‘माध्यान्ह आहार’ नव्या स्वरूपात

0
72
नव्या स्वरुपातील माध्यान्ह आहार योजना सरकारच्या मान्यतेसाठी पाठविली असून येत्या आठ दहा दिवसांत त्याला सरकारची मान्यता मिळू शकेल. त्यानंतर लवकरच अंमलबजावणी सुरु होईल, अशी माहिती गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता पाटणेकर यांनी दिली.

वरील योजनेखाली अन्न पुरविणारे फक्त ८४ स्वयं सहाय्य गट होते. नव्या सुधारीत योजनेत या गटांची संख्या १३८ झाली आहे. विद्यार्थ्यांना गरम व ताजे अन्न मिळावे यासाठी पंचायत परिसरातील व पालिका क्षेत्रातील गटांची निवड केली आहे.
संबंधित विद्यालयांच्या पालक शिक्षक संघटनांना विश्वासात घेवूनच वरील गटांची निवड केल्याने पालकांनाही या योजनेवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे पाटणेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत सर्व स्वयंसहाय्य गटांची बैठक घेवून यासंबंधी मार्गदर्शनही करण्यात आले होते.
नव्या स्वरूपातील योजनेनुसार तीन दिवस भाजी-पाव दोन दिवस उसळ-पाव व एक दिवस फळे असे अन्नपदार्थ निश्‍चित केले आहेत. गोवा फलोद्यान विकास महामंडळावर फळे पुरविण्याची जबाबदारी दिली आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्य दर्जाचे अन्न मिळावे म्हणून काळजी घेतल्याचे पाटणेकर म्हणाले.
यापूर्वी माध्यान्ह आहार योजनेत गोंधळ होता. अन्नातून वीषबाधा होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने ही काळजी घेतली आहे.