादेखील आर्थिक मदत मिळणार. पण मुख्य गोष्ट म्हणजे त्या महिलेची स्थिती लक्षात घेतली तर मनाला आत्यंतिक वेदना होतात. कायद्याने जग सुधारत नाही, पण नैतिकता यायची असेल तर आध्यात्मिक ज्ञानच हवे.
आता रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करतात, पण खरे बंधन व रक्षण कुठे दिसते का? फक्त कर्मकांडात्मक वचने व शपथा दिसतात आणि एक छोटासा धागा दिसतो. त्याची पवित्रता व महानता किती जणांना माहीत आहे?