माध्यान्ह आहाराचे कंत्राट ‘अक्षय पात्र’ला

0
12

राज्यातील सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवठ्याचे काम बंगळूर येथील ‘अक्षय पात्र’ फाउंडेशनला देण्यास सरकारी पातळीवर मान्यता देण्यात आली आहे.

शिक्षण खात्याने राज्यातील काणकोण व इतर भागातील सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवठा करण्यासाठी निविदा जारी केली होती. माध्यान्ह आहार पुरवठ्याबाबत निविदा जारी करण्यात आल्यानंतर अन्य स्वयंसहाय्य गटांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर, शिक्षण खात्याने केवळ पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचा पुरवठा करण्यासाठी निविदा जारी केल्याचे स्पष्ट केले होते.

माध्यान्ह आहाराचा पुरवठा करण्यासाठी पाच जणांनी निविदा सादर केली होती. त्यातील अक्षय पात्र फाउंडेशन आणि स्त्री शक्ती या दोघांच्या निविदा अंतिम मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील अक्षय पात्रची निविदा स्वीकारण्यात आली.

अक्षय पात्र ही संस्था काणकोण तालुक्यापासून माध्यान्ह आहार पुरवठ्याला सुरुवात करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अक्षय पात्र ही संस्था अनेक राज्यात माध्यान्ह आहाराचा पुरवठा करीत आहे. यापूर्वी देखील गोव्यात अक्षय पात्रला माध्यान्ह आहाराचा ठेका देण्यासाठी प्रयत्न झाला होता.