मानपानावरून भाविक, पोलिसांवर दगडफेक

0
2

पर्येतील भूमिका देवस्थानच्या कालोत्सवाला गालबोट

गेल्या तीन महिन्यांपासून पर्येतील भूमिका देवीच्या धार्मिक विधींचा हक्क आणि मानपानावरून गावकर-राणे महाजन गट आणि माजिक महाजन गटात वाद सुरू असून, काल पुन्हा वादाची ठिणगी पडली. देवस्थानचा पारंपरिक कालोत्सव साजरा करण्यावरून दोन्ही गटांमध्ये अचानकपणे वाद उफाळून आला. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलीस व भाविकांवर दगडफेक व दंडुक्याने मारहाण करण्याचा प्रकार घडला. त्यामध्ये सुमारे 25 पेक्षा जास्त महाजन व 15 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले. या प्रकरणी 38 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेत पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांना जबर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवार व गुरुवार असे दोन दिवस भूमिका देवस्थानचा पारंपारिक कालोत्सव व गवळण उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे या भागात मंगळवारपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळीच मोठ्या प्रमाणात पोलीस पर्येत दाखल झाले होते. बुधवारी सकाळपासून देवस्थानच्या कालोत्सवाच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. सकाळपासून भाविक देवदर्शनाचा लाभ घेत होते. यावेळी एका गटाचे महाजन देवदर्शनासाठी मंदिरात गेले असता उपस्थित असलेल्या दुसऱ्या गटाच्या महाजनांनी धार्मिक विधी करण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. वाद वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी एका गटाला गर्भकुडीबाहेरच रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व भाविक यांच्यामध्ये झटापट पहावयास मिळाली. यानंतर एका गटाच्या महाजन व भाविक मंडळींनी देवस्थान सभागृहात बसून घोषणाबाजी सुरू केली. याचवेळी दुसऱ्या गटाकडून पोलिसांसमक्षच दगडफेक सुरू झाली. त्यात अनेक भाविक जखमी झाले. दगडफेक, दंडुक्यांनी मारहाण आणि खुर्च्यांची फेकाफेक यात पोलीस देखील जखमी झाले. जखमींवर साखळी रुग्णालयात, काहींवर खासगी इस्पितळात, तर काहींना पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठवण्यात आले.